निर्गम ४:१-३१
४ तेव्हा मोशे म्हणाला: “पण कदाचित ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि ‘यहोवा तुझ्यासमोर प्रकट झालाच नाही,’ असं म्हणून ते कदाचित माझं ऐकणार नाहीत.”+
२ मग यहोवा त्याला म्हणाला: “तुझ्या हातात काय आहे?” तो म्हणाला: “काठी.”
३ यावर तो म्हणाला: “ती जमिनीवर फेक.” तेव्हा त्याने ती जमिनीवर फेकली आणि तिचा साप झाला.+ तेव्हा, मोशे तिथून पळाला.
४ यहोवा मोशेला म्हणाला: “हात पुढे करून त्याचं शेपूट धर.” तेव्हा त्याने हात पुढे करून ते धरलं आणि त्याची पुन्हा त्याच्या हातात काठी झाली.
५ मग देव म्हणाला: “यावरून ते विश्वास ठेवतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव यहोवा+ तुझ्यासमोर प्रकट झाला.”+
६ यहोवा पुन्हा त्याला म्हणाला: “तुझा हात अंगरख्याच्या आत छातीवर ठेव.” तेव्हा त्याने आपला हात अंगरख्याच्या आत छातीवर ठेवला. त्याने हात बाहेर काढला, तेव्हा तो कुष्ठरोगाने* बर्फासारखा पांढराफटक झाला होता!+
७ मग तो त्याला म्हणाला: “तुझा हात पुन्हा अंगरख्याच्या आत छातीवर ठेव.” म्हणून त्याने आपला हात पुन्हा छातीवर ठेवला. त्याने हात बाहेर काढला, तेव्हा तो आधीसारखाच बरा झाला होता!
८ देव म्हणाला: “जर त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि पहिल्या चिन्हाकडे लक्ष दिलं नाही, तर ते दुसऱ्या चिन्हाकडे+ नक्कीच लक्ष देतील.
९ आणि जर त्यांनी या दोन्ही चिन्हांवर विश्वास ठेवला नाही आणि तुझं ऐकलं नाही, तर तू नाईल नदीतलं थोडं पाणी घेऊन ते कोरड्या जमिनीवर ओत. तू ओतलेल्या पाण्याचं कोरड्या जमिनीवर रक्त होईल.”+
१० यानंतर मोशे यहोवाला म्हणाला: “मला माफ कर यहोवा, पण मला पूर्वीपासूनच नीट बोलता येत नाही. आधीही येत नव्हतं आणि तू तुझ्या या सेवकाशी बोललास, त्यानंतरही नाही. कारण माझी जीभ जड आहे.”+
११ यहोवा त्याला म्हणाला: “माणसाला तोंड कोणी दिलं? आणि त्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी यहोवाच नाही का?
१२ म्हणून आता जा आणि जेव्हा तू बोलशील तेव्हा मी तुझ्यासोबत असेन* आणि काय बोलायचं ते मी तुला शिकवीन.”+
१३ पण तो म्हणाला: “मला माफ कर यहोवा, तू कृपा करून दुसऱ्या कोणालातरी पाठव.”
१४ तेव्हा यहोवा मोशेवर संतापला आणि त्याला म्हणाला: “बघ, तुझा भाऊ लेवी अहरोन+ तुला भेटायला येतोय. मला माहीत आहे की त्याला चांगलं बोलता येतं. तुला पाहिल्यावर त्याला खूप आनंद होईल.+
१५ तू त्याच्याशी बोल आणि मी तुला जे सांगितलं, ते त्याला सांग.+ तुम्ही बोलाल, तेव्हा मी तुमच्यासोबत असेन+ आणि तुम्ही काय करायला हवं, ते मी तुम्हाला शिकवीन.
१६ तो तुझा प्रवक्ता* होऊन तुझ्या वतीने लोकांशी बोलेल आणि तू त्याच्यासाठी देवासारखा होशील.*+
१७ ही काठी हातात घेऊन तू बरीच चिन्हं करशील.”+
१८ त्यानंतर मोशे आपला सासरा इथ्रो+ याच्याकडे जाऊन म्हणाला: “माझ्या भाऊबंदांचं कसं चाललं आहे, हे पाहण्यासाठी कृपा करून मला इजिप्तला जाऊ द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला: “शांतीने जा.”
१९ मग यहोवा मिद्यान देशात मोशेला म्हणाला: “इजिप्तला परत जा, कारण तुझ्या जिवावर उठलेले सगळे लोक मरण पावले आहेत.”+
२० तेव्हा मोशेने आपल्या बायकोला आणि मुलांना गाढवावर बसवलं आणि त्यांना घेऊन तो इजिप्तला जायला निघाला. त्याने खऱ्या देवाची काठीही सोबत घेतली.
२१ मग यहोवा मोशेला म्हणाला: “मी तुला जे चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे, ते इजिप्तला परत गेल्यावर फारोसमोर करून दाखव.+ पण, मी त्याचं मन कठोर होऊ देईन+ आणि तो माझ्या लोकांना जाऊ देणार नाही.+
२२ तू फारोला म्हण: ‘यहोवा असं म्हणतो: “इस्राएल माझा मुलगा, माझा प्रथमपुत्र आहे.+
२३ मी तुला सांगतो, माझ्या मुलाला माझी सेवा करण्यासाठी जाऊ दे. पण जर तू त्याला जाऊ दिलं नाहीस, तर मी तुझ्या मुलाला, तुझ्या प्रथमपुत्राला ठार मारीन.”’”+
२४ मग प्रवासात एका मुक्कामाच्या ठिकाणी यहोवा+ त्याला भेटला आणि तो त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करू लागला.+
२५ शेवटी, सिप्पोराने+ एक धारदार दगड* घेतला आणि आपल्या मुलाची सुंता केली आणि त्याची अग्रत्वचा त्याच्या पायावर ठेवली आणि म्हणाली: “कारण तू माझ्यासाठी रक्ताचा नवरा आहेस.”
२६ तेव्हा त्याने त्याला जाऊ दिलं. त्या वेळी तिने सुंतेमुळे, “रक्ताचा नवरा” असं म्हटलं.
२७ मग यहोवा अहरोनला म्हणाला: “ओसाड रानात जाऊन मोशेला भेट.”+ तेव्हा तो गेला आणि खऱ्या देवाच्या पर्वतावर+ जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचं चुंबन घेतलं.
२८ यहोवाने आपल्याला सांगितलेल्या सर्व गोष्टी,+ तसंच त्याने जी चिन्हं करण्याची आज्ञा दिली होती, त्या सगळ्या चिन्हांबद्दल,+ मोशेने अहरोनला सांगितलं.
२९ त्यानंतर, मोशे आणि अहरोन यांनी जाऊन इस्राएलच्या सर्व वडीलजनांना एकत्र केलं.+
३० यहोवाने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी अहरोनने त्यांना सांगितल्या आणि त्याने त्यांच्यासमोर ती सगळी चिन्हं करून दाखवली.+
३१ तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला.+ यहोवाने इस्राएली लोकांकडे लक्ष दिलं आहे+ आणि त्यांचं दुःख पाहिलं आहे+ हे त्यांनी ऐकलं, तेव्हा त्यांनी जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “तुझ्या तोंडासोबत.”
^ किंवा “प्रतिनिधी.”
^ किंवा “त्याच्यासाठी देवाचा प्रतिनिधी होशील.”
^ किंवा “गारगोटीचा सुरा.”