जखऱ्‍या ११:१-१७

  • देवाच्या खऱ्‍या मेंढपाळाला नाकारण्याचे परिणाम (१-१७)

    • “कापण्यासाठी नेमलेल्या मेंढरांचा मेंढपाळ हो” ()

    • दोन काठ्या: कृपा आणि ऐक्य ()

    • मेंढपाळाची मजुरी: चांदीचे ३० तुकडे (१२)

    • चांदीचे ते तुकडे खजिन्यात फेकले जातात (१३)

११  “हे लबानोन! आपले दरवाजे उघड,म्हणजे अग्नी तुझे देवदार वृक्ष भस्म करेल.  २  हे गंधसरू, आक्रोश कर! कारण देवदार पडलाय;उंच-उंच झाडांचा नाश झालाय. बाशानच्या अल्लोन* वृक्षांनो शोक करा,कारण घनदाट जंगल जमीनदोस्त झालंय.  ३  ऐका! मेंढपाळांचा आक्रोश ऐका! कारण त्यांचं वैभव धुळीस मिळालंय. ऐका! तरुण सिंहांची गर्जना ऐका! कारण यार्देनच्या किनाऱ्‍यावर असलेली घनदाट अरण्यं नष्ट झाली आहेत. ४  माझा देव यहोवा म्हणतो, ‘कापण्यासाठी नेमलेल्या मेंढरांचा मेंढपाळ हो.+ ५  त्या मेंढरांना विकत घेणारे त्यांना कापतात,+ आणि तरीही त्या लोकांना कोणी दोषी ठरवत नाही. त्यांना विकणारे+ म्हणतात: “यहोवाची स्तुती होवो, कारण आता मी श्रीमंत होईन.” आणि त्या मेंढरांच्या मेंढपाळांना त्यांची जराही दया येत नाही.’+ ६  यहोवा म्हणतो: ‘यापुढे मी या देशात राहणाऱ्‍या लोकांवर दया करणार नाही. मी प्रत्येक माणसाला त्याच्या शेजाऱ्‍याच्या आणि त्याच्या राजाच्या हाती देईन; ते देशाचा नाश करतील आणि मी त्यांना त्यांच्या हातून वाचवणार नाही.’” ७  तेव्हा कापण्यासाठी नेमलेल्या कळपाचा मी मेंढपाळ झालो;+ कळपातल्या त्रासलेल्यांसाठी! हो, तुमच्यासाठी मी मेंढपाळ झालो! मग मी दोन काठ्या घेतल्या. एका काठीला मी कृपा असं नाव दिलं, तर दुसऱ्‍या काठीला ऐक्य असं नाव दिलं.+ आणि मी कळप चारू लागलो. ८  मी एका महिन्यात तीन मेंढपाळांना काढून टाकलं. कारण मी त्यांचं आणखी सहन करू शकत नव्हतो, आणि तेही माझा द्वेष करत होते. ९  मी म्हणालो: “यापुढे मी मेंढरांची काळजी घेणार नाही. तुमच्यापैकी कोणी मेला, तर मरू द्या; कोणी नष्ट झाला, तर नष्ट होऊ द्या. आणि जे उरतील त्यांना एकमेकांना फाडून खाऊ द्या.” १०  मग मी कृपा नावाची माझी काठी घेतली+ आणि तिचे कापून तुकडे केले; सगळ्या लोकांसोबत मी जो करार केला होता, तो मी मोडून टाकला. ११  अशा प्रकारे त्या दिवशी तो करार मोडण्यात आला. आणि कळपामधली त्रासलेली जी मेंढरं मला बघत होती, त्यांना कळलं की हा संदेश यहोवाकडून आहे. १२  त्यानंतर मी त्यांना म्हणालो: “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझी मजुरी द्या, नाहीतर नका देऊ.” मग त्यांनी मला माझी मजुरी म्हणून चांदीचे ३० तुकडे दिले.+ १३  तेव्हा यहोवा मला म्हणाला: “जा आणि ते तुकडे खजिन्यात फेकून दे. त्यांनी खरंच माझी खूप मोठी किंमत लावली आहे!”+ म्हणून मी चांदीचे ते ३० तुकडे घेतले आणि यहोवाच्या मंदिरातल्या खजिन्यात फेकून दिले.+ १४  मग मी ऐक्य नावाच्या माझ्या दुसऱ्‍या काठीचे कापून तुकडे केले.+ अशा प्रकारे यहूदा आणि इस्राएलमधलं भावा-भावांसारखं नातं संपलं.+ १५  मग यहोवा मला म्हणाला: “आता, काहीही कामाचा नाही अशा मेंढपाळाची साधनसामग्री घे.+ १६  कारण मी देशावर एका मेंढपाळाला अधिकारी होऊ देतोय. तो मरायला टेकलेल्या मेंढरांची काळजी घेणार नाही,+ लहान मेंढरांना शोधणार नाही, जखमी मेंढरांची मलमपट्टी करणार नाही,+ आणि सुदृढ मेंढरांना चारणार नाही. याउलट, तो धष्टपुष्ट मेंढरांना फाडून खाईल+ आणि मेंढरांचे खूर उपटून टाकेल.+ १७  आपल्या कळपाला सोडून देणाऱ्‍या+ व्यर्थ मेंढपाळाचा धिक्कार असो!+ तलवार त्याच्या हातावर आणि उजव्या डोळ्यावर वार करेल. त्याचा संपूर्ण हात सुकून जाईल,आणि तो उजव्या डोळ्याने पूर्णपणे आंधळा होईल.”

तळटीपा

एक प्रकारचा मोठा वृक्ष. इंग्रजीत या वृक्षांना “ओक”  म्हणतात.