जखऱ्‍या ६:१-१५

  • आठवा दृष्टान्त: चार रथ (१-८)

  • ज्याला अंकुर म्हटलं, तो राजा व याजक असेल (९-१५)

 मग मी पुन्हा नजर वर करून पाहिलं, तेव्हा मला दोन पर्वतांच्या मधून चार रथ येताना दिसले; हे दोन पर्वत तांब्याचे होते. २  त्यातल्या पहिल्या रथाला लाल घोडे, दुसऱ्‍या रथाला काळे घोडे,+ ३  तिसऱ्‍या रथाला पांढरे घोडे आणि चौथ्या रथाला ठिपकेदार घोडे व वेगवेगळे रंगांचे चट्टे असलेले घोडे होते.+ ४  तेव्हा, माझ्याशी बोलत असलेल्या स्वर्गदूताला मी विचारलं: “माझ्या प्रभू, यांचा काय अर्थ होतो?” ५  त्यावर तो स्वर्गदूत म्हणाला: “हे चार स्वर्गदूत* आहेत.+ ते संपूर्ण पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे होते+ आणि आता ते बाहेर निघत आहेत. ६  काळे घोडे असलेला रथ उत्तरेकडच्या देशाकडे+ जात आहे; पांढरे घोडे समुद्राच्या पलीकडे जात आहेत; ठिपकेदार घोडे दक्षिणेकडच्या देशाकडे जात आहेत. ७  आणि वेगवेगळ्या रंगांचे चट्टे असलेले घोडे संपूर्ण पृथ्वीवर फिरण्यासाठी उत्सुक आहेत.” तेव्हा तो म्हणाला: “जा, संपूर्ण पृथ्वीवर फिरा.” मग ते संपूर्ण पृथ्वीवर फिरू लागले. ८  नंतर त्याने मला हाक मारून म्हटलं: “पाहा! उत्तरेकडच्या देशाला जाणाऱ्‍या घोड्यांनी, त्या देशाविरुद्ध असलेला यहोवाचा राग शांत केलाय.” ९  मग मला पुन्हा यहोवाकडून असा संदेश मिळाला: १०  “हेल्दय, तोबीयाह आणि यदाया यांनी बंदिवासातल्या लोकांकडून ज्या गोष्टी आणल्यात त्या त्यांच्याकडून घे. आणि त्याच दिवशी तू सफन्याचा मुलगा योशीया याच्या घरी जा. बाबेलमधून आलेल्या या लोकांनाही आपल्यासोबत घेऊन जा. ११  तू सोनं-चांदी घेऊन त्यांपासून एक सुंदर मुकुट बनव, आणि तो मुकुट महायाजक यहोसादाक याचा मुलगा यहोशवा+ याच्या डोक्यावर ठेव. १२  मग त्याला सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “पाहा! ज्याला ‘अंकुर’+ म्हटलं आहे, तो हा आहे. तो आपल्या स्थानातून उगवेल आणि यहोवाचं मंदिर बांधेल.+ १३  यहोवाचं मंदिर बांधणारा हाच आहे आणि यालाच गौरव मिळेल. तो आपल्या राजासनावर बसेल आणि राज्य करेल. शिवाय तो याजकही असेल.+ तसंच, या दोन्हींमध्ये* चांगला ताळमेळ असेल. १४  आणि यहोवाच्या मंदिरात हेलेम, तोबीयाह, यदाया+ आणि सफन्याचा मुलगा हेन यांची आठवण म्हणून तो सुंदर मुकुट ठेवला जाईल. १५  मग दुरून लोक येतील आणि यहोवाचं मंदिर बांधण्याच्या कामात हातभार लावतील.” त्या वेळी तुम्हाला कळेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय. आपला देव यहोवा याचं तुम्ही काळजीपूर्वक ऐकलंत, तर हे सगळं घडून येईल.’”

तळटीपा

हे कदाचित स्वर्गदूतांचे समूह असावेत.
म्हणजे, राजा आणि याजक या त्याच्या दोन्ही भूमिकांमध्ये.