जखऱ्‍या ३:१-१०

  • चौथा दृष्टान्त: महायाजकाचे कपडे बदलले जातात (१-१०)

    • सैतान, यहोशवा महायाजकाचा विरोध करतो ()

    • “मी अंकुर म्हटलेल्या माझ्या सेवकाला आणतोय!” ()

 नंतर त्याने मला दाखवलं, की यहोवाच्या स्वर्गदूतासमोर महायाजक यहोशवा+ उभा आहे, आणि त्याचा विरोध करण्यासाठी सैतान+ त्याच्या उजवीकडे उभा आहे. २  मग यहोवाचा स्वर्गदूत सैतानाला म्हणाला: “अरे सैताना! यहोवा तुला धमकावो!+ हो, यरुशलेमची निवड+ करणारा यहोवा तुला धमकावो! हा यहोशवा, आगीतून बाहेर काढलेलं जळतं लाकूड नाही का?” ३  यहोशवा स्वर्गदूतासमोर उभा होता त्या वेळी यहोशवाच्या अंगावर मळके कपडे होते. ४  तेव्हा आपल्यासमोर उभे असलेल्यांना तो स्वर्गदूत म्हणाला: “याचे मळके कपडे काढा.” मग तो यहोशवाला म्हणाला: “पाहा! मी तुझा दोष* तुझ्यापासून दूर केलाय. आणि आता तुला चांगल्या प्रतीचे कपडे घातले जातील.”+ ५  तेव्हा मी म्हणालो: “त्याच्या डोक्यावर एक स्वच्छ पगडी ठेवली जावी.”+ मग त्यांनी त्याच्या डोक्यावर एक स्वच्छ पगडी ठेवली आणि त्याला चांगले कपडे घातले. त्या वेळी यहोवाचा स्वर्गदूत जवळच उभा होता. ६  मग यहोवाचा स्वर्गदूत यहोशवाला म्हणाला: ७  “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘तू जर नेहमी माझ्या मार्गांवर चाललास आणि माझ्यासमोर तुझ्या सर्व जबाबदाऱ्‍या पार पाडल्यास, तर तू माझ्या मंदिरात न्यायाधीश म्हणून सेवा करशील+ आणि माझ्या मंदिराच्या अंगणांची देखरेख* करशील; तसंच, इथे उभे असलेल्यांसारखंच मी तुलाही माझ्यासमोर येण्या-जाण्याची मोकळीक देईन.’ ८  ‘हे महायाजक यहोशवा! कृपा करून ऐक. तू आणि तुझ्यासमोर बसणारे तुझे सोबती, तुम्ही सगळे भविष्यासाठी एक चिन्ह व्हाल. पाहा! मी ‘अंकुर’+ म्हटलेल्या माझ्या सेवकाला+ आणतोय! ९  मी यहोशवासमोर जो दगड ठेवलाय तो पाहा! त्या एका दगडाला सात डोळे आहेत* आणि त्यावर मी काहीतरी कोरून लिहितोय. याशिवाय, मी त्या देशाचा अपराध एका दिवसात दूर करीन,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.+ १०  ‘त्या दिवशी, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्‍याला आपल्या द्राक्षवेलीखाली आणि अंजिराच्या झाडाखाली यायचं आमंत्रण देईल,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”+

तळटीपा

किंवा “अपराध.”
किंवा “राखण.”
कदाचित याचा अर्थ, सात डोळे त्या दगडाकडे पाहत आहेत, असा होऊ शकतो.