गीतरत्न ८:१-१४

  • तरुणी (१-४)

    • तू माझ्या भावासारखा असतास, तर किती बरं झालं असतं ()

  • तरुणीचे भाऊ (५क)

    • आपल्या सख्याला बिलगून ही कोण येत आहे?

  • तरुणी (५ख-७)

    • “प्रेम मृत्यूइतकं ताकदवान” ()

  • तरुणीचे भाऊ (८, ९)

    • “जर ती भिंत असेल, . . . पण जर ती दारासारखी असेल, . . .” ()

  • तरुणी (१०-१२)

    • “मी भिंत आहे” (१०)

  • मेंढपाळ (१३)

    • “मला तुझा आवाज ऐकू दे”

  • तरुणी (१४)

    • हरणासारखा धावत ये

 तू माझ्या आईचं दूध प्यायलेल्या माझ्या भावासारखा असतास, तर किती बरं झालं असतं! मग तू मला रस्त्यात भेटल्यावर मी तुझं चुंबन घेतलं असतं,+आणि कोणीही मला नावं ठेवली नसती.  २  मी तुला माझ्या आईच्या घरात नेलं असतं,जिने मला शिकवलं, तिच्या घरी मी तुला नेलं असतं.+ मी तुला चांगला द्राक्षारस,डाळिंबांचा ताजा रस प्यायला दिला असता.  ३  त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता,आणि उजव्या हाताने त्याने मला मिठी मारली असती.+  ४  यरुशलेमच्या मुलींनो, तुम्हाला शपथ आहे: माझी इच्छा होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात प्रेम जागं करू नका.”+  ५  “आपल्या सख्याला बिलगून रानातून ही कोण येत आहे?” “तुझ्या आईने तुला जिथे जन्म दिला,जिथे तिला प्रसूतीच्या कळा आल्या,त्या सफरचंदाच्या झाडाखाली मी तुला जागं केलं.  ६  मला आपल्या हृदयावर मुद्रेसारखं* ठेव,तुझ्या हातावरच्या मुद्रेसारखं* मला ठेव. कारण प्रेम मृत्यूइतकं ताकदवान+ आणि विश्‍वासूपणा कबरेसारखा* कठोर असतो. त्याच्या ज्वाला धगधगत्या आगीसारख्या आहेत. ती याहची* ज्वाला आहे.+  ७  पाण्याचे लोट प्रेमाला विझवू शकत नाहीत+ आणि नद्या त्याला बुडवू शकत नाहीत.+ माणसाने प्रेमाच्या मोबदल्यात आपली सगळी संपत्ती जरी दिली,तरी तिला* कवडीमोल लेखलं जाईल.”  ८  “आमची एक लहान बहीण आहे,+तिला स्तन नाहीत. * तिला मागणी घालायला येतील त्या दिवशी आम्ही तिचं काय करू?”  ९  “जर ती भिंत असेल,तर आम्ही तिच्यावर चांदीचा बुरुज बांधू,पण जर ती दारासारखी असेल,तर आम्ही देवदाराच्या फळीने तिला बंद करू.” १०  “मी भिंत आहे आणि माझे स्तन बुरुजांसारखे आहेत. माझा सखा पाहू शकतो,की माझं मन शांत आहे. ११  बाल-हमोन इथे शलमोनचा एक द्राक्षमळा होता.+ त्याने आपला द्राक्षमळा माळ्यांकडे सोपवला. प्रत्येक जण त्याला द्राक्षमळ्यातल्या फळांसाठी हजार चांदीचे तुकडे आणून द्यायचा. १२  हे शलमोन, ते चांदीचे हजार तुकडे* तुझेच आहेत. आणि दोनशे तुकडे माळ्यांचे आहेत. मला तर माझा स्वतःचा द्राक्षमळा आहे.” १३  “बागांमध्ये राहणाऱ्‍या मुली,+माझे सोबती तुझा आवाज ऐकण्यासाठी थांबलेले आहेत. मला तुझा आवाज ऐकू दे.”+ १४  “माझ्या प्राणसख्या, लवकर ये,सुगंधी वनस्पतींच्या पर्वतांवरून हरणासारखा,+हरिणीच्या पाडसासारखा धावत ये.”

तळटीपा

“याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “शिक्क्यासारखं.”
किंवा “शिक्क्यासारखं.”
किंवा कदाचित, “त्याला.”
किंवा “ती अजून वयात आलेली नाही.”
शब्दशः “ते हजार.”