निर्गम १८:१-२७
१८ यहोवाने मोशेसाठी आणि आपल्या लोकांसाठी, म्हणजेच इस्राएली लोकांसाठी कायकाय केलं आणि देवाने त्यांना इजिप्तमधून कशा प्रकारे बाहेर आणलं, हे मोशेचा सासरा म्हणजेच मिद्यानचा याजक इथ्रो+ याने ऐकलं.+
२ मोशेने आपली बायको सिप्पोरा हिला आपला सासरा इथ्रो याच्याकडे राहायला पाठवलं होतं.
३ त्याने आपल्या दोन मुलांनाही+ तिच्यासोबत पाठवलं होतं. त्याच्या एका मुलाचं नाव गेर्षोम*+ होतं, कारण मोशे म्हणाला: “मी एका परक्या देशात विदेशी झालो.”
४ त्याच्या दुसऱ्या मुलाचं नाव अलियेजर* होतं, कारण मोशे म्हणाला: “माझ्या वडिलांचा देव माझा सहायक आहे, त्याने मला फारोच्या तलवारीपासून वाचवलं.”+
५ मग मोशेचा सासरा इथ्रो, मोशेच्या मुलांना आणि बायकोला घेऊन ओसाड रानात त्याच्याजवळ आला. तेव्हा मोशेने खऱ्या देवाच्या पर्वताजवळ तळ दिला होता.+
६ मग त्याने मोशेला असा निरोप पाठवला: “मी इथ्रो तुझा सासरा,+ तुझ्या बायकोला आणि दोन मुलांना घेऊन तुझ्याकडे येत आहे.”
७ तेव्हा मोशे लगेच आपल्या सासऱ्याला भेटायला गेला. मग त्याने त्याला वाकून नमस्कार केला आणि त्याचं चुंबन घेतलं. दोघांनी एकमेकांची विचारपूस केल्यावर ते तंबूमध्ये गेले.
८ मग, यहोवाने इस्राएली लोकांना कसं सोडवलं होतं याविषयीचा सगळा वृत्तान्त मोशेने आपल्या सासऱ्याला सांगितला.+ इस्राएली लोकांसाठी यहोवाने फारोवर आणि इजिप्तवर कोणकोणत्या पीडा आणल्या आणि वाटेत त्यांना कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागला,+ हेही त्याने त्याला सांगितलं.
९ इस्राएली लोकांना इजिप्तमधून* सोडवून यहोवाने त्यांच्याबद्दल जो चांगुलपणा दाखवला होता, त्याबद्दल ऐकल्यावर इथ्रोला खूप आनंद झाला.
१० म्हणून इथ्रो म्हणाला: “ज्या यहोवाने तुमची इजिप्तमधून आणि फारोच्या हातून सुटका केली आणि ज्याने आपल्या लोकांना इजिप्तच्या मुठीतून सोडवलं, त्याची स्तुती असो.
११ आता मला कळलं आहे की यहोवा इतर सर्व देवांपेक्षा महान आहे,+ कारण त्याने आपल्या लोकांशी मगरूरपणे वागणाऱ्यांना शिक्षा दिली.”
१२ मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होमार्पण आणि बलिदानं दिली. तेव्हा अहरोन आणि इस्राएलचे सर्व वडीलजन खऱ्या देवासमोर मोशेच्या सासऱ्यासोबत जेवायला आले.
१३ दुसऱ्या दिवशी, मोशे नेहमीप्रमाणे लोकांचा न्याय करण्यासाठी बसला. लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोशेसमोर उभे होते.
१४ मोशे लोकांसाठी जे करत होता, ते त्याच्या सासऱ्याने पाहिलं तेव्हा तो म्हणाला: “तू हे काय करत आहेस? आणि हे सगळं तू एकटाच का करतोस?”
१५ तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला म्हणाला: “लोक देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी माझ्याकडे येतात.
१६ एखादी समस्या निर्माण झाली, तर लोक ती माझ्याकडे आणतात. मग मी त्यांचा न्याय करतो आणि देवाचे निर्णय आणि त्याचे नियम त्यांना कळवतो.”+
१७ मोशेचा सासरा त्याला म्हणाला: “तू जे करत आहेस ते योग्य नाही.
१८ असं केल्याने तू आणि तुझ्यासोबतचे हे लोकही थकून जातील. कारण हे काम फार मोठं आहे, तुला एकट्याला ते झेपणार नाही.
१९ मी तुला जो सल्ला देतो तो ऐक आणि देव तुझ्यासोबत असेल.+ तू खऱ्या देवासमोर लोकांच्या वतीने बोल+ आणि त्यांच्या समस्या देवासमोर मांड.+
२० तू त्यांना देवाचे नियम आणि कायदे शिकव+ आणि त्यांनी कोणत्या मार्गाने चाललं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, हे त्यांना समजावून सांग.
२१ पण सोबतच तू लोकांमधून देवाला भिऊन वागणारे, भरवशालायक असलेले आणि बेइमानीच्या कमाईचा द्वेष करणारे+ योग्य असे पुरुष निवड.+ तू त्यांना हजार जणांवर, शंभर जणांवर, पन्नास जणांवर आणि दहा जणांवर प्रमुख म्हणून नेम.+
२२ समस्या निर्माण होतात तेव्हा* त्यांनी लोकांचा न्याय करावा. लहानमोठ्या समस्या त्यांनी स्वतः सोडवाव्यात, पण एखादी कठीण समस्या आली तर त्यांनी ती तुझ्याकडे आणावी.+ तुझा काही भार त्यांना उचलू दे म्हणजे तुझं काम सोपं होईल.+
२३ जर तू असं केलंस आणि देवानेही तुला तशी आज्ञा दिली, तर तुझ्यावरचा भार कमी होईल आणि लोकही आनंदाने आपापल्या घरी जातील.”
२४ मोशेने लगेच आपल्या सासऱ्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याने जे काही सांगितलं होतं, त्याप्रमाणे केलं.
२५ त्याने इस्राएली लोकांमधून योग्य माणसांना निवडून, त्यांना हजार जणांवर, शंभर जणांवर, पन्नास जणांवर आणि दहा जणांवर प्रमुख नेमलं.
२६ समस्या निर्माण व्हायच्या तेव्हा ते लोकांचा न्याय करायचे. लहानमोठ्या समस्या ते स्वतः सोडवायचे, पण एखादी कठीण समस्या आली तर ती समस्या ते मोशेकडे घेऊन यायचे.+
२७ मग मोशेने आपल्या सासऱ्याला निरोप दिला+ आणि इथ्रो आपल्या देशात परत गेला.
तळटीपा
^ म्हणजे, “तिथे एक विदेशी.”
^ म्हणजे, “देव माझा सहायक आहे.”
^ शब्दशः “इजिप्तच्या हातून.”
^ शब्दशः “प्रत्येक वेळी.”