जखऱ्‍या ९:१-१७

  • आसपासच्या राष्ट्रांविरुद्ध यहोवाचा संदेश (१-८)

  • सीयोनचा राजा येत आहे (९, १०)

    • तो राजा नम्र आहे आणि गाढवावर बसून येत आहे ()

  • यहोवाच्या लोकांची बंदिवासातून सुटका (११-१७)

 देवाकडून असलेला संदेश: “यहोवाचा संदेश हद्राख देशाविरुद्ध आहे,आणि दिमिष्क त्याच्या निशाण्यावर आहे.+ (कारण यहोवाची नजर मानवजातीवर आहे,+त्याची नजर इस्राएलच्या सर्व वंशांवर आहे.)  २  तिच्या शेजारी असलेल्या हमाथविरुद्ध तो संदेश आहे,+सोर आणि सीदोन+ शहाण्या असल्या, तरी तो संदेश त्यांच्याविरुद्ध आहे.+  ३  सोरने आपल्याभोवती मजबूत भिंत उभी केली.* तिने धुळीच्या कणांइतकी असंख्य चांदी,आणि रस्त्यांवरच्या मातीइतकं भरमसाट सोनं जमा केलं.+  ४  पण पाहा! यहोवा तिची सगळी संपत्ती काढून घेईल. तो तिच्या सैन्याचा समुद्रात नाश करेल,*+आणि अग्नी तिला भस्म करेल.+  ५  अष्कलोन ते पाहील आणि भयभीत होईल;गाझाला मोठ्या यातना होतील. आशा धुळीस मिळाल्यामुळे एक्रोनचेही तेच हाल होतील,आणि अष्कलोनमध्ये कधीही लोकवस्ती होणार नाही.+  ६  अश्‍दोदमध्ये अनौरस* मुलं वस्ती करतील,आणि मी पलिष्ट्याचा गर्व मोडून टाकीन.+  ७  मी त्याच्या तोंडातून रक्‍ताने माखलेल्या गोष्टी,आणि त्याच्या दातांमधून घृणास्पद गोष्टी काढून टाकीन. आणि पलिष्ट्यातून जो कोणी उरेल तो आमच्या देवाचा होईल. तो यहूदामध्ये शेखांसारखा* होईल,+आणि एक्रोनचे लोक हे यबूसी लोकांसारखे होतील.+  ८  माझ्या घराचं रक्षण करण्यासाठी मी स्वतः घराबाहेर तळ देईन,+म्हणजे कोणताही शत्रू तिथून ये-जा करणार नाही. आणि पुन्हा कधी जुलूम करणारा तिथून जाऊ शकणार नाही.+ कारण आता मी सर्वकाही* स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे.  ९  सीयोनच्या मुली, आनंद कर! यरुशलेमच्या मुली, मोठ्याने जयघोष कर! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे.+ तो नीतीने वागणारा आहे, आणि त्याच्याजवळ तारण आहे.*तो नम्र आहे.+ तो गाढवावर,गाढवीच्या पिल्लावर बसून येत आहे.+ १०  मी एफ्राईममधले युद्धाचे रथ,आणि यरुशलेममधले घोडे काढून घेईन. युद्धाची धनुष्यं काढून घेतली जातील. आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल.+ त्याचं राज्य एका समुद्रापासून दुसऱ्‍या समुद्रापर्यंत,आणि नदीपासून* पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत असेल.+ ११  हे स्त्री,* तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्या कराराच्या रक्‍तामुळे,मी तुझ्या बंदिवानांना कोरड्या विहिरीतून बाहेर काढीन.+ १२  आशा धरून राहिलेल्या बंदिवानांनो! तुम्ही मजबूत किल्ल्यात परत या.+ आज मी तुला सांगतो,‘हे स्त्री, मी तुला दुप्पट आशीर्वाद देईन!+ १३  कारण यहूदाला मी माझ्या धनुष्यासारखं वाकवीन. आणि त्या धनुष्यावर एफ्राईमला मी बाण म्हणून लावीन. हे सीयोन! मी तुझ्या मुलांना ग्रीसच्या मुलांविरुद्ध उठवीन. आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखं बनवीन.’ १४  यहोवा दाखवून देईल, की तो त्याच्या लोकांसोबत आहे. त्याचा बाण विजेसारखा सुटेल. सर्वोच्च प्रभू यहोवा रणशिंग फुंकेल,+आणि दक्षिणेकडच्या वादळासोबत तो पुढे जाईल. १५  सैन्यांचा देव यहोवा त्यांचं रक्षण करेल,शत्रू त्यांच्यावर गोफणींच्या दगडांनी हल्ला करतील, पण ते त्या शत्रूंना हरवून टाकतील.+ द्राक्षारस पिऊन करावा तसा आनंद आणि जयघोष ते करतील. बलिदानांच्या वाट्यांसारखे,आणि वेदीच्या कोपऱ्‍यांसारखे ते भरून जातील.+ १६  त्या दिवशी त्यांचा देव यहोवा त्यांना वाचवेल,तो आपल्या लोकांचा कळपासारखा बचाव करेल.+ कारण ते त्याच्या देशात, मुकुटात चमकणाऱ्‍या रत्नांसारखे होतील.+ १७  देवाचा चांगुलपणा किती महान आहे!+त्याचं वैभव किती थोर आहे!अन्‍नधान्य खाऊन तरुण बलवान होतील,आणि नवा द्राक्षारस तरुणींना उत्साह देईल.”+

तळटीपा

किंवा “तटबंदी बांधली.”
किंवा कदाचित, “समुद्रावर नाश करेल.”
म्हणजे, “विवाहबाह्‍य संबंधातून जन्मलेला.”
शेख म्हणजे कुळाचा प्रमुख. उत्प ३६:१५ ची तळटीप पाहा.
इथे कदाचित लोकांच्या दुःखाबद्दल बोललं जात असावं.
किंवा “आणि तो यशस्वी आहे; आणि तो वाचवला गेला आहे.”
म्हणजे, फरात नदी.
म्हणजे, सीयोन किंवा यरुशलेम.