जखऱ्‍या २:१-१३

  • तिसरा दृष्टान्त: हातात मोजमापाची दोरी असलेला माणूस (१-१३)

    • यरुशलेमचं मोजमाप घेतलं जाईल ()

    • यहोवा, “तिच्याभोवती आगीची भिंत” ()

    • देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावणं ()

    • अनेक राष्ट्रं यहोवाला येऊन मिळतील (११)

 मग मी नजर वर करून पाहिलं, तेव्हा हातात मोजमापाची दोरी असलेला एक माणूस मला दिसला.+ २  मी त्याला विचारलं: “तू कुठे चाललास?” तो म्हणाला: “मी यरुशलेमचं मोजमाप घ्यायला चाललोय; तिची लांबी आणि रुंदी किती आहे ते पाहायला चाललोय.”+ ३  मग पाहा! माझ्याशी बोलत असलेला स्वर्गदूत निघून गेला, आणि दुसरा एक स्वर्गदूत त्याला भेटायला आला. ४  तो त्याला म्हणाला: “धावत जाऊन त्या तरुण माणसाला सांग: ‘“यरुशलेममधल्या लोकांची आणि गुराढोरांची संख्या इतकी वाढेल,+ की सभोवती भिंती नसलेल्या खेड्यांसारखी तिच्यात लोकवस्ती होईल.+ ५  आणि मी स्वतः तिच्याभोवती आगीची भिंत होईन,+ आणि माझ्या वैभवाने यरुशलेम भरून जाईल,” असं यहोवा म्हणतो.’”+ ६  “या! उत्तरेकडच्या देशातून पळून या!”+ असं यहोवा म्हणतो. “कारण मी चारही दिशांना* तुमची पांगापांग केली आहे,”+ असं यहोवा म्हणतो. ७  “हे सीयोन, ये! बाबेलच्या* मुलीसोबत राहणारी तू, तिथून पळ काढ.+ ८  कारण गौरवशाली झाल्यावर ज्या सैन्यांच्या देवाने, यहोवाने मला तुमची लुटालूट करणाऱ्‍या राष्ट्रांकडे पाठवलं,+ तो असं म्हणतो: ‘जो तुम्हाला हात लावतो, तो जणू माझ्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावतो.+ ९  म्हणून आता मी माझा हात त्यांच्यावर उगारीन, आणि त्यांचेच गुलाम त्यांना लुटतील.’+ तेव्हा तुमची खातरी पटेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय. १०  हे सीयोनच्या मुली, आनंदाने जयजयकार कर!+ कारण मी येतोय,+ आणि मी तुझ्यामध्ये राहीन,”+ असं यहोवा म्हणतो. ११  “त्या दिवशी अनेक राष्ट्रं मला, यहोवाला येऊन मिळतील.+ ते माझे लोक होतील आणि मी त्यांच्यामध्ये राहीन.” तेव्हा तुमची खातरी पटेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय. १२  मग यहोवा, पवित्र जमिनीवरून आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल, आणि पुन्हा यरुशलेमला निवडेल.+ १३  सर्व मानवांनो, यहोवापुढे शांत राहा. कारण, तो आपल्या पवित्र निवासस्थानातून कार्य करायला निघाला आहे.

तळटीपा

शब्दशः “आकाशातल्या चारही वाऱ्‍यांसारखी.”
किंवा “बॅबिलॉनच्या.”