जखऱ्‍या १४:१-२१

  • खऱ्‍या उपासनेचा पूर्णपणे विजय (१-२१)

    • जैतुनांच्या डोंगराचे दोन भाग होतील ()

    • यहोवा एक असेल, आणि त्याचं नावसुद्धा एक असेल ()

    • यरुशलेमचा विरोध करणाऱ्‍यांवर पीडा (१२-१५)

    • मंडपांचा सण साजरा करणं (१६-१९)

    • प्रत्येक कढई यहोवासाठी पवित्र (२०, २१)

१४  “पाहा! यहोवाचा दिवस येतोय. त्या दिवशी, तुझा* माल लुटून तुझ्यासमोरच वाटून घेतला जाईल. २  सगळ्या राष्ट्रांनी यरुशलेमशी युद्ध करावं, म्हणून मी त्यांना एकत्र करीन. ते शहर काबीज केलं जाईल. त्यातली घरं लुटली जातील आणि तिथल्या बायकांची अब्रू घेतली जाईल. शहरातले अर्धे लोक बंदिवासात जातील, पण उरलेल्या लोकांचा शहरातून नाश होणार नाही. ३  यहोवा त्या राष्ट्रांशी युद्ध करायला जाईल+ आणि तो लढाईच्या दिवशी जसा लढतो, तसा लढेल.+ ४  त्या दिवशी, यरुशलेमच्या पूर्वेकडे असलेल्या जैतुनांच्या डोंगरावर+ तो आपले पाय ठेवून उभा राहील. आणि त्या डोंगराचे पूर्वेकडून पश्‍चिमेपर्यंत दोन भाग होतील. त्या डोंगराचा अर्धा भाग उत्तरेकडे सरकेल, तर अर्धा भाग दक्षिणेकडे सरकेल; आणि मधे एक मोठी दरी तयार होईल. ५  माझ्या डोंगरांच्या मधे तयार झालेल्या त्या दरीत तुम्ही पळून जाल. कारण ती दरी थेट आसेलपर्यंत पोहोचेल. यहूदाचा राजा उज्जीया याच्या काळात भूकंप झाल्यावर जसं तुम्ही पळाला होता, तसं तुम्हाला पळावं लागेल.+ माझा देव यहोवा येईल आणि सगळे पवित्र जण त्याच्यासोबत असतील.+ ६  त्या दिवशी तेजस्वी प्रकाश नसेल.+ गोष्टी गोठून जातील. ७  तो ना धड दिवस असेल, ना धड रात्र. आणि संध्याकाळी उजेड असेल. तो दिवस यहोवाचा दिवस+ म्हणून ओळखला जाईल. ८  त्या दिवशी यरुशलेममधून जिवंत पाण्याचे झरे+ वाहतील;+ अर्धे झरे पूर्व समुद्राकडे*+ आणि अर्धे पश्‍चिम समुद्राकडे*+ वाहतील. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही तसंच होईल. ९  यहोवा सर्व पृथ्वीचा राजा होईल.+ त्या दिवशी यहोवा एक असेल+ आणि त्याचं नावसुद्धा एक असेल.+ १०  गेबापासून+ यरुशलेमच्या दक्षिणेकडे रिम्मोनपर्यंत,+ संपूर्ण देश अराबासारखा+ होईल. आणि यरुशलेमला तिच्या जागी उंचावलं जाईल आणि तिच्यात लोकवस्ती होईल;+ बन्यामीनच्या फाटकापासून+ थेट पहिल्या फाटकापर्यंत आणि कोपऱ्‍याच्या दरवाजापर्यंत, तसंच हनानेलच्या बुरुजापासून+ थेट राजाच्या द्राक्षकुंडांपर्यंत तिच्यात लोकवस्ती होईल. ११  तिला पुन्हा कधीही नाशाच्या लायक ठरवलं जाणार नाही.+ यरुशलेम वसवली जाईल आणि लोक तिच्यात शांतीने राहतील.+ १२  आणि यरुशलेमसोबत युद्ध करणाऱ्‍या सगळ्या राष्ट्रांच्या लोकांवर यहोवा ही पीडा आणेल:+ ते आपल्या पायांवर उभे आहेत तोच त्यांचं शरीर सडेल; त्यांचे डोळे आपल्या खाचांतच आणि त्यांच्या जिभा आपल्या तोंडातच सडतील. १३  त्या दिवशी यहोवा त्या सगळ्यांना मोठ्या गोंधळात पाडेल. आणि प्रत्येक जण आपल्या सोबत्याला धरून त्याच्यावर हल्ला करेल.+ १४  यहूदासुद्धा यरुशलेममध्ये युद्ध करेल. आणि आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्रांची धनसंपत्ती, म्हणजे कपडे, सोनं आणि चांदी हे फार मोठ्या प्रमाणात गोळा केलं जाईल.+ १५  आणि अशीच पीडा त्यांच्या छावणीत असलेल्या त्यांच्या घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर, गाढवांवर आणि सगळ्या गुराढोरांवर येईल. १६  यरुशलेमशी लढायला आलेल्या सर्व राष्ट्रांपैकी जे उरतील ते राजाला, म्हणजे सैन्यांचा देव यहोवा याला दंडवत घालायला*+ आणि मंडपांचा* सण साजरा करायला+ दरवर्षी यरुशलेमला जातील.+ १७  पण पृथ्वीवरच्या घराण्यांपैकी जे कोणी राजाला, सैन्यांचा देव यहोवा याला दंडवत घालायला यरुशलेमला येणार नाहीत, त्यांच्यावर पाऊस पडणार नाही.+ १८  आणि इजिप्तचं घराणं जर वर यरुशलेमला आलं नाही आणि त्याने शहरात प्रवेश केला नाही, तर त्यावरही पाऊस पडणार नाही. याउलट, मंडपांचा सण साजरा करण्यासाठी न आलेल्या राष्ट्रांवर यहोवा जी पीडा आणेल, तीच पीडा त्यावर येईल. १९  इजिप्तला आणि मंडपांचा सण साजरा करण्यासाठी न येणाऱ्‍या सर्व राष्ट्रांना त्यांच्या पापासाठी हीच शिक्षा होईल. २०  त्या दिवशी, घोड्यांच्या घंट्यांवर, ‘पवित्रता यहोवाची आहे!’+ हे शब्द लिहिले जातील. आणि यहोवाच्या मंदिरात असलेल्या कढया,+ वेदीपुढे ठेवलेल्या वाट्यांसारख्या होतील.+ २१  यरुशलेममधली आणि यहूदामधली प्रत्येक कढई पवित्र असून ती सैन्यांचा देव यहोवा याला समर्पित असेल. आणि बलिदानं द्यायला येणारे सर्व जण त्यांतल्या काही कढयांमध्ये बलिदानांचं मांस शिजवतील. त्या दिवशी सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिरात एकही कनानी* नसेल.”+

तळटीपा

म्हणजे, वचन २ मध्ये सांगितलेलं शहर.
म्हणजे, भूमध्य समुद्र.
म्हणजे, मृत समुद्र.
किंवा “तात्पुरत्या आश्रयांचा.”
किंवा “याची उपासना करायला.”
किंवा कदाचित, “व्यापारी.”