नहूम ३:१-१९

  • “रक्‍तपात करणाऱ्‍या नगरीचा धिक्कार” (१-१९)

    • निनवेविरुद्ध न्यायदंडाची कारणं (१-७)

    • नोआमोनसारखाच निनवेचा नाश (८-१२)

    • निनवेचा नाश अटळ (१३-१९)

 रक्‍तपात करणाऱ्‍या नगरीचा धिक्कार असो! ती फसवणूक आणि लुटालूट यांनी भरलेली आहे. तिच्या लुबाडणुकीला अंत नाही!  २  ऐका! चाबकाच्या फटकाऱ्‍याचा, चाकांच्या खडखडाटाचा,घोड्याच्या टापांचा आणि धावणाऱ्‍या रथाचा आवाज येत आहे.  ३  पाहा! घोडेस्वार, तळपती तलवार आणि चकाकता भाला. कत्तल झालेल्यांचे असंख्य मृतदेह आणि शवांचे ढीग दिसत आहेत. सगळीकडे प्रेतंच प्रेतं आहेत. लोक प्रेतांवरून अडखळत आहेत.  ४  हे सर्व त्या वेश्‍येच्या बऱ्‍याच अनैतिक कृत्यांमुळे घडलं आहे. ती सुंदर आणि मोहक आहे, ती भूतविद्या करण्यात कुशल आहे,ती आपल्या व्यभिचाराने राष्ट्रांना आणि आपल्या भूतविद्येने घराण्यांना जाळ्यात ओढते.  ५  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “पाहा! मी तुझ्या* विरोधात आहे.+ मी तुझा परकर तुझ्या तोंडापर्यंत उचलीन;मी राष्ट्रांना तुझी नग्नता,आणि राज्यांना तुझी लाज पाहायला लावीन.  ६  मी तुझ्यावर घाण फेकीन आणि लोकांना तुझी घृणा वाटेल;ते तुझा तमाशा पाहतील.+  ७  तुला पाहणारा प्रत्येक जण तुझ्यापासून दूर पळेल+ आणि म्हणेल,‘निनवेचा सर्वनाश झाला आहे! तिच्यासाठी कोण शोक करेल?’ तुला सांत्वन देणारे मी कुठून शोधू?  ८  नाईलच्या कालव्यांच्या+ बाजूला असलेल्या नोआमोन*+ नगरीपेक्षा तू चांगली आहेस का? ती पाण्याने वेढलेली होती;समुद्र तिची संपत्ती होती आणि तो तिचं रक्षण करणाऱ्‍या भिंतीसारखा होता.  ९  इथियोपिया* आणि इजिप्त* यांच्याकडून तिला अमर्याद शक्‍ती मिळायची. पूट+ आणि लिबियाचे लोक तुझे सहायक होते.+ १०  पण तीसुद्धा बंदिवासात गेली;तिलाही कैद करून नेण्यात आलं.+ तिच्या मुलाबाळांना रस्त्यांच्या कोपऱ्‍यांवर आपटून मारण्यात आलं. तिच्या प्रतिष्ठित माणसांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या,आणि तिच्या सर्व महान पुरुषांना बेड्यांनी जखडण्यात आलं. ११  तूही मद्याने धुंद होशील;+तू लपून बसशील. शत्रूंपासून बचावासाठी तू आश्रय शोधशील. १२  तुझे सर्व किल्ले पहिल्या पिकलेल्या अंजिरांच्या झाडांसारखे आहेत;ती झाडं हलवली, तर अंजिरं सहज खाणाऱ्‍यांच्या तोंडात पडतील. १३  पाहा! तुझं सैन्य बायकांसारखं आहे. तुझ्या देशाची फाटकं शत्रूंसाठी सताड उघडी असतील. तुझ्या फाटकांचे अडसर आगीत भस्म होतील. १४  पाणी भर, कारण वेढा पडणार आहे!+ किल्ले मजबूत कर. चिखलात उतर आणि तो पायांनी तुडव;विटा तयार करण्याचा साचा घे. १५  तरीही आग तुझा नाश करेल. तलवार तुझी कत्तल करेल.+ टोळांसारखी ती तुला फस्त करेल.+ स्वतःला टोळांसारखं असंख्य कर! हो, स्वतःला टोळांसारखं अगणित कर! १६  तू आपल्या व्यापाऱ्‍यांची संख्या आकाशातल्या ताऱ्‍यांपेक्षा वाढवली आहेस. लहान टोळ आपली कात टाकून उडून जातात. १७  तुझे पहारेकरी टोळांसारखे,आणि तुझे अधिकारी टोळधाडीसारखे आहेत. ते थंडीच्या दिवसांत भिंतींमागे आश्रय घेतात, पण ऊन पडताच उडून जातात; आणि ते कुठे आहेत हे कोणालाच कळत नाही. १८  हे अश्‍शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ पेंगत आहेत;तुझे प्रतिष्ठित लोक घरी आरामात पडले आहेत. तुझ्या लोकांची डोंगरांमध्ये पांगापांग झाली आहे,आणि त्यांना गोळा करणारं कोणीही नाही.+ १९  या भयंकर संकटापासून तुझी सुटका नाही. तुझी जखम बरी होणं शक्य नाही. तुझ्याबद्दलची बातमी ऐकणारे सर्व जण टाळ्या वाजवतील;+कारण तुझी भयकंर क्रूरता ज्याने सोसली नाही, असा कोण आहे?”+

तळटीपा

म्हणजे, निनवे.
म्हणजे, थीब्ज.
किंवा “कूश.”
किंवा “मिसर.”