नहेम्या ३:१-३२

  • भिंती पुन्हा बांधल्या जातात (१-३२)

 मग महायाजक एल्याशीब+ आणि याजक असलेल्या त्याच्या भावांनी मिळून मेंढरं फाटक+ बांधायला सुरुवात केली. त्यांनी त्या फाटकाला पवित्र* केलं+ आणि त्याला दरवाजे बसवले. हमेआच्या बुरुजापासून+ ते हनानेलच्या बुरुजापर्यंतच्या+ भागाला त्यांनी पवित्र केलं. २  त्यांच्या बाजूला यरीहोची माणसं+ बांधकाम करत होती आणि त्यांच्या बाजूला इम्रीचा मुलगा जक्कूर बांधकाम करत होता. ३  हस्सनाच्या मुलांनी मासे फाटक+ बांधलं; त्यांनी त्याची लाकडी चौकट बसवली+ आणि मग तिला दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. ४  आणि त्यांच्या बाजूला उरीयाचा मुलगा, म्हणजे हक्कोसचा नातू मरेमोथ+ याने दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला बरेख्याचा मुलगा, म्हणजे मशेजबेलचा नातू मशुल्लाम+ याने दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला बानाचा मुलगा सादोक याने दुरुस्तीचं काम केलं. ५  त्यांच्या बाजूला तकोवाच्या लोकांनी+ दुरुस्तीचं काम केलं, पण त्यांच्यातल्या प्रतिष्ठित लोकांनी आपल्यावर देखरेख करणाऱ्‍यांच्या हाताखाली सेवा करायला नकार दिला. ६  पासेहाचा मुलगा योयादा आणि बसोदयाचा मुलगा मशुल्लाम यांनी जुन्या शहराच्या फाटकाची+ दुरुस्ती केली. त्यांनी त्याची लाकडी चौकट बसवली आणि मग तिला दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. ७  त्यांच्या बाजूला गिबोनी+ मलत्याह आणि मेरोनोथी यादोन यांनी दुरुस्तीचं काम केलं. ही गिबोनची आणि मिस्पाची+ माणसं होती आणि ती नदीपलीकडे* असलेल्या प्रांताच्या+ राज्यपालाच्या अधिकाराखाली* होती. ८  त्यांच्या बाजूला सोनार असलेला हरहयाचा मुलगा उज्जियेल याने दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला अत्तर बनवणाऱ्‍यांपैकी* असलेला हनन्या याने दुरुस्तीचं काम केलं. त्यांनी यरुशलेमपासून रुंद भिंतीपर्यंतच्या+ भागात दगडी फरश्‍या बसवल्या. ९  त्यांच्या बाजूला यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला, हूरचा मुलगा रफाया याने दुरुस्तीचं काम केलं. १०  त्यांच्या बाजूला हरूमफचा मुलगा यदाया याने आपल्या घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला हशबन्याहचा मुलगा हत्तूश याने दुरुस्तीचं काम केलं. ११  हारीमचा मुलगा+ मल्कीया आणि पहथ-मवाबचा मुलगा+ हश्‍शूब यांनी दुसऱ्‍या भागाची,* तसंच भट्ट्यांच्या बुरुजाची+ दुरुस्ती केली. १२  त्यांच्या बाजूला यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला, हल्लोहेशचा मुलगा शल्लूम याने दुरुस्तीचं काम केलं; त्याच्या मुलींनीही त्याच्यासोबत दुरुस्तीचं काम केलं. १३  हानून आणि जानोहचे+ रहिवासी यांनी खोऱ्‍याच्या फाटकाची+ दुरुस्ती केली; त्यांनी ते बांधलं आणि त्याचे दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. तसंच त्यांनी १,००० हात* अंतरापर्यंत, म्हणजे राखेच्या ढिगाऱ्‍यांच्या फाटकापर्यंत+ भिंतीची दुरुस्ती केली. १४  बेथ-हक्करेम+ जिल्ह्याचा अधिकारी असलेला, रेखाबचा मुलगा मल्कीया याने राखेच्या ढिगाऱ्‍यांच्या फाटकाची दुरुस्ती केली. त्याने ते बांधलं आणि त्याचे दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. १५  मिस्पा+ जिल्ह्याचा अधिकारी असलेला कोलहोजेचा मुलगा शल्लून याने कारंजे फाटकाची+ दुरुस्ती केली; त्याने ते बांधलं, त्याचं छत बनवलं आणि त्याचे दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. तसंच, राजाच्या बागेजवळ+ जे नाल्याचं तळं होतं, त्याच्या भिंतीचीही+ त्याने दुरुस्ती केली. त्याने दावीदपुरापासून+ खाली जाणाऱ्‍या जिन्यापर्यंत+ दुरुस्तीचं काम केलं. १६  बेथ-सूरच्या+ अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला अजबूकचा मुलगा नहेम्या याने दावीदच्या कबरस्तानासमोर+ दुरुस्तीचं काम केलं. त्याने तलावापर्यंत+ आणि योद्ध्यांच्या भवनापर्यंत दुरुस्तीचं काम केलं. १७  त्याच्या शेजारी या लेव्यांनी दुरुस्तीचं काम केलं: बानीचा मुलगा रहूम आणि त्याच्या बाजूला कईलाच्या+ अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला हशब्याह याने आपल्या जिल्ह्याच्या वतीने दुरुस्तीचं काम केलं. १८  त्याच्या बाजूला त्यांच्या या भावांनी दुरुस्तीचं काम केलं: कईलाच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला हेनादादचा मुलगा बवइ. १९  त्याच्याशेजारी मिस्पाचा अधिकारी असलेला येशूवाचा+ मुलगा एजेर, भिंतीला आधार देणाऱ्‍या खांबाला लागून असलेल्या शस्त्रागाराकडे* जाणाऱ्‍या चढावासमोर,+ दुसऱ्‍या एका भागाची दुरुस्ती करत होता. २०  त्याच्या बाजूला जब्बइचा+ मुलगा बारूख याने आवेशाने काम केलं आणि भिंतीला आधार देणाऱ्‍या खांबापासून, महायाजक एल्याशीब+ याच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत आणखी एका भागाची दुरुस्ती केली. २१  त्याच्याशेजारी उरीयाचा मुलगा आणि हक्कोसचा नातू मरेमोथ+ याने आणखी एका भागाची, म्हणजे एल्याशीबच्या घराच्या प्रवेशद्वारापासून, घराच्या शेवटापर्यंतच्या भागाची दुरुस्ती केली. २२  त्याच्या बाजूला यार्देन जिल्ह्यातल्या*+ याजकांनी दुरुस्तीचं काम केलं. २३  त्यांच्याशेजारी बन्यामीन आणि हश्‍शूब यांनी आपापल्या घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्यांच्या बाजूला मासेयाचा मुलगा आणि अनन्याचा नातू अजऱ्‍या यानेही आपल्याच घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. २४  त्याच्या बाजूला हेनादादचा मुलगा बिन्‍नुई याने आणखी एका भागाचं, म्हणजे अजऱ्‍याच्या घरापासून भिंतीला आधार देणाऱ्‍या खांबापर्यंत+ आणि भिंतीच्या कोपऱ्‍यापर्यंत दुरुस्तीचं काम केलं. २५  त्याच्याशेजारी उजईचा मुलगा पलाल याने भिंतीला आधार देणाऱ्‍या खांबासमोर आणि राजमहालाला*+ लागून असलेल्या बुरुजासमोर, म्हणजे ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणाजवळ’+ असलेल्या वरच्या बुरुजासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला परोशचा मुलगा+ पदायाह याने दुरुस्तीचं काम केलं. २६  ओफेल+ इथे राहणाऱ्‍या मंदिराच्या सेवकांनी*+ पूर्वेकडे असलेल्या पाणी फाटकासमोरच्या+ भागापर्यंत आणि पुढे आलेल्या बुरुजापर्यंत दुरुस्तीचं काम केलं. २७  त्यांच्या बाजूला तकोवाच्या लोकांनी+ दुसऱ्‍या एका भागाचं, म्हणजे पुढे आलेल्या मोठ्या बुरुजासमोरून ओफेलच्या भिंतीपर्यंत दुरुस्तीचं काम केलं. २८  याजकांपैकी प्रत्येकाने घोडा फाटकापासून+ पुढे, आपापल्या घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. २९  त्यांच्याशेजारी इम्मेरचा मुलगा सादोक+ याने आपल्याच घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला पूर्वेकडच्या फाटकाचा पहारेकरी+ असलेला शखन्याहचा मुलगा शमाया याने दुरुस्तीचं काम केलं. ३०  त्याच्याशेजारी शलेम्याहचा मुलगा हनन्या आणि सालफचा सहावा मुलगा हानून याने दुसऱ्‍या एका भागाचं दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला बरेख्याचा मुलगा मशुल्लाम+ याने आपल्याच घरासमोर* दुरुस्तीचं काम केलं. ३१  त्याच्याशेजारी सोनारांच्या संघाचा सदस्य असलेल्या मल्कीयाने तपासणी फाटकासमोर, मंदिराच्या सेवकांच्या*+ आणि व्यापाऱ्‍यांच्या घरापर्यंत, तसंच कोपऱ्‍यावर असलेल्या वरच्या खोलीपर्यंत दुरुस्तीचं काम केलं. ३२  सोनार आणि व्यापारी यांनी, कोपऱ्‍यावर असलेली वरची खोली आणि मेंढरं फाटक+ यांच्या मधल्या भागात दुरुस्तीचं काम केलं.

तळटीपा

किंवा “समर्पित.”
शब्दशः “राजासनाची.”
किंवा “फरात नदीपलीकडे.”
किंवा “मलम बनवणाऱ्‍यांपैकी.”
किंवा “मोजलेल्या भागाची.”
जवळजवळ ४५५ मी. (१,४६० फूट). अति. ख१४ पाहा.
किंवा “शस्त्रं ठेवण्याच्या ठिकाणाकडे.”
किंवा कदाचित, “जवळच्या जिल्ह्यातल्या.”
किंवा “राजाच्या घराला.”
किंवा “नथीनीमांनी.” शब्दशः “दिलेले लोक.”
किंवा “कोठारासमोर; खोलीसमोर.”
किंवा “नथीनीमांच्या.” शब्दशः “दिलेले लोक.”