तीत याला पत्र २:१-१५
२ तू मात्र नेहमी फायदेकारक शिक्षणाला धरून असलेल्या गोष्टींबद्दल सांगत राहा.+
२ वयस्कर पुरुषांनी मर्यादशील, गंभीर आणि समंजस असावं, तसंच विश्वास, प्रेम आणि धीर या बाबतींत सुदृढ असावं.
३ त्याच प्रकारे, वयस्कर स्त्रियांनी पवित्र जनांना शोभेल असं वागावं. त्या बदनामी करणाऱ्या, जास्त प्रमाणात मद्य* घेणाऱ्या असू नयेत; तर चांगल्या गोष्टी शिकवणाऱ्या असाव्यात.
४ हे यासाठी, की त्यांनी तरुण स्त्रियांना आपल्या नवऱ्यावर आणि मुलाबाळांवर प्रेम करायला,
५ समंजसपणे वागायला, आचरण शुद्ध ठेवायला, आपलं घर सांभाळायला,* दयाळूपणे वागायला, तसंच, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहायला शिकवावं.*+ म्हणजे लोक देवाच्या वचनाची निंदा करणार नाहीत.
६ त्याचप्रमाणे, तरुण पुरुषांनाही समंजस असण्याचं प्रोत्साहन देत राहा.+
७ आणि तू स्वतःसुद्धा सगळ्या बाबतींत, चांगली कार्यं करण्याचं उदाहरण इतरांसमोर ठेव. जे शुद्ध आहे, ते गंभीरतेने शिकवत राहा.*+
८ ज्यांची कोणी टीका करू शकणार नाही, अशा फायदेकारक गोष्टी शिकव.+ म्हणजे विरोधकांना आपल्याविरुद्ध काही नकारात्मक* बोलायला जागा नसल्यामुळे, त्यांची लाजिरवाणी स्थिती होईल.+
९ दासांनी सगळ्या बाबतींत आपल्या मालकांच्या अधीन राहून+ त्यांना खूश करायचा प्रयत्न करत राहावा; त्यांनी उलट बोलू नये,
१० चोरी करू नये,+ तर पूर्णपणे भरवशालायक असावं. म्हणजे सगळ्या बाबतींत ते आपला तारणकर्ता देव याच्या शिक्षणाला शोभा आणू शकतील.+
११ कारण देवाची अपार कृपा प्रकट करण्यात आली आहे; आणि या कृपेमुळे सर्व प्रकारच्या लोकांचं तारण होतं.+
१२ ती कृपा आपल्याला असं शिकवते, की आपण देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा आणि जगाच्या वासनांचा धिक्कार करावा.+ तसंच, आपण या जगाच्या व्यवस्थेत* समंजसपणे, नीतीने आणि देवाची भक्ती करत जीवन जगावं.+
१३ आणि आपण त्या दिवसाची वाट पाहत राहावी, जेव्हा आपली आनंददायक आशा पूर्ण होईल+ आणि महान देवाचा, तसंच आपला तारणकर्ता, येशू ख्रिस्त याचा गौरव प्रकट होईल.
१४ त्याने स्वतःला आपल्याकरता यासाठी अर्पण केलं,+ की सर्व प्रकारच्या अनीतीपासून आपल्याला मुक्त करावं*+ आणि चांगल्या कामांसाठी आवेशी असे, आपल्या खास मालकीचे लोक स्वतःकरता शुद्ध करावेत.+
१५ या गोष्टी शिकवून त्यांना प्रोत्साहन देत राहा आणि पूर्ण अधिकाराने त्यांचं ताडन करत राहा.+ कोणीही तुला तुच्छ लेखू नये.
तळटीपा
^ किंवा “द्राक्षारस.”
^ किंवा “घरातली कामं करायला.”
^ किंवा “भान करून द्यावं; प्रशिक्षण द्यावं.”
^ किंवा कदाचित, “शुद्धतेने शिक्षण दे.”
^ किंवा “वाईट.”
^ किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “आपल्यासाठी खंडणी देऊन; आपल्याला सोडवून.”