जखऱ्‍या १०:१-१२

  • यहोवाकडे पावसासाठी विनंती करा, खोट्या दैवतांकडे नाही (१, २)

  • यहोवा आपल्या लोकांना एकत्र करतो (३-१२)

    • यहूदाच्या घराण्यातून एक प्रमुख निघेल (३, ४)

१०  “वसंतातल्या पावसाच्या काळात, यहोवाकडे पावसासाठी विनंती करा. कारण काळे घनदाट ढग बनवणारा यहोवाच आहे,तो लोकांसाठी पाऊस पाडतो,+आणि प्रत्येकासाठी शेतात हिरवळही तोच उगवतो.  २  कुलदैवतांच्या मूर्ती* फसव्या गोष्टी* बोलल्या;शकुन पाहणाऱ्‍यांनी खोटे दृष्टान्त पाहिले. ते निरर्थक स्वप्नांबद्दल बोलतात,आणि व्यर्थ सांत्वन देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते मेंढरांसारखे भटकतील,आणि कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांना दुःख सोसावं लागेल.  ३  मेंढपाळांवर माझा क्रोध भडकलाय,मी जुलूम करणाऱ्‍या पुढाऱ्‍यांकडून हिशोब घेईन;कारण सैन्यांचा देव यहोवा याने त्याच्या कळपाकडे, यहूदाच्या घराण्याकडे लक्ष दिलंय.+ त्याने लढाईतल्या त्याच्या वैभवशाली घोड्यासारखं त्यांना बनवलंय.  ४  त्यांच्यातून एक प्रमुख* निघेल,त्यांच्यातून मदत करणारा शासक* येईल,युद्धाचं एक धनुष्य त्यांच्यातूनच निघेल,आणि देखरेख करणारा प्रत्येक जण त्यांच्यापासूनच येईल. हे सगळे एकत्र निघतील.  ५  युद्धाच्या वेळी रस्त्यावरचा चिखल तुडवत जाणाऱ्‍या योद्ध्यांसारखे ते होतील. ते युद्ध करतील, कारण यहोवा त्यांच्यासोबत आहे;+ते शत्रूंच्या घोडेस्वारांना लज्जित करतील.+  ६  मी यहूदाच्या घराण्याला शक्‍तिशाली बनवीन,मी योसेफच्या घराण्याला वाचवीन.+ मी त्यांच्यावर दया करीन,+आणि त्यांना पुन्हा त्यांच्या देशात घेऊन येईन;मी कधी त्यांचा त्याग केलाच नव्हता असे ते होतील.+ कारण मी त्यांचा देव यहोवा आहे, आणि मी त्यांच्या प्रार्थना ऐकीन.  ७  एफ्राईमचे लोक शूर योद्ध्यांसारखे होतील,द्राक्षारसाने होतो, तसा आनंद त्यांच्या मनाला होईल.+ हे पाहून त्यांची मुलं हर्ष करतील;यहोवामुळे त्यांचं मन आनंदी होईल.+  ८  ‘मी शिट्टी वाजवून* त्यांना एकत्र करीन;मी त्यांना सोडवून घेईन+ व त्यांची संख्या खूप वाढेल,आणि पुढेही ती तशीच वाढत जाईल.  ९  मी त्यांना राष्ट्रांमध्ये बीयांसारखं जरी विखुरलं,तरी ते तिथे, दूरच्या देशांतही माझी आठवण ठेवतील;ते आणि त्यांची मुलं-मुली नवीन शक्‍ती मिळवतील आणि परत येतील. १०  मी त्यांना इजिप्तहून* परत आणीन,अश्‍शूर देशातून मी त्यांना गोळा करीन.+ मी त्यांना गिलादच्या+ आणि लबानोनच्या प्रदेशात घेऊन येईन,आणि त्या सगळ्यांना जागा पुरणार नाही.+ ११  मी समुद्राची शांतता भंग करून पार जाईनआणि त्याच्या लाटा हाणून पाडीन.+ मी नाईल नदीचं सगळं पाणी सुकवून टाकीन. अश्‍शूरचा गर्व उतरवला जाईल,आणि इजिप्तचा राजदंड त्याच्यापासून निघून जाईल.+ १२  मी यहोवा स्वतः त्यांना शक्‍तिशाली करीन,+आणि ते माझ्या नावाने चालतील,’+ असं यहोवा म्हणतो.”

तळटीपा

किंवा “तेराफीम मूर्ती.”
किंवा “जादूटोण्याच्या गोष्टी; रहस्यमय गोष्टी.”
शब्दशः “कोपऱ्‍यावरचा बुरूज,” हे एका खास किंवा महत्त्वाच्या व्यक्‍तीला दर्शवतं; एक प्रधान.
शब्दशः “खुंटी,” ही एका अशा व्यक्‍तीला सूचित करते जी आधार आहे; एक शासक.
किंवा “शीळ घालून.”
किंवा “मिसरहून.”