नहेम्या ४:१-२३
४ आम्ही भिंत पुन्हा बांधत आहोत हे सनबल्लटला+ कळलं, तेव्हा त्याला ते अजिबात आवडलं नाही.* तो खूप संतापला आणि यहुद्यांना हिणवू लागला.
२ त्याच्या भावांच्या आणि शोमरोनच्या सैनिकांच्या समोर तो म्हणाला: “हे दुबळे यहुदी लोक काय करत आहेत? हे काम त्यांना जमणार आहे का? बलिदानं अर्पण करून ते हे काम एका दिवसात संपवणार आहेत का? मातीच्या ढिगाऱ्यांतल्या जळलेल्या दगडांना ते पुन्हा जिवंत करणार आहेत का?”+
३ तेव्हा त्याच्याजवळ उभा असलेला अम्मोनी+ तोबीया+ म्हणाला: “ते जे बांधकाम करत आहेत त्याच्यावर एखादा कोल्हा चढला, तरी ती दगडी भिंत कोसळेल.”
४ पण नहेम्या म्हणाला: “हे आमच्या देवा ऐक, कारण आमचा अपमान केला जात आहे.+ त्यांचे टोमणे त्यांनाच लागू दे*+ आणि बंदिवासाच्या देशात त्यांना लुटलं जाऊ दे.
५ त्यांचे अपराध झाकू नकोस किंवा त्यांचं पाप तुझ्यासमोरून पुसून टाकू नकोस.+ कारण त्यांनी बांधकाम करणाऱ्यांचा अपमान केला आहे.”
६ तेव्हा आम्ही भिंत बांधण्याचं काम चालूच ठेवलं. संपूर्ण भिंत तिच्या अर्ध्या उंचीपर्यंत बांधून पूर्ण झाली आणि लोक मन लावून काम करत राहिले.
७ जेव्हा सनबल्लट, तोबीया,+ तसंच अरबी,+ अम्मोनी, आणि अश्दोदी+ लोक यांनी ऐकलं, की यरुशलेमच्या भिंतींच्या दुरुस्तीचं काम जोरात चाललं आहे आणि ती जिथेजिथे पडली आहे तिथेतिथे पुन्हा बांधकाम करण्यात येत आहे, तेव्हा त्यांना खूप राग आला.
८ म्हणून त्यांनी यरुशलेमविरुद्ध लढण्याचा आणि तिथे जाऊन गोंधळ माजवण्याचा कट रचला.
९ तेव्हा आम्ही आमच्या देवाला प्रार्थना केली आणि रात्रंदिवस त्यांच्यापासून संरक्षणासाठी पहारा ठेवला.
१० पण यहूदाचे लोक म्हणू लागले: “मजूर* थकून गेले आहेत आणि दगडमातीचे खूप ढिगारे आहेत. आपण ही भिंत कधीच बांधून पूर्ण करू शकणार नाही.”
११ दुसरीकडे आमचे शत्रू म्हणत होते: “त्यांनी आपल्याला पाहण्याआधीच किंवा त्यांना काही कळण्याआधीच, आपण त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना मारून टाकू आणि त्यांचं काम बंद पाडू.”
१२ शत्रूंच्या जवळ राहणारे यहुदी जेव्हा काम करायला यायचे, तेव्हा ते आम्हाला सारखं* असं सांगायचे: “ते सर्व दिशांनी येतील आणि आपल्यावर हल्ला करतील.”
१३ म्हणून मी भिंतीमागे खोलवर असलेल्या आणि खुल्या ठिकाणांवर पहारेकरी नेमले. मी त्यांना त्यांच्या घराण्यांनुसार नेमलं आणि तलवारी, भाले आणि धनुष्यं घेऊन पहारा द्यायला सांगितलं.
१४ ते घाबरत आहेत हे जेव्हा मी पाहिलं, तेव्हा मी लगेच उठून उपअधिकाऱ्यांना आणि उच्च घराण्यांतल्या लोकांना+ म्हणालो: “त्यांना घाबरू नका.+ आपला महान आणि विस्मयकारक+ देव यहोवा याला आठवा आणि आपल्या भावांसाठी, बायकामुलांसाठी आणि घरांसाठी लढा.”
१५ आमच्या शत्रूंना समजलं, की त्यांची योजना आम्हाला कळली आहे आणि खऱ्या देवाने त्यांचा कट हाणून पाडला आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा भिंतीचं बांधकाम सुरू केलं.
१६ त्या दिवसापासून माझी अर्धी माणसं काम करायची+ आणि बाकीची माणसं चिलखत घालून भाले, ढाली आणि धनुष्यं घेऊन उभी राहायची. आणि अधिकारी+ सर्व यहुद्यांच्या मागे उभे राहून,
१७ भिंत बांधणाऱ्यांना मदत करायचे. जे ओझी वाहून नेत होते, ते एका हाताने काम करायचे आणि त्यांच्या दुसऱ्या हातात शस्त्र असायचं.
१८ तसंच, बांधकाम करणाऱ्या प्रत्येकाच्या कमरेला तलवार असायची आणि शिंग वाजवणारा+ माझ्या बाजूला उभा राहायचा.
१९ मग मी उपअधिकाऱ्यांना, उच्च घराण्यांतल्या लोकांना आणि बाकीच्या सर्वांना म्हणालो: “हे काम फार मोठं आहे आणि आपण एकमेकांपासून दूर, वेगवेगळ्या ठिकाणी भिंतीचं बांधकाम करत आहोत.
२० म्हणून शिंग फुंकण्याचा आवाज ऐकताच, आम्ही आहोत त्या ठिकाणी तुम्ही सर्व जण एकत्र या. आपला देव आपल्या बाजूने लढेल.”+
२१ तेव्हा आम्ही काम करत राहिलो आणि आमच्यापैकी अर्धी माणसं, पहाटेपासून ते आकाशात तारे दिसू लागेपर्यंत भाले घेऊन उभी राहायची.
२२ मग मी लोकांना म्हणालो: “सर्व पुरुषांनी आपापल्या सेवकासोबत रात्री यरुशलेममध्ये राहावं. ते रात्री पहारा देतील आणि दिवसा काम करतील.”
२३ अशा रितीने, मी, माझे भाऊ, माझे सेवक+ आणि माझ्यासोबत असलेले पहारेकरी, कधीच आमची वस्त्रं काढत नव्हतो आणि आमच्यापैकी प्रत्येकाच्या उजव्या हातात नेहमी शस्त्र असायचं.
तळटीपा
^ किंवा “त्याला राग आला.”
^ शब्दशः “त्यांच्याच डोक्यावर परत पाठव.”
^ किंवा “ओझी वाहणारे.”
^ शब्दशः “दहा वेळा.”