जखऱ्‍या ५:१-११

  • सहावा दृष्टान्त: उडत असलेली गुंडाळी (१-४)

  • सातवा दृष्टान्त: एफाचं भांडं (५-११)

    • त्यात असलेली ‘दुष्टता’ नावाची स्त्री ()

    • ते भांडं शिनार देशात नेलं जातं (९-११)

 मी पुन्हा नजर वर करून पाहिलं, तेव्हा मला उडत असलेली एक गुंडाळी दिसली. २  स्वर्गदूताने मला विचारलं: “तुला काय दिसतंय?” मी म्हणालो: “मला उडत असलेली एक गुंडाळी दिसत आहे. तिची लांबी २० हात* आणि रुंदी १० हात आहे.” ३  त्यावर तो मला म्हणाला: “संपूर्ण पृथ्वीवर येणारा हा शाप आहे. कारण, गुंडाळीच्या एका बाजूला लिहिल्याप्रमाणे चोरी करणारा शापित आहे;+ पण तरीही त्याला शिक्षा झालेली नाही. आणि गुंडाळीच्या दुसऱ्‍या बाजूला लिहिल्याप्रमाणे खोटी शपथ घेणारा शापित आहे;+ पण तरीही त्याला शिक्षा झालेली नाही. ४  म्हणून ‘मी तो शाप पाठवलाय,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. ‘तो शाप चोरी करणाऱ्‍याच्या आणि माझ्या नावाने खोटी शपथ घेणाऱ्‍याच्या घरात शिरेल आणि तिथेच राहील. तिथे राहून तो ते घर त्याच्या लाकडांसकट आणि दगडांसकट नष्ट करेल.’” ५  मग माझ्याशी बोलत असलेला स्वर्गदूत पुढे आला आणि मला म्हणाला: “आता आपली नजर वर कर आणि काय जात आहे ते बघ.” ६  तेव्हा मी विचारलं: “हे काय आहे?” तो म्हणाला: “हे एफाचं भांडं* जात आहे.” तो पुढे म्हणाला: “संपूर्ण पृथ्वीवरच्या दुष्ट लोकांचं हे रूप आहे.” ७  मग मी पाहिलं, की त्या भांड्यावरचं शिशाचं गोल झाकण काढण्यात आलं, आणि त्यात एक स्त्री बसली होती. ८  तेव्हा तो म्हणाला: “ही दुष्टता आहे.” मग त्याने तिला परत त्या एफाच्या भांड्यात ढकललं, आणि भांड्याचं तोंड वजनदार शिशाच्या झाकणाने बंद केलं. ९  मग मी वर पाहिलं, तेव्हा मला दोन स्त्रिया उडत येताना दिसल्या; त्यांचे पंख करकोचा पक्षाच्या पंखांसारखे होते. त्यांनी ते एफाचं भांडं आकाशात* उचलून नेलं. १०  म्हणून माझ्याशी बोलत असलेल्या स्वर्गदूताला मी विचारलं: “एफाचं भांडं त्या कुठे घेऊन चालल्या आहेत?” ११  तो म्हणाला: “ते शिनार*+ देशात तिच्यासाठी घर बांधायला चालल्या आहेत. घर तयार झाल्यावर ते तिला त्या घरात, तिच्या योग्य ठिकाणी ठेवतील.”

तळटीपा

एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
शब्दशः “एफा.” इथे हे अशा एका भांड्याला किंवा टोपलीला सूचित करतं जी एक एफा माप मोजण्यासाठी वापरली जायची. एक एफा म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “पृथ्वीच्या आणि आकाशाच्या मधे.”
म्हणजे, बॅबिलोनिया.