नीतिवचनं ११:१-३१

  • मर्यादांची जाणीव ठेवणाऱ्‍याकडे बुद्धी असते ()

  • देवाची निंदा करणारा इतरांवर नाश आणतो ()

  • “पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे यश मिळतं” (१४)

  • उदार माणसाची संपत्ती वाढेल (२५)

  • संपत्तीवर भरवसा ठेवणारा खाली पडेल (२८)

११  खोट्या* तराजूची यहोवाला घृणा वाटते,पण अचूक वजनामुळे त्याला आनंद होतो.+  २  गर्व झाला की अपमान ठरलेला असतो,+पण जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात, त्यांच्याकडे बुद्धी असते.+  ३  सरळ लोकांचा खरेपणा त्यांना मार्ग दाखवतो,+पण विश्‍वासघातकी लोकांचा कपटीपणा त्यांचा नाश करतो.+  ४  क्रोधाच्या दिवशी संपत्तीचा* काहीच उपयोग होणार नाही,+पण नीतिमत्त्वामुळे मृत्यूपासून सुटका होईल.+  ५  निर्दोष माणसाचं नीतिमत्त्व त्याचा मार्ग सरळ करतं,पण दुष्ट आपल्याच दुष्टपणामुळे पडेल.+  ६  सरळ माणसांच्या नीतिमत्त्वामुळे त्यांची सुटका होते,+पण विश्‍वासघातकी लोक आपल्याच इच्छांच्या सापळ्यात अडकतील.+  ७  दुष्ट माणूस मरतो, तेव्हा त्याची आशा संपते;त्याने आपल्या शक्‍तीच्या जोरावर केलेल्या अपेक्षाही नाहीशा होतात.+  ८  नीतिमानाला संकटातून सोडवलं जाईलआणि दुष्ट त्याची जागा घेईल.+  ९  देवाची निंदा करणारा* आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्‍यावर नाश आणतो,पण नीतिमानांची ज्ञानामुळे सुटका होते.+ १०  नीतिमानाच्या चांगुलपणामुळे शहर खूश होतं;दुष्टाचा नाश होतो, तेव्हा लोक जल्लोष करतात.+ ११  सरळ लोकांच्या आशीर्वादामुळे शहराची भरभराट होते,+पण दुष्टाच्या तोंडामुळे ते जमीनदोस्त होतं.+ १२  ज्याला समज नसते तो आपल्या शेजाऱ्‍याला तुच्छ लेखतो,*पण जो खरोखर समंजस असतो, तो शांत राहतो.+ १३  बदनामी करणारा गुप्त गोष्टी सगळ्यांना सांगत फिरतो,+पण जो भरवशालायक असतो, तो त्या गुप्त ठेवतो.* १४  कुशल* मार्गदर्शन मिळालं नाही, तर लोकांना दुःख सहन करावं लागतं,पण पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे यश* मिळतं.+ १५  जो अनोळखी माणसाचं कर्ज फेडण्याची हमी देतो,* त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही,+पण जो हात मिळवून करार करण्याचं टाळतो,* तो सुरक्षित राहील. १६  प्रेमळ* स्त्रीला सन्मान मिळतो,+पण निर्दयी लोक संपत्ती बळकावतात. १७  दयाळू* माणसाच्या वागणुकीमुळे त्याला फायदा होतो,*+पण क्रूर माणूस स्वतःवर संकट* ओढवून घेतो.+ १८  दुष्टाची कमाई बेइमानीची असते,+पण जो नीतिमत्त्व पेरतो त्याला खरं प्रतिफळ मिळतं.+ १९  जो नीतिमत्त्वासाठी ठाम उभा राहतो त्याला जीवन मिळतं,+पण जो दुष्टपणाच्या मागे लागतो त्याच्यावर मृत्यू ओढवतो. २०  ज्यांच्या मनात कपट असतं, त्यांची यहोवाला घृणा वाटते,+पण ज्यांचा मार्ग निर्दोष असतो, त्यांच्यामुळे त्याला आनंद होतो.+ २१  वाईट माणसाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्‍चित,+पण नीतिमानाची मुलं संकटांतून सुटतील. २२  समज सोडून वागणारी सुंदर स्त्री, म्हणजेडुकराच्या नाकातली सोन्याची नथ. २३  नीतिमानाच्या इच्छेमुळे चांगलं घडतं,+पण दुष्टांच्या आशेमुळे क्रोध भडकतो. २४  उदारपणे देणाऱ्‍याला* आणखी मिळतं;+पण जे दिलं पाहिजे, ते देण्याचं जो टाळतो, त्याच्यावर गरिबी येते.+ २५  उदार माणसाची संपत्ती वाढेल;+जो दुसऱ्‍यांची तहान भागवतो, त्याचीही तहान भागवली जाईल.+ २६  जो धान्याचा साठा करून ठेवतो, त्याला लोक शाप देतील,पण जो धान्य विकतो त्याला ते आशीर्वाद देतील. २७  जो चांगलं करण्यासाठी मनापासून झटतो, त्याच्यावर कृपा केली जाईल,+पण जो वाईट करायला पाहतो, त्याच्यासोबत वाईटच घडेल.+ २८  आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवणारा खाली पडेल,+पण नीतिमान हिरव्यागार पानांसारखा बहरेल.+ २९  जो आपल्या घराण्यावर संकट* आणतो, त्याच्या हाती काही लागणार नाही,*+आणि मूर्ख बुद्धिमानाची चाकरी करेल. ३०  नीतिमानाचं फळ म्हणजे जीवनाचा वृक्ष,+आणि जो मनं वळवतो तो बुद्धिमान असतो.+ ३१  पृथ्वीवर नीतिमानाला आपल्या कामाचं फळ मिळतं,तर दुष्टाला आणि पापी माणसाला आणखी किती पटींनी मिळेल!+

तळटीपा

किंवा “फसव्या.”
किंवा “मौल्यवान वस्तूंचा.”
किंवा “देवाचा आदर न करणारा.”
किंवा “द्वेष करतो.”
शब्दशः “गोष्ट झाकतो.”
किंवा “सुज्ञ.”
किंवा “तारण.”
शब्दशः “घृणा वाटते.”
किंवा “जामीन राहतो.”
किंवा “गोड स्वभावाच्या.”
किंवा “एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्‍या.”
किंवा “तो आपल्या जिवाचं भलं करतो.”
किंवा “कलंक.”
शब्दशः “विखरणाऱ्‍याला.”
किंवा “कलंक.”
शब्दशः “त्याच्या वाट्याला वारा येईल.”