निर्गम २२:१-३१

  • इस्राएली लोकांसाठी कायदे (१-३१)

    • चोरीविषयी (१-४)

    • पिकांच्या नुकसानाविषयी (५, ६)

    • नुकसान भरपाई आणि मालकी हक्काविषयी (७-१५)

    • कुमारीला फसवण्याविषयी (१६, १७)

    • उपासना आणि सामाजिक जीवनाविषयी (१८-३१)

२२  एखाद्या माणसाने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापलं किंवा विकलं, तर त्याने बैलाच्या बदल्यात पाच बैल आणि मेंढराच्या बदल्यात चार मेंढरं, अशी भरपाई करावी.+ २  (जर एखादा चोर+ घरात घुसताना सापडला आणि जर त्याला मारल्यामुळे तो मेला, तर त्याच्याबद्दल रक्‍तदोष लागणार नाही. ३  पण जर हे सूर्योदयानंतर घडलं तर मात्र रक्‍तदोष लागेल.) त्याने भरपाई केलीच पाहिजे. जर त्याच्याजवळ काहीही नसेल, तर त्याला विकून चोरलेल्या वस्तूंची भरपाई केली जावी. ४  त्याने चोरलेलं जनावर त्याच्याजवळ जिवंत सापडलं, तर त्याला दुप्पट भरपाई करावी लागेल; मग ते जनावर बैल असो, गाढव असो किंवा मेंढरू असो. ५  जर कोणी आपल्या जनावरांना चरायला नेलं आणि त्यांना दुसऱ्‍याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात चरायला जाऊ दिलं, तर त्याला आपल्या शेतातलं किंवा द्राक्षमळ्यातलं सर्वात चांगलं पीक देऊन भरपाई करावी लागेल. ६  जर आग लागून ती झाडांझुडपांत पसरली आणि कापून ठेवलेल्या धान्याच्या पेंढ्या, शेतातलं धान्य किंवा संपूर्ण शेत जळून गेलं, तर ज्याने आग पेटवली होती त्याने जळलेल्या गोष्टींची भरपाई करावी. ७  जर एखाद्याने शेजाऱ्‍याकडे पैसे किंवा काही वस्तू ठेवायला दिल्या आणि जर या गोष्टी त्याच्या घरातून चोरीला गेल्या, तर तो चोर सापडल्यावर त्या चोराला दुप्पट भरपाई द्यावी लागेल.+ ८  पण चोर सापडला नाही, तर घरमालकाने आपल्या शेजाऱ्‍याच्या गोष्टी घेतल्या आहेत किंवा नाही, हे ठरवण्यासाठी त्याला खऱ्‍या देवासमोर आणावं.+ ९  कोणीही दुसऱ्‍या माणसावर त्याच्या मालकीच्या नसलेल्या वस्तू आपल्याजवळ ठेवण्याचा आरोप लावला, तर खरा मालक कोण आहे हे ठरवण्यासाठी त्यांनी देवासमोर जावं;+ मग बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र किंवा दुसरी कोणतीही वस्तू हरवलेली असो. त्यांच्यापैकी दोषी कोण, हे देव सांगेल आणि त्याने आपल्या शेजाऱ्‍याला दुप्पट भरपाई द्यावी.+ १०  जर एखाद्याने आपल्या शेजाऱ्‍याकडे गाढव, बैल, मेंढरू किंवा इतर कोणतंही जनावर ठेवायला दिलं आणि ते मेलं किंवा त्याला काही इजा झाली किंवा कोणी बघत नसताना त्याला एखाद्याने नेलं, ११  तर ज्याच्याकडे जनावर ठेवलं होतं त्याने यहोवासमोर शपथ घ्यावी, की त्याने आपल्या शेजाऱ्‍याची वस्तू घेतली नाही आणि जनावराच्या मालकाने ही गोष्ट मान्य करावी. मग त्या माणसाला भरपाई द्यावी लागणार नाही.+ १२  पण जर ते जनावर त्याच्याकडून चोरीला गेलं असेल, तर त्याला त्याच्या मालकाला भरपाई द्यावी लागेल. १३  जर त्या जनावराला एखाद्या जंगली प्राण्याने फाडून खाल्लं असेल, तर त्याने ते पुरावा म्हणून आणावं. जंगली प्राण्याने फाडलेल्या जनावरासाठी त्याला भरपाई द्यावी लागणार नाही. १४  जर एखाद्याने आपल्या शेजाऱ्‍याकडून काही काळासाठी जनावर मागून घेतलं असेल आणि त्याचा मालक त्याच्यासोबत नसताना ते जनावर मेलं किंवा त्याला काही इजा झाली, तर ज्या माणसाने ते मागून घेतलं होतं त्याने त्याची भरपाई द्यावी. १५  जर जनावराचा मालक त्याच्यासोबत असेल, तर त्याला त्याची भरपाई द्यावी लागणार नाही. जर ते भाड्याने घेतलं असेल, तर त्याच्यासाठी दिलेलं भाडं हेच त्याची भरपाई असेल. १६  जर एखाद्या माणसाने लग्न न ठरलेल्या कुमारीला फसवून तिच्याशी संबंध ठेवले, तर त्याने वधुमूल्य देऊन तिला आपली बायको म्हणून स्वीकारावं.+ १७  तिच्या वडिलांनी लग्नाला साफ नकार दिला, तरी त्याला वधुमूल्याइतकी रक्कम द्यावी लागेल. १८  जादूटोणा करणाऱ्‍या स्त्रीला जिवंत ठेवू नका.+ १९  प्राण्यासोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्‍याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ २०  यहोवाला सोडून इतर कोणत्याही देवांना बलिदानं अर्पण करणाऱ्‍याला ठार मारलं जावं.+ २१  तुम्ही कोणत्याही विदेशी रहिवाशासोबत वाईट वागू नका किंवा त्याच्यावर अत्याचार करू नका,+ कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी म्हणून राहत होता.+ २२  तुम्ही कोणत्याही विधवेला किंवा अनाथ* मुलाला त्रास देऊ नका.+ २३  जर तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे त्रास दिला आणि त्याने माझ्याकडे मदतीची याचना केली, तर मी त्याची याचना ऐकल्याशिवाय राहणार नाही;+ २४  माझा राग तुमच्याविरुद्ध भडकेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन. तुमच्या बायका विधवा होतील आणि तुमची मुलं अनाथ होतील. २५  माझ्या लोकांपैकी तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या कोणत्याही गरीब* माणसाला तुम्ही पैसे उसने दिले, तर त्याच्यासोबत सावकारासारखं* वागू नका. त्याच्याकडून व्याज घेऊ नका.+ २६  आपल्या शेजाऱ्‍याला कर्ज देताना तुम्ही त्याचं वस्त्र गहाण* ठेवून घेतलं असेल,+ तर सूर्य मावळायच्या आत त्याला ते परत करा. २७  कारण अंग झाकण्यासाठी त्याच्याजवळ ते एकच वस्त्र आहे. त्यामुळे झोपताना तो अंगावर काय घेईल?+ त्याने माझ्याकडे मदतीची याचना केली, तर मी त्याचं नक्की ऐकेन कारण मी करुणामय* आहे.+ २८  तुम्ही देवाला किंवा तुमच्यातल्या कोणत्याही प्रधानाला* शाप देऊ नका.*+ २९  तुम्हाला मिळणाऱ्‍या भरपूर पिकांतून आणि तुमच्याकडे भरून वाहणाऱ्‍या तेलातून आणि द्राक्षारसातून मला अर्पण करायला मागेपुढे पाहू नका.+ तुमच्या मुलांपैकी प्रथमपुत्र मला द्या.+ ३०  तुमच्या प्रथम जन्मलेल्या वासरांसोबत आणि मेंढरांसोबत असं करा:+ सात दिवस ते आपल्या आईसोबत राहील. पण आठव्या दिवशी तुम्ही ते मला द्या.+ ३१  तुम्ही माझे पवित्र लोक असायला पाहिजे.+ रानात जंगली प्राण्याने फाडलेल्या कोणत्याही जनावराचं मांस खाऊ नका.+ ते कुत्र्यांना टाकून द्या.

तळटीपा

किंवा “वडील नसलेल्या.”
किंवा “व्याजखोरासारखं.”
किंवा “त्रासात असलेल्या.”
किंवा “तारण म्हणून.”
किंवा “कृपाळू.”
किंवा “शासकाला.”
किंवा “निंदा करू नका.”