निर्गम ४०:१-३८

  • उपासना मंडप उभा करणं (१-३३)

  • उपासना मंडप यहोवाच्या तेजाने भरून जातो (३४-३८)

४०  मग यहोवा मोशेला म्हणाला: २  “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तू उपासना मंडप, म्हणजे भेटमंडप उभा कर.+ ३  त्यात साक्षपेटी ठेव+ आणि ती दिसू नये म्हणून तिच्यासमोर पडदा लाव.+ ४  मग तू मेज+ मंडपात आणून त्याच्यावरच्या वस्तू नीट रचून ठेव. त्यानंतर तू दीपवृक्ष+ आण आणि त्याचे दिवे पेटव.+ ५  मग सोन्याने मढवलेली धूपवेदी+ साक्षपेटीसमोर ठेव आणि उपासना मंडपाच्या प्रवेशाचा पडदा लाव.+ ६  होमार्पणाची वेदी+ उपासना मंडपाच्या, म्हणजेच भेटमंडपाच्या प्रवेशासमोर ठेव. ७  मग तू तांब्याचं मोठं भांडं* भेटमंडपाच्या आणि वेदीच्या मधोमध ठेव आणि त्यात पाणी भर.+ ८  नंतर उपासना मंडपाच्या सभोवती अंगण+ तयार कर आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा+ लाव. ९  मग तू अभिषेकाचं तेल+ घेऊन उपासना मंडप आणि त्यातल्या सर्व वस्तूंचा अभिषेक कर;+ तसंच उपासना मंडप आणि त्यातली सर्व भांडी तू पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल. १०  तू होमार्पणाच्या वेदीचा आणि तिच्या सर्व भांड्यांचा अभिषेक कर आणि वेदी पवित्र कर, म्हणजे ती परमपवित्र वेदी होईल.+ ११  मग तांब्याच्या मोठ्या भांड्याचा आणि त्याच्या बैठकीचा अभिषेक कर आणि ते पवित्र कर. १२  यानंतर, अहरोन आणि त्याच्या मुलांना भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ आणून त्यांना अंघोळ घाल.+ १३  मग तू अहरोनला पवित्र वस्त्रं घाल+ आणि त्याचा अभिषेक करून+ त्याला पवित्र कर, म्हणजे तो याजक म्हणून माझी सेवा करू शकेल. १४  नंतर त्याच्या मुलांना पुढे आणून त्यांना अंगरखे घाल.+ १५  मग त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांचाही अभिषेक कर,+ म्हणजे ते याजक म्हणून माझी सेवा करू शकतील. त्यांच्या अभिषेकामुळे याजकपद पिढ्या न्‌ पिढ्या, कायमचं त्यांचं राहील.”+ १६  यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने सर्वकाही केलं.+ त्याने अगदी तसंच केलं. १७  दुसऱ्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, उपासना मंडप उभा करण्यात आला.+ १८  मोशेने उपासना मंडप उभा करण्यासाठी त्याच्या खाच असलेल्या बैठका*+ मांडल्या, त्यांवर चौकटी+ बसवल्या, त्याचे दांडे+ घातले आणि त्याचे खांब उभे केले. १९  यानंतर त्याने उपासना मंडपाची कापडं+ त्यावर टाकली आणि त्यांवर आच्छादनं+ घातली. यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. २०  मग मोशेने साक्षलेखाच्या पाट्या+ साक्षपेटीमध्ये+ ठेवल्या आणि साक्षपेटीच्या कड्यांमध्ये दांडे+ घालून तिच्यावर झाकण+ ठेवलं. २१  त्याने साक्षपेटी उपासना मंडपात आणून, ती दिसू नये म्हणून तिच्यासमोर पडदा+ लावला.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. २२  मग त्याने भेटमंडपात पडद्याबाहेर, म्हणजेच उपासना मंडपाच्या उत्तरेकडे मेज+ ठेवलं. २३  त्याने त्या मेजावर यहोवासमोर भाकरी रचून ठेवल्या.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. २४  यानंतर त्याने भेटमंडपात मेजासमोर, म्हणजेच उपासना मंडपाच्या दक्षिणेकडे दीपवृक्ष+ ठेवला. २५  मग त्याने यहोवासमोर दिवे पेटवले.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. २६  नंतर त्याने सोन्याने मढवलेली वेदी+ भेटमंडपात पडद्यासमोर ठेवली. २७  ती वेदी सुगंधित धूप+ जाळण्यासाठी होती.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. २८  मग त्याने उपासना मंडपाच्या प्रवेशाचा पडदा+ लावला. २९  होमार्पणं+ आणि अन्‍नार्पणं देता यावीत म्हणून त्याने उपासना मंडपाच्या, म्हणजेच भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ होमार्पणाची वेदी+ ठेवली. यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. ३०  मग त्याने तांब्याचं मोठं भांडं भेटमंडपाच्या आणि वेदीच्या मधोमध ठेवलं आणि त्यात पाणी भरलं.+ ३१  मोशे, अहरोन आणि त्याच्या मुलांनी त्या भांड्याजवळ हातपाय धुतले. ३२  जेव्हा जेव्हा ते भेटमंडपात किंवा वेदीजवळ जायचे, तेव्हा तेव्हा, यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे ते हातपाय धुवायचे.+ ३३  शेवटी त्याने उपासना मंडप आणि वेदीभोवती अंगणाचे पडदे लावले+ आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा लावला.+ अशा रितीने मोशेने सर्व काम पूर्ण केलं. ३४  तेव्हा ढग भेटमंडपाला झाकू लागला आणि यहोवाच्या तेजाने उपासना मंडप भरून गेला.+ ३५  तो ढग तिथेच राहिला आणि यहोवाच्या तेजाने उपासना मंडप भरून गेला,+ त्यामुळे मोशे भेटमंडपात जाऊ शकला नाही. ३६  इस्राएली लोकांच्या संपूर्ण प्रवासात जेव्हा जेव्हा उपासना मंडपावरून तो ढग वर जायचा, तेव्हा तेव्हा ते लोक तळ हलवायचे.+ ३७  पण ढग वर जाईपर्यंत ते तळ हलवत नव्हते.+ ३८  उपासना मंडपावर दिवसा यहोवाचा ढग असायचा आणि रात्री आग असायची. इस्राएलच्या घराण्याच्या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांना हे दृश्‍य दिसत राहिलं.+

तळटीपा

किंवा “गंगाळ.”
म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.