निर्गम २३:१-३३

  • इस्राएली लोकांसाठी कायदे (१-१९)

    • प्रामाणिक आणि योग्य वागणुकीविषयी (१-९)

    • शब्बाथ आणि सणांविषयी (१०-१९)

  • इस्राएली लोकांना स्वर्गदूताचं मार्गदर्शन (२०-२६)

  • जमीन खरेदी आणि हद्दींविषयी (२७-३३)

२३  तुम्ही अफवा पसरवू* नका.+ एखाद्याचं वाईट करण्याच्या हेतूने साक्ष देऊन दुष्टाची साथ देऊ नका.+ २  पुष्कळ लोक करत आहेत, म्हणून एखादी वाईट गोष्ट करू नका. पुष्कळ लोकांना साथ देण्यासाठी न्यायाच्या विरोधात असलेली साक्ष देऊ नका. ३  गरीब माणसाचा वाद सोडवताना, पक्षपात करू नका.+ ४  तुमच्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा त्याचं गाढव तुम्हाला सापडलं, तर ते त्याला परत करा.+ ५  तुमचा द्वेष करणाऱ्‍या एखाद्याचं गाढव ओझ्याखाली दबून खाली पडलेलं दिसलं, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ नका. गाढवाला सोडवण्यासाठी त्या माणसाला मदत करा.+ ६  तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या गरिबाच्या खटल्यात चुकीचा न्याय करू नका.+ ७  खोट्या आरोपांपासून* दूर राहा आणि निर्दोष व नीतिमान यांचा जीव घेऊ नका. कारण असं दुष्ट काम करणाऱ्‍याला मी निर्दोष* ठरवणार नाही.+ ८  लाच घेऊ नका, कारण लाच डोळस माणसांना आंधळं बनवते आणि प्रामाणिक माणसाला आपले निर्णय बदलायला लावू शकते.+ ९  विदेशी माणसावर अत्याचार करू नका. विदेश्‍याची परिस्थिती काय असते* हे तुम्हाला चांगलं माहीत आहे, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी म्हणून राहत होता.+ १०  सहा वर्षं तुमच्या जमिनीत पेरणी करून पीक गोळा करा.+ ११  पण सातव्या वर्षी तिची लागवड करू नका, ती पडीक राहू द्या. म्हणजे तुमच्यातले गरीब लोक त्यात जे उगवेल ते खातील आणि जे उरेल ते रानातली जनावरं खातील. तुमचे द्राक्षमळे आणि जैतुनाच्या बागा यांच्या बाबतीतही असंच करा. १२  सहा दिवस तुम्ही आपलं काम करा, पण सातव्या दिवशी कोणतंही काम करू नका. म्हणजे तुमच्या बैलाला व गाढवाला आराम मिळेल आणि तुमच्या दासीच्या मुलाला व तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍याला ताजंतवानं होता येईल.+ १३  मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक पाळा;+ दुसऱ्‍या देवांच्या नावांचा उल्लेख करू नका; त्यांचं नाव तुमच्या ओठांवरही* येऊ देऊ नका.+ १४  वर्षातून तीन वेळा माझ्यासाठी सण साजरा करा.+ १५  तुम्ही बेखमीर* भाकरींचा सण साजरा करा.+ मी तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, अबीब* महिन्याच्या ठरलेल्या वेळी तुम्ही सात दिवस बेखमीर भाकरी खा.+ कारण याच वेळी तुम्ही इजिप्तमधून बाहेर आला होता. कोणीही माझ्यासमोर रिकाम्या हाती येऊ नये.+ १६  तसंच, तुम्ही शेतात कष्टाने पेरलेल्या धान्याचं पहिलं पीक तयार होईल, तेव्हा कापणीचा सण* साजरा करा;+ आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा तुम्ही आपल्या कष्टाचं फळ शेतातून गोळा कराल, तेव्हा पीक गोळा करण्याचा सण* साजरा करा.+ १७  वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी खरा प्रभू यहोवा याच्यासमोर हजर व्हावं.+ १८  मला बलिदान केलेल्या प्राण्याच्या रक्‍तासोबत तुम्ही खमीर* असलेलं काहीही अर्पण करू नका. माझ्या सणांमध्ये अर्पण केलेली चरबी दुसऱ्‍या दिवशी सकाळपर्यंत राहू देऊ नका. १९  तुमच्या जमिनीच्या पहिल्या पिकातला सर्वात चांगला भाग तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या घरात घेऊन या.+ तुम्ही बकरीच्या पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात उकळू नका.+ २०  मार्गात तुमचं रक्षण करण्यासाठी आणि मी तुमच्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी तुम्हाला आणण्यासाठी, मी तुमच्यापुढे एका स्वर्गदूताला पाठवत आहे.+ २१  त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याचं ऐका. त्याच्याविरुद्ध बंड करू नका. तो तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही,+ कारण माझं नाव त्याच्यात आहे. २२  तुम्ही जर त्याचं मनापासून ऐकलं आणि मी तुम्हाला सांगितलेलं सर्वकाही केलं, तर मी तुमच्या शत्रूंचा शत्रू आणि तुमच्या विरोधकांचा विरोधक होईन. २३  माझा स्वर्गदूत तुमच्यापुढे जाऊन तुम्हाला अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी आणि यबूसी लोकांकडे आणेल आणि मी त्यांचा सर्वनाश करीन.+ २४  तुम्ही त्यांच्या देवांपुढे वाकू नका किंवा त्यांची सेवा करायला तयार होऊ नका. त्यांच्या चालीरीतींचं अनुकरण करू नका.+ उलट, तुम्ही त्यांचा नाश करा आणि त्यांच्या पूजेच्या स्तंभांचा चुराडा करा.+ २५  तुम्ही तुमचा देव यहोवा याची उपासना करा+ म्हणजे तो तुम्हाला अन्‍नपाणी देऊन आशीर्वाद देईल.+ मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.+ २६  तुमच्या देशातल्या स्त्रियांचे गर्भपात होणार नाहीत किंवा त्या वांझ असणार नाहीत.+ मी तुम्हाला भरपूर आयुष्य देईन. २७  ज्या देशांत तुम्ही जाल तिथल्या लोकांना आधीच माझी दहशत बसेल,+ आणि ज्या लोकांशी तुमचा सामना होईल त्यांना मी गोंधळात टाकीन. मी तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजयी करीन आणि ते तुमच्यापासून पळ काढतील.*+ २८  तुम्ही हिव्वी, कनानी, आणि हित्ती लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच ते निराश होतील*+ आणि तुमच्यापुढून निघून जातील.+ २९  मी त्यांना एका वर्षातच तुमच्यापुढून घालवणार नाही, कारण असं झालं तर देश ओसाड पडेल आणि रानातले जंगली पशू वाढून तुम्हाला त्रास देतील.+ ३०  म्हणून, तुमची संख्या वाढून तुम्ही संपूर्ण प्रदेशाचा ताबा घेईपर्यंत मी त्यांना हळूहळू तुमच्यापुढून घालवून देईन.+ ३१  मी तुमच्या देशाची सीमा तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि ओसाड रानापासून नदीपर्यंत* ठरवून देईन.+ मी देशाच्या रहिवाशांना तुमच्या ताब्यात देईन आणि तुम्ही त्यांना तुमच्यापुढून घालवून द्याल.+ ३२  तुम्ही त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी करार करू नका.+ ३३  त्यांना तुमच्या देशात वस्ती करू देऊ नका, नाहीतर ते तुम्हाला माझ्या विरोधात पाप करायला लावतील. तुम्ही जर त्यांच्या देवांची उपासना केली, तर ते तुमच्यासाठी पाश ठरतील.”+

तळटीपा

शब्दशः “उचलणं.”
शब्दशः “शब्द.”
किंवा “नीतिमान.”
किंवा “जीवन कसं असतं.”
शब्दशः “तोंडात.”
याला मंडपांचा सण असंही म्हणतात.
याला सप्ताहांचा सण किंवा पेन्टेकॉस्ट असंही म्हणतात.
किंवा “तुमचे सर्व शत्रू मागे फिरतील.”
किंवा कदाचित, “कावरेबावरे होतील; दहशत बसेल.”
म्हणजे, फरात नदी.