निर्गम ३:१-२२

  • मोशे आणि जळणारं काटेरी झुडूप (१-१२)

  • यहोवा आपल्या नावाचा अर्थ सांगतो (१३-१५)

  • यहोवा मोशेला सूचना देतो (१६-२२)

 मोशे मेंढपाळ बनला आणि आपला सासरा, मिद्यानचा याजक इथ्रो+ याचे कळप चारू लागला. एकदा रानाच्या* पश्‍चिमेकडे कळपांना घेऊन जात असताना, तो खऱ्‍या देवाच्या पर्वताजवळ, म्हणजे होरेब पर्वताजवळ आला.+ २  तेव्हा, एका काटेरी झुडपात, आगीच्या ज्वालांमध्ये यहोवाचा* स्वर्गदूत त्याच्यासमोर प्रकट झाला.+ मोशे त्या झुडपाकडे पाहत असताना त्याला दिसलं, की त्या झुडपाला आग लागली आहे, पण ते जळत नाही. ३  म्हणून मोशे म्हणाला: “हा काय विचित्र प्रकार आहे आणि हे झुडूप जळत का नाही, हे जवळ जाऊन पाहायला हवं.” ४  मोशे ते पाहायला जवळ येत आहे हे यहोवाने पाहिलं, तेव्हा त्याने झुडपातून त्याला हाक मारून म्हटलं: “मोशे! मोशे!” तेव्हा मोशे म्हणाला: “मी इथे आहे.” ५  यावर तो म्हणाला: “आणखी पुढे येऊ नकोस. आपल्या पायांतले जोडे काढ, कारण जिथे तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे.” ६  तो पुढे म्हणाला: “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामचा देव,+ इसहाकचा देव+ आणि याकोबचा देव+ आहे.” तेव्हा मोशेने आपला चेहरा झाकला, कारण खऱ्‍या देवाकडे पाहण्याची त्याला भीती वाटली. ७  मग यहोवा म्हणाला: “मी इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या आपल्या लोकांचं दुःख पाहिलंय. त्यांच्याकडून बळजबरीने काम करून घेतलं जात असल्यामुळे, त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकलाय. त्यांना किती यातना सोसाव्या लागत आहेत, हे मला चांगलं माहीत आहे.+ ८  म्हणून मी खाली जाऊन त्यांना इजिप्तच्या लोकांच्या हातून सोडवीन+ आणि त्यांना दूध आणि मध वाहत असलेल्या एका चांगल्या आणि मोठ्या देशात;+ म्हणजेच कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांच्या प्रदेशात नेईन.+ ९  पाहा! इस्राएलच्या लोकांचा आक्रोश माझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि इजिप्तचे लोक त्यांचा किती क्रूरपणे छळ करत आहेत,+ हेही मी पाहिलंय. १०  तर आता चल, मी तुला फारोकडे पाठवतो आणि तू माझ्या लोकांना, म्हणजे इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणशील.”+ ११  पण मोशे खऱ्‍या देवाला म्हणाला: “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणणारा मी कोण?” १२  तेव्हा देव मोशेला म्हणाला: “मी तुझ्यासोबत असेन,+ आणि मीच तुला पाठवलं याचं चिन्ह हे असेल: तू इजिप्तमधून त्या लोकांना बाहेर आणल्यावर, तुम्ही याच पर्वतावर+ खऱ्‍या देवाची उपासना* कराल.” १३  पण मोशे खऱ्‍या देवाला म्हणाला: “समजा मी इस्राएली लोकांकडे जाऊन त्यांना म्हणालो, की ‘तुमच्या पूर्वजांच्या देवाने मला तुमच्याकडे पाठवलं,’ आणि समजा त्यांनी मला विचारलं, की ‘त्याचं नाव काय?’+ तर मी त्यांना काय उत्तर देऊ?” १४  तेव्हा देव मोशेला म्हणाला: “मला जे व्हायचं आहे,* ते मी होईन.”*+ मग तो पुढे म्हणाला: “तू इस्राएली लोकांना सांग, ‘मी होईन, याने मला तुमच्याकडे पाठवलं आहे.’”+ १५  मग देव पुन्हा मोशेला म्हणाला: “तू इस्राएली लोकांना असं सांग, ‘तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा देव,+ इसहाकचा देव+ आणि याकोबचा देव+ यहोवा, याने मला तुमच्याकडे पाठवलं आहे.’ हेच सर्वकाळासाठी माझं नाव आहे+ आणि याच नावाने मला पिढ्या न्‌ पिढ्या ओळखलं जाईल. १६  म्हणून आता जा आणि इस्राएलच्या वडीलजनांना जमा कर आणि त्यांना म्हण, ‘तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव यहोवा माझ्यासमोर प्रकट झाला आणि म्हणाला: “माझं तुमच्याकडे लक्ष आहे+ आणि इजिप्तमध्ये तुमच्यासोबत काय केलं जातंय, हेही मी पाहिलंय. १७  म्हणून मी ठरवलंय, की तुमचा छळ करणाऱ्‍या इजिप्तच्या लोकांपासून मी तुम्हाला दूर नेईन+ आणि कनानी, हित्ती, अमोरी,+ परिज्जी, हिव्वी आणि यबूसी+ यांच्या प्रदेशात, दूध आणि मध वाहत असलेल्या देशात तुम्हाला नेईन.”’+ १८  ते तुझं म्हणणं नक्की ऐकतील+ आणि तुम्ही, म्हणजे तू आणि इस्राएलचे वडीलजन इजिप्तच्या राजासमोर जाऊन त्याला म्हणा: ‘इब्री लोकांचा देव यहोवा+ आमच्याशी बोललाय. म्हणून कृपा करून आम्हाला तीन दिवसांचा प्रवास करून ओसाड रानात जाऊ द्या, म्हणजे आम्हाला आमचा देव, यहोवा याला बलिदान अर्पण करता येईल.’+ १९  पण मला हे चांगलं माहीत आहे, की जोपर्यंत मी माझा शक्‍तिशाली हात इजिप्तच्या राजाविरुद्ध उचलणार नाही, तोपर्यंत तो तुम्हाला जायची परवानगी देणार नाही.+ २०  म्हणून, मी इजिप्तच्या विरोधात माझा हात उगारून, तिथे बरीच अद्‌भुत कार्यं करीन आणि त्यानंतर तो तुम्हाला जाऊ देईल.+ २१  मी इजिप्तच्या लोकांना तुमच्यावर कृपा करायला लावीन आणि जेव्हा तुम्ही तिथून निघाल, तेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जाणार नाही.+ २२  प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीकडून आणि आपल्या घरी राहणाऱ्‍या स्त्रीकडून सोन्याचांदीचे दागिने आणि कपडे मागावेत आणि ते आपल्या मुलामुलींच्या अंगावर घालावेत; अशा रितीने तुम्ही इजिप्तच्या लोकांना लुटाल.”+

तळटीपा

किंवा “ओसाड रानाच्या.”
किंवा “सेवा.”
किंवा “मी जे सिद्ध होईन, ते सिद्ध होईन.” अति. क४ पाहा.
किंवा “मी जे व्हायचं निवडीन.”