योहानला झालेलं प्रकटीकरण १४:१-२०
१४ मग पाहा! कोकरा+ सीयोन पर्वतावर+ उभा असलेला मला दिसला आणि त्याच्यासोबत १,४४,००० जण होते.+ त्यांच्या कपाळांवर कोकऱ्याचं आणि त्याच्या पित्याचं नाव लिहिलेलं होतं.+
२ आणि स्वर्गातून पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांसारखा आणि ढगांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो आवाज वीणा वाजवणाऱ्या गायकांसारखा होता.
३ ते राजासनासमोर, चार जिवंत प्राण्यांसमोर+ आणि वडीलजनांसमोर+ जणू एक नवीन गीत गात होते.+ आणि पृथ्वीवरून विकत घेतलेल्या १,४४,००० जणांशिवाय+ आणखी कोणालाही ते गीत शिकता येत नव्हतं.
४ ज्यांनी स्त्रियांशी संबंध ठेवून स्वतःला दूषित केलं नाही, ते हेच आहेत. खरंतर, ते शुद्ध आहेत.+ कोकरा जिथे जिथे जातो, तिथे तिथे त्याच्यामागे जाणारे ते हेच आहेत.+ त्यांना देवासाठी आणि कोकऱ्यासाठी पहिलं फळ+ म्हणून मानवजातीतून विकत घेण्यात आलं होतं,+
५ आणि त्यांच्या तोंडात कोणतंही कपट दिसून आलं नाही; ते निष्कलंक आहेत.+
६ नंतर, आकाशाच्या मधोमध* उडणारा आणखी एक स्वर्गदूत मला दिसला आणि त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांना म्हणजे प्रत्येक लोकसमूहाच्या, राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या लोकांना घोषित करण्यासाठी सर्वकाळाचा आनंदाचा संदेश होता.+
७ तो मोठ्या आवाजात असं म्हणत होता: “देवाची भीती बाळगा आणि त्याचा गौरव करा, कारण न्याय करण्याची त्याची वेळ आली आहे.+ म्हणून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र+ आणि पाण्याचे झरे निर्माण केले त्याची उपासना करा.”
८ मग, त्याच्यामागून दुसरा स्वर्गदूत आला आणि म्हणाला: “ती पडली आहे! मोठी बाबेल,+ जिने सर्व राष्ट्रांना आपल्या अनैतिक लैंगिक कृत्यांच्या* वासनेचा* द्राक्षारस प्यायला लावला,+ ती पडली आहे!”+
९ मग, त्याच्यामागून तिसरा स्वर्गदूत आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला: “जो कोणी जंगली पशूची+ आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतो आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर खूण करून घेतो,+
१० तो देवाच्या क्रोधाचा निर्भेळ* द्राक्षारसही पिईल. हा द्राक्षारस त्याच्या क्रोधाच्या प्याल्यात+ ओतण्यात आला आहे. त्याला पवित्र जनांसमोर आणि कोकऱ्यासमोर अग्नी आणि गंधक यांनी यातना दिल्या जातील.+
११ त्यांच्या यातनेचा धूर सदासर्वकाळ वर चढत जातो.+ आणि जे जंगली पशूची आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात, तसंच, जे त्याच्या नावाची खूण स्वतःवर करून घेतात, त्यांना रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही.+
१२ म्हणूनच, जे देवाच्या आज्ञा पाळतात आणि येशूवरचा* विश्वास बळकट धरून ठेवतात+ त्या पवित्र जनांना धीराची गरज आहे.”+
१३ मग मी स्वर्गातून एक आवाज ऐकला. तो म्हणाला, “लिही: इथून पुढे जे प्रभूसोबत ऐक्यात मरण पावतात ते मेलेले लोक सुखी आहेत.+ पवित्र शक्ती* म्हणते, खरंच त्यांना आपल्या कठोर परिश्रमांपासून विश्रांती मिळो, कारण त्यांनी केलेली कार्यं थेट त्यांच्यासोबत जातात.”
१४ त्यानंतर पाहा! मला एक पांढरा ढग आणि मनुष्याच्या मुलासारखा+ कोणीतरी त्या ढगावर बसलेला दिसला. त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता आणि त्याच्या हातात धारदार विळा होता.
१५ मग, आणखी एक स्वर्गदूत मंदिरातून* निघाला आणि जो ढगावर बसला होता त्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला: “तुझा विळा चालव आणि कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे आणि पृथ्वीचं पीक पूर्णपणे तयार झालं आहे.”+
१६ तेव्हा ढगावर जो बसला होता त्याने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी करण्यात आली.
१७ मग आणखी एक स्वर्गदूत स्वर्गातल्या मंदिरातून निघाला आणि त्याच्याही हातात एक धारदार विळा होता.
१८ मग आणखी एक स्वर्गदूत वेदीतून निघाला. त्याला अग्नीवर अधिकार होता आणि ज्याच्या हातात धारदार विळा होता त्याला तो मोठ्याने हाक मारून म्हणाला: “तुझा विळा चालव आणि पृथ्वीवरच्या द्राक्षवेलींचे घड गोळा कर, कारण तिची द्राक्षं पिकली आहेत.”+
१९ तेव्हा स्वर्गदूताने पृथ्वीवर आपला विळा चालवला आणि पृथ्वीवरचे द्राक्षवेलींचे घड गोळा केले आणि ते देवाच्या क्रोधाच्या द्राक्षकुंडात टाकले.+
२० द्राक्षकुंड शहराबाहेर तुडवण्यात आलं, तेव्हा घोड्यांच्या लगामांपर्यंत पोहोचेल इतकं रक्त द्राक्षकुंडातून बाहेर आलं आणि सुमारे ३०० किलोमीटर* दूर वाहत गेलं.
तळटीपा
^ किंवा “हवेत; डोक्यावर.”
^ किंवा “क्रोधाचा.”
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “कडक.”
^ शब्दशः “येशूचा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.