निर्गम १:१-२२

  • इजिप्तमध्ये इस्राएली लोकांची संख्या वाढते (१-७)

  • फारो इस्राएली लोकांचा छळ करतो (८-१४)

  • देवाला भिऊन वागणाऱ्‍या सुइणी मुलांचे जीव वाचवतात (१५-२२)

 इस्राएलसोबत* आपापलं कुटुंब घेऊन इजिप्तला* आलेल्या त्याच्या* मुलांची नावं अशी आहेत:+ २  रऊबेन, शिमोन, लेवी, आणि यहूदा;+ ३  इस्साखार, जबुलून, आणि बन्यामीन; ४  दान, नफताली, गाद, आणि आशेर.+ ५  याकोबपासून झालेल्या* त्याच्या वंशजांची* संख्या ७० होती. योसेफ आधीच इजिप्तमध्ये होता.+ ६  शेवटी योसेफ मरण पावला,+ तसंच त्याच्या सर्व भावांचा आणि त्या पिढीतल्या सर्व लोकांचाही मृत्यू झाला. ७  पुढे, इस्राएली लोक* फलदायी झाले आणि त्यांची संख्या खूप वाढू लागली. ते इतके शक्‍तिशाली झाले आणि इतक्या झपाट्याने वाढले, की त्यांनी संपूर्ण देश भरून टाकला.+ ८  पण, त्यानंतर इजिप्तमध्ये एक दुसरा राजा राज्य करू लागला. त्याला योसेफबद्दल माहीत नव्हतं. ९  म्हणून तो त्याच्या लोकांना म्हणाला: “पाहा, इस्राएलचे लोक आपल्यापेक्षा संख्येने जास्त आणि शक्‍तिशाली आहेत.+ १०  तर चला, आपण काहीतरी युक्‍ती करू या. नाहीतर ते असेच वाढत राहतील आणि जर युद्ध झालं, तर ते आपल्या शत्रूंना जाऊन मिळतील आणि आपल्याशी लढून, देश सोडून जातील.” ११  म्हणून इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांना सक्‍तीने मजुरी करायला लावून, त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी, गुलामांचे प्रमुख* नेमले.+ त्यांनी त्यांच्याकडून फारोसाठी पिथोम आणि रामसेस+ ही कोठारांची शहरं बांधून घेतली. १२  पण ते इस्राएली लोकांवर जितका अत्याचार करायचे, तितकेच ते वाढत जायचे आणि ते देशाच्या कानाकोपऱ्‍यांत पसरत गेले. यामुळे इजिप्तच्या लोकांना त्यांची दहशत बसली आणि ते त्यांचा द्वेष करू लागले.+ १३  म्हणून इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांना गुलाम बनवलं आणि ते त्यांच्याकडून अतिशय कठोर मेहनत करून घेऊ लागले.+ १४  त्यांनी त्यांच्याकडून बांधकामाचा चुना आणि विटा बनवून घेतल्या. तसंच शेतातही त्यांच्याकडून कष्टाची कामं करून घेतली. त्यांनी त्यांचा निर्दयीपणे छळ केला आणि त्यांच्याकडून बळजबरीने सर्व प्रकारची कामं करून घेतली.+ यामुळे इस्राएली लोकांना आपला जीव नकोसा झाला. १५  नंतर इजिप्तचा राजा, शिप्रा आणि पुवा या दोन इब्री सुइणींशी बोलला. १६  तो त्यांना म्हणाला: “तुम्ही जेव्हा इब्री स्त्रियांना बाळंतपणात मदत करायला+ जाल, तेव्हा मुलगा झाला की मुलगी हे पाहा. जर मुलगा असेल तर त्याला मारून टाका, पण जर मुलगी असेल तर तिला जिवंत ठेवा.” १७  पण त्या सुइणी खऱ्‍या देवाला भिऊन वागणाऱ्‍या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाचं ऐकलं नाही. त्याऐवजी त्या सगळ्या मुलांना जिवंत ठेवायच्या.+ १८  काही काळाने इजिप्तच्या राजाने सुइणींना बोलावून त्यांना विचारलं: “तुम्ही मुलांना जिवंत का ठेवलं?” १९  तेव्हा त्या सुइणी फारोला म्हणाल्या: “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांसारख्या नाहीत. त्या इतक्या सुदृढ आहेत, की सुईण त्यांना मदत करायला जायच्या आधीच त्यांच्या मुलांचा जन्म झालेला असतो.” २०  म्हणून देवाने त्या सुइणींचं भलं केलं आणि इस्राएली लोक वाढत गेले आणि शक्‍तिशाली होत गेले. २१  त्या सुइणी खऱ्‍या देवाला भिऊन वागल्यामुळे, देवाने नंतर त्यांना मुलंबाळं दिली. २२  शेवटी फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली: “इब्री लोकांच्या प्रत्येक नवीन जन्मलेल्या मुलाला नाईल नदीत फेकून द्या. पण प्रत्येक मुलीला जिवंत ठेवा.”+

तळटीपा

इस्राएल हे देवाने याकोबला दिलेलं नाव आहे.
किंवा “मिसरला.”
शब्दशः “याकोब.”
शब्दशः “याकोबच्या मांडीतून बाहेर आलेल्या.”
किंवा “जिवांची.”
शब्दशः “इस्राएलची मुलं.”
किंवा “मुकादम.”