योहानला झालेलं प्रकटीकरण १:१-२०
१ येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण,* जे देवाने त्याला यासाठी दिलं,+ की लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या सेवकांना दाखवाव्यात.+ येशूने आपल्या दूताला पाठवून त्याच्याद्वारे देवाचा* सेवक योहान याला ते चिन्हांच्या रूपात प्रकट केलं.+
२ देवाने दिलेल्या वचनाबद्दल आणि येशू ख्रिस्ताने दिलेल्या साक्षीबद्दल, हो, आपण पाहिलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल योहानने साक्ष दिली.
३ जो या भविष्यवाणीचे शब्द मोठ्याने वाचतो आणि जे या भविष्यवाणीचे शब्द ऐकून त्यात सांगितलेल्या गोष्टींचं पालन करतात ते आशीर्वादित आहेत,+ कारण नेमलेली वेळ जवळ आली आहे.
४ आशिया प्रांतात असलेल्या सात मंडळ्यांना योहानकडून:+
“जो आहे, जो होता आणि जो येत आहे,” त्याच्याकडून+ आणि त्याच्या राजासनापुढे असलेल्या सात अदृश्य शक्तींकडून,*+
५ तसंच, जो “विश्वासू साक्षीदार,”+ “मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला,”+ आणि “पृथ्वीवरच्या राजांचा शासक” आहे, त्या येशू ख्रिस्ताकडून+ तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.
ज्याचं आपल्यावर प्रेम आहे+ आणि ज्याने स्वतःच्या रक्ताद्वारे आपल्याला पापांपासून मुक्त केलं,+
६ आणि त्याचा देव आणि पिता याच्यासाठी ज्याने आपल्याला एक राज्य+ आणि याजक असं केलं,+ त्याला सदासर्वकाळ गौरव आणि सामर्थ्य मिळो. आमेन.
७ पाहा! तो ढगांसोबत येत आहे+ आणि प्रत्येक डोळा त्याला पाहील आणि ज्यांनी त्याला भोसकलं तेही त्याला पाहतील. त्याच्यामुळे पृथ्वीवरचे सर्व वंश छाती बडवून शोक करतील.+ हो, आमेन.
८ “जो आहे, जो होता आणि जो येत आहे, जो सर्वशक्तिमान,” तो यहोवा* देव+ म्हणतो, “अल्फा आणि ओमेगा* मी आहे.”+
९ मी योहान तुमचा भाऊ आणि येशू ख्रिस्ताचा अनुयायी या नात्याने+ तुमच्यासोबत संकटात,+ राज्यात+ आणि धीरात तुमचा भागीदार आहे.+ देवाबद्दल बोलल्यामुळे आणि येशूबद्दल साक्ष दिल्यामुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
१० तेव्हा पवित्र शक्तीच्या* प्रभावाखाली येऊन मी प्रभूच्या दिवसात पोहोचलो आणि मला पाठीमागून कर्णा वाजत असल्यासारखा मोठा आवाज ऐकू आला.
११ तो म्हणाला: “तुला जे काही दिसतं ते गुंडाळीत लिही, आणि ते इफिस,+ स्मुर्णा,+ पर्गम,+ थुवतीरा,+ सार्दीस,+ फिलदेल्फिया+ आणि लावदिकीया+ इथे असलेल्या सात मंडळ्यांना पाठव.”
१२ माझ्यासोबत कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी वळलो, तेव्हा मला सोन्याचे सात दीपवृक्ष* दिसले.+
१३ आणि दीपवृक्षांच्या मधोमध मला पायघोळ वस्त्र घातलेला आणि छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला मनुष्याच्या मुलासारखा+ कोणीतरी दिसला.
१४ त्याच्या डोक्यावरचे केस पांढऱ्या लोकरीसारखे, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे आगीच्या ज्वालांसारखे होते.+
१५ त्याचे पाय, भट्टीत तापवलेल्या शुद्ध तांब्यासारखे+ आणि त्याचा आवाज पाण्याच्या जोरदार प्रवाहासारखा होता.
१६ त्याच्या उजव्या हातात सात तारे होते+ आणि त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार, दुधारी तलवार+ निघाली होती. त्याचं रूप* तेजस्वीपणे चमकणाऱ्या सूर्यासारखं होतं.+
१७ त्याला पाहून मी जणू मेल्याप्रमाणे त्याच्या पायाजवळ पडलो.
तेव्हा त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवून म्हटलं: “भिऊ नकोस. मी पहिला+ आणि शेवटला आहे.+
१८ जो जिवंत तो मी आहे.+ मी मेलो होतो,+ पण पाहा! मी सदासर्वकाळ जिवंत राहतो+ आणि माझ्याजवळ मृत्यूच्या आणि कबरेच्या* किल्ल्या आहेत.+
१९ म्हणून तू पाहिलेल्या या गोष्टी, ज्या आहेत आणि ज्या यानंतर घडणार आहेत त्या गोष्टी लिहून घे.
२० माझ्या उजव्या हातात तू पाहिलेल्या सात ताऱ्यांचं आणि सोन्याच्या सात दीपवृक्षांचं पवित्र रहस्य असं आहे: सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे दूत आणि सात दीपवृक्ष म्हणजे सात मंडळ्या.+
तळटीपा
^ किंवा कदाचित, “येशूचा.”
^ किंवा “खुलासा; उघड करणं.”
^ ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.
^ म्हणजे, सुरुवात आणि शेवट. अल्फा हे ग्रीक वर्णमालेतलं पहिलं आणि ओमेगा हे शेवटचं अक्षर आहे.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ एक प्रकारची समई.
^ किंवा “चेहरा.”
^ ग्रीक भाषेत “हेडीस.” शब्दार्थसूची पाहा.