नहूम २:१-१३

  • निनवे उद्ध्‌वस्त होईल (१-१३)

    • “नद्यांची फाटकं उघडली जातील” ()

 पांगापांग करणारा तुझ्याविरुद्ध* आला आहे.+ तटबंदीचं संरक्षण कर. रस्त्यावर पहारा ठेव. आपली सगळी शक्‍ती गोळा करून सुसज्ज हो.  २  कारण यहोवा याकोबचा गौरव त्याला परत देईल,तसंच, तो इस्राएललाही त्याचं वैभव परत देईल. कारण नाश करणाऱ्‍यांनी त्यांचा नाश केला आहे;+आणि त्यांनी त्यांच्या फांद्यांची नासधूस केली आहे.  ३  त्याच्या वीरांच्या ढाली लाल रंगाने रंगवलेल्या आहेत,त्याच्या योद्ध्यांची वस्त्रं गडद लाल रंगाची आहेत. तो युद्धाची तयारी करतो, त्या दिवशी त्याच्या लढाईच्या रथांवर लावलेलं लोखंड आगीसारखं चमकतं आणि त्याचे सैनिक लाकडी भाले* फिरवतात.  ४  लढाईचे रथ रस्त्यांवरून बेफाम धावत आहेत. ते चौकांमध्ये इकडून तिकडे वेगाने पळत आहेत. ते जळत्या मशालींसारखे चमकतात आणि वीजेसारखे चकाकतात.  ५  तो आपल्या अधिकाऱ्‍यांना बोलावून घेईल. ते अडखळत येतील. ते घाईघाईने तिच्या भिंतीकडे जाऊन,तिथे अडथळा उभारतील.  ६  नद्यांची फाटकं उघडली जातील,आणि राजवाडा कोसळेल.*  ७  हे फर्मान अटळ आहे: तिला उघडं पाडण्यात आलं आहे;तिला बंदिवासात नेलं आहे,तिच्या दासी छाती* बडवून, कबुतरांसारख्या विव्हळत आहेत.*  ८  निनवे+ पूर्वीपासून पाण्याच्या तळ्यासारखी होती,पण आता लोक पळून जात आहेत. “थांबा! थांबा!” असं म्हणूनहीकोणी मागे वळून पाहत नाही.+  ९  चांदी लुटा, सोनं लुटा! खजिन्याला काही अंतच नाही. तो सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तूंनी भरलेला आहे. १०  शहर रिकामं, ओसाड आणि उद्ध्‌वस्त झालं आहे!+ त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं आहे, त्यांचे गुडघे लटपटत आहेत, त्यांच्या कंबरेत कळा येत आहेत;त्यांचे चेहरे पांढरे पडले आहेत. ११  सिंहांची+ गुहा कुठे आहे? तिथे तरुण सिंह* शिकार खातात,तिथे सिंह आपल्या बछड्यांना नेतो,आणि तिथे त्यांना कोणाचीही भीती नसते. १२  सिंह आपल्या बछड्यांसाठी भरपूर शिकार करायचाआणि आपल्या सिंहिणींसाठी प्राण्यांची नरडी धरायचा,तो आपल्या शिकारीच्या मांसानेआणि फाडलेल्या प्राण्यांनी आपल्या गुहा भरायचा. १३  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “पाहा! मी तुझ्या विरोधात आहे,+मी तिचे लढाईचे रथ जाळीन आणि त्यांचा धूर निघेल;+तुझे तरुण सिंह,* तलवारीने मारले जातील. मी तुला पृथ्वीवर कुठेही शिकार करू देणार नाही,आणि तुझ्या दूतांचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही.”+

तळटीपा

म्हणजे, निनवे.
किंवा “गंधसरूचे भाले.”
किंवा “विरघळेल.”
शब्दशः “हृदयं.”
किंवा “रडत आहेत.”
किंवा “आयाळ असलेले तरुण सिंह.”
किंवा “आयाळ असलेले तरुण सिंह.”