नीतिवचनं ३:१-३५
३ माझ्या मुला, माझी शिकवण* विसरू नकोस,माझ्या आज्ञा मनापासून पाळ.
२ कारण त्यांच्यामुळे तुला मोठं आयुष्यआणि शांती लाभेल.+
३ एकनिष्ठ प्रेम आणि विश्वासूपणा* कधीही सोडू नकोस.+
त्यांना आपल्या गळ्याभोवती बांध;त्यांना आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.+
४ मग देवाच्या आणि माणसाच्या नजरेततुला सखोल समज असलेला म्हणून ओळखलं जाईलआणि तुझ्यावर त्यांची कृपा होईल.+
५ यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव+आणि स्वतःच्या समजशक्तीवर अवलंबून* राहू नकोस.+
६ तुझ्या सर्व कार्यांत त्याची आठवण ठेव,+म्हणजे तो तुझे मार्ग मोकळे करेल.+
७ स्वतःच्या बुद्धीवर भरवसा ठेवू नकोस.+
यहोवाची भीती बाळग आणि वाइटापासून दूर राहा.
८ ती तुझ्या शरीराला* आरोग्यआणि तुझ्या हाडांना तजेला देईल.
९ आपल्या मौल्यवान वस्तूंनी;+आपल्या उत्पन्नातल्या* पहिल्या फळांनी* यहोवाचा आदर कर.+
१० मग तुझी कोठारं भरलेली असतील+आणि तुझी द्राक्षकुंडं नवीन द्राक्षारसाने भरून वाहतील.
११ माझ्या मुला, यहोवाकडून मिळणारी शिक्षा* नाकारू नकोस+आणि त्याचं ताडन तुच्छ लेखू नकोस,+
१२ कारण जसा एक पिता आपल्या लाडक्या मुलाचं ताडन करतो,+तसंच, यहोवाही ज्याच्यावर प्रेम करतो, त्याचं ताडन करतो.+
१३ ज्या माणसाला बुद्धी सापडते+आणि जो माणूस समंजसपणा मिळवतो तो सुखी!
१४ कारण बुद्धी मिळवणं हे चांदी मिळवण्यापेक्षा चांगलं,आणि बुद्धीचा लाभ सोन्यापेक्षा चांगला!+
१५ ती पोवळ्यांपेक्षाही* मौल्यवान आहे;तुला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीशी तिची तुलना करता येणार नाही.
१६ तिच्या उजव्या हातात मोठं आयुष्यआणि तिच्या डाव्या हातात धनसंपत्ती आणि गौरव आहे.
१७ तिचे मार्ग सुखदआणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.+
१८ तिला धरून राहणाऱ्यांसाठी, ती जीवनाचा वृक्ष आहे.
जे तिला घट्ट धरून राहतात, त्यांना सुखी म्हटलं जाईल.+
१९ यहोवाने पृथ्वीचा पाया बुद्धीने घातला;+समंजसपणाने आकाशाला स्थापन केलं.+
२० त्याच्या ज्ञानाने खोल पाणी विभागण्यात आलंआणि आभाळातून दव झिरपू लागलं.+
२१ माझ्या मुला, त्यांना* कधीही नजरेआड होऊ देऊ नकोस.
व्यावहारिक बुद्धीचं आणि विचारशक्तीचं रक्षण कर.
२२ ते तुला जीवन देतीलआणि तुझ्या गळ्यासाठी सुंदर दागिन्यासारखे असतील.
२३ मग तू आपल्या मार्गाने सुखरूपपणे चालशीलआणि तुझं पाऊल कधीच अडखळणार नाही.*+
२४ तू झोपशील तेव्हा तुला कसलीच भीती नसेल;+तू बिछान्यावर पडशील, तेव्हा तुला चांगली झोप लागेल.+
२५ अचानक येणाऱ्या कोणत्याही संकटाला,किंवा दुष्टांवर येणाऱ्या वादळाला+ तू घाबरणार नाहीस.+
२६ कारण यहोवा तुझा भरवसा असेल.+
तो तुझा पाय सापळ्यात अडकू देणार नाही.+
२७ ज्यांचं भलं केलं पाहिजे,* त्यांचं भलं करण्याची तुझ्यात ताकद असेल,*+तर तसं करण्यापासून मागे हटू नकोस.+
२८ आपल्या शेजाऱ्याला एखादी गोष्ट देणं तुला शक्य असेल,तर असं म्हणू नकोस, “जा, उद्या परत ये! मग मी तुला ती देईन.”
२९ तुझा शेजारी तुझ्यासोबत निर्धास्तपणे राहत असेल,तर त्याच्याविरुद्ध वाईट योजना करू नकोस.+
३० एखाद्याने तुझं काही वाईट केलं नसेल,तर त्याच्याशी विनाकारण भांडू नकोस.+
३१ हिंसा करणाऱ्या माणसाचा हेवा करू नकोस,+किंवा त्याच्यासारखं वागू नकोस,
३२ कारण यहोवाला कपटी माणसाची घृणा वाटते,+पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.+
३३ दुष्टाच्या घरावर यहोवाचा शाप असतो,+पण नीतिमानाच्या घराला तो आशीर्वाद देतो.+
३४ थट्टा करणाऱ्यांची तो थट्टा करतो,+पण नम्र लोकांवर तो कृपा करतो.+
३५ बुद्धिमानांना सन्मानाचा वारसा मिळेल,पण मूर्ख स्वतःहून अपमान ओढवून घेतात.+
तळटीपा
^ किंवा “नियम.”
^ किंवा “सत्य.”
^ शब्दशः “टेकून.”
^ शब्दशः “बेंबीला.”
^ किंवा “सर्वात उत्तम भागाने.”
^ किंवा “मिळकतीतल्या.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ हे आधीच्या वचनांत उल्लेख केलेल्या देवाच्या गुणांना सूचित करतं.
^ किंवा “तुझ्या पायाला कधीच ठेच लागणार नाही.”
^ किंवा “तुझ्या हातात असेल.”
^ किंवा “ज्यांचं भलं करणं तुझं कर्तव्य आहे.”