नहेम्या ६:१-१९

  • बांधकामाला विरोध होत राहतो (१-१४)

  • भिंत ५२ दिवसांत बांधून पूर्ण (१५-१९)

 सनबल्लट, तोबीया,+ अरबी गेशेम+ आणि आमच्या बाकीच्या शत्रूंना जेव्हा कळलं, की मी भिंत बांधून पूर्ण केली आहे+ आणि ती जिथेजिथे पडली होती तिथे पुन्हा बांधकाम करण्यात आलं आहे (पण अजून मी फाटकांना दरवाजे बसवले नव्हते),+ २  तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला लगेच असा निरोप पाठवला: “आपण ओनोच्या खोऱ्‍यातल्या*+ गावात भेटण्यासाठी एक वेळ ठरवू या आणि तू तिथे आम्हाला भेटायला ये.” पण खरंतर, माझं काहीतरी बरंवाईट करण्याचा त्यांचा कट होता. ३  तेव्हा मी काही लोकांना त्यांच्याकडे असा निरोप घेऊन पाठवलं: “मी या मोठ्या कामात गुंतलोय, त्यामुळे मला तिथे यायला जमणार नाही. मी तुम्हाला भेटायला आलो तर इकडे काम बंद पडेल.” ४  त्यांनी चार वेळा मला तोच निरोप पाठवला, पण मी प्रत्येक वेळी त्यांना तेच उत्तर दिलं. ५  मग पाचव्या वेळी, सनबल्लटने आपल्या सेवकाला माझ्याकडे तोच निरोप घेऊन पाठवलं, पण या वेळी त्याच्या हाती त्याने एक खुलं* पत्रही पाठवलं. ६  त्यात असं लिहिलं होतं: “आसपासच्या राष्ट्रांत अशी चर्चा चालली आहे आणि गेशेमसुद्धा+ हेच बोलत आहे, की तू आणि यहुदी लोक मिळून बंड करण्याची योजना करत आहात.+ म्हणूनच तुम्ही ही भिंत बांधत आहात; आणि या बातम्यांनुसार तू त्यांचा राजा बनणार आहेस. ७  तसंच, ‘आता यहूदामध्ये एक राजा आहे!’ अशी स्वतःबद्दल घोषणा करण्यासाठी तू सबंध यरुशलेममध्ये संदेष्ट्यांना नेमलं आहेस. ही बातमी आता नक्कीच राजापर्यंत पोहोचेल, म्हणून तू इथे ये, म्हणजे आपण या गोष्टीबद्दल चर्चा करू.” ८  पण मी त्याला असं उत्तर पाठवलं: “तू म्हणत आहेस तसं काहीही घडलेलं नाही. या सगळ्या फक्‍त तुझ्या मनातल्या* कल्पना आहेत.” ९  ते सर्व आम्हाला असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते: “ते निराश होतील* आणि हे काम पूर्ण करू शकणार नाहीत.”+ पण मी अशी प्रार्थना केली, “हे देवा, माझ्या हातांना बळ दे.”+ १०  मग मी दलायाचा मुलगा, म्हणजे महेटाबेलचा नातू शमाया याच्या घरी गेलो. तो तिथे लपून बसला होता. तो म्हणाला: “आपण एक वेळ ठरवून खऱ्‍या देवाच्या मंदिरात भेटू. आणि आपण मंदिराची दारं बंद करून घेऊ, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते रात्रीच्या वेळी तुला मारायला येणार आहेत.” ११  पण मी म्हणालो: “मी राज्यपाल आहे. मग असं पळून जाणं मला शोभेल का? माझ्यासारखा माणूस मंदिरात जाऊन लपला तर जिवंत राहू शकेल का?+ मी मंदिरात जाणार नाही!” १२  तेव्हा मला कळलं, की या संदेष्ट्याला देवाने पाठवलं नव्हतं, तर मला फसवण्यासाठी तोबीया आणि सनबल्लट+ यांनी त्याला पैसे दिले होते. १३  मला घाबरवण्यासाठी आणि पाप करायला लावण्यासाठी, त्याला पैसे देण्यात आले होते. यामुळे माझी बदनामी करण्याचं आणि माझ्यावर आरोप लावण्याचं त्यांना निमित्त मिळालं असतं. १४  तेव्हा मी अशी प्रार्थना केली: “हे माझ्या देवा, तोबीया+ आणि सनबल्लट यांनी जे केलं ते विसरू नकोस. तसंच, संदेष्टी नोअद्या आणि इतर संदेष्ट्यांनी मला सतत घाबरवण्याचा कसा प्रयत्न केला, तेही विसरू नकोस.” १५  अशा रितीने, अलूल* महिन्याच्या २५ व्या दिवशी, म्हणजे ५२ दिवसांत भिंत बांधून पूर्ण झाली. १६  ही गोष्ट जेव्हा आमच्या सर्व शत्रूंनी ऐकली आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांनी हे पाहिलं, तेव्हा त्यांना खूप लाज वाटली.+ आणि हे काम आमच्या देवाच्या मदतीनेच पूर्ण झालं होतं, हे त्यांना कळलं. १७  त्या दिवसांत, यहूदाच्या उच्च घराण्यांतले लोक+ तोबीयाला बरीच पत्रं पाठवायचे आणि तो त्यांची उत्तरं द्यायचा. १८  यहूदामधल्या बऱ्‍याच लोकांनी तोबीयाला साथ देण्याची शपथ घेतली होती. कारण तो आरहचा मुलगा+ शखन्याह याचा जावई होता आणि त्याचा मुलगा यहोहानान याने बरेख्याचा मुलगा मशुल्लाम+ याच्या मुलीशी लग्न केलं होतं. १९  शिवाय, ते लोक सतत मला तोबीयाबद्दल चांगल्या गोष्टी सांगत राहायचे आणि मी जे बोलायचो ते त्याला जाऊन सांगायचे. मग तोबीया मला घाबरवण्यासाठी पत्रं पाठवायचा.+

तळटीपा

शब्दशः “खोऱ्‍यातलं मैदान.”
किंवा “मोहर लावून बंद न केलेलं.”
शब्दशः “तुझ्या हृदयातल्या.”
शब्दशः “त्यांचे हात खाली पडतील.”