योहानला झालेलं प्रकटीकरण १७:१-१८

  • “मोठी बाबेल” हिच्यावरचा न्यायदंड (१-१८)

    • गडद लाल रंगाच्या जंगली पशूवर बसलेली मोठी वेश्‍या (१-३)

    • जो जंगली पशू ‘आधी होता, पण आता नाही; तरीसुद्धा लवकरच अथांग डोहातून वर येईल’ ()

    • दहा शिंगं कोकऱ्‍यासोबत लढतील (१२-१४)

    • दहा शिंगं वेश्‍येचा तिरस्कार करतील (१६, १७)

१७  मग सात वाट्या घेतलेल्या सात स्वर्गदूतांपैकी+ एक जण आला आणि मला म्हणाला: “ये, पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्‍येवर न्यायदंड कसा बजावला जाईल ते मी तुला दाखवतो.+ २  पृथ्वीवरच्या राजांनी तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्यं* केली+ आणि पृथ्वीवर राहणारे लोक तिच्या अनैतिक लैंगिक कृत्यांचा* द्राक्षारस पिऊन धुंद झाले होते.”+ ३  त्या स्वर्गदूताने मला पवित्र शक्‍तीच्या* सामर्थ्याने एका ओसाड रानात नेलं. तिथे, एका गडद लाल रंगाच्या जंगली पशूवर बसलेली स्त्री मला दिसली. त्या पशूच्या अंगावर देवाची निंदा करणारी नावं होती. त्याला सात डोकी आणि दहा शिंगं होती. ४  त्या स्त्रीने जांभळ्या आणि गडद लाल रंगाचे कपडे घातले होते+ आणि ती सोनं, मौल्यवान रत्नं आणि मोती यांनी सजलेली होती.+ तिच्या हातात एक सोन्याचा प्याला होता. तो घृणास्पद गोष्टींनी आणि तिच्या अनैतिक लैंगिक कृत्यांच्या* अशुद्ध गोष्टींनी भरलेला होता. ५  तिच्या कपाळावर: “मोठी बाबेल, वेश्‍यांची आणि पृथ्वीवरच्या घृणास्पद गोष्टींची आई,”+ असं गूढ अर्थाचं नाव लिहिलं होतं. ६  ती स्त्री पवित्र जनांचं रक्‍त आणि येशूच्या साक्षीदारांचं रक्‍त पिऊन धुंद झालेली मला दिसली.+ तिला पाहून मला फार आश्‍चर्य वाटलं. ७  तेव्हा, स्वर्गदूत मला म्हणाला: “तुला इतकं आश्‍चर्य का वाटलं? त्या स्त्रीचं आणि सात डोकी आणि दहा शिंगं असलेल्या ज्या जंगली पशूवर+ ती बसली आहे, त्याचं रहस्य मी तुला सांगतो:+ ८  तुला दिसलेला जंगली पशू, आधी होता, पण आता नाही; तरीसुद्धा तो लवकरच अथांग डोहातून+ वर येईल आणि त्याचा नाश केला जाईल. तो जंगली पशू आधी होता, पण आता नाही आणि तरी पुन्हा हजर होईल हे पाहून पृथ्वीवर राहणारे, म्हणजे ज्यांची नावं जगाच्या स्थापनेपासून जीवनाच्या पुस्तकात* लिहिण्यात आलेली नाहीत,+ ते आश्‍चर्यचकित होतील. ९  ही गोष्ट समजून घेण्यासाठी बुद्धीची आणि ज्ञानाची गरज आहे: ती सात डोकी+ म्हणजे सात पर्वत. त्यांवर ती स्त्री बसली आहे. १०  तसंच, सात राजे आहेत: त्यांच्यापैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अजून आलेला नाही. पण, तो येईल तेव्हा त्याला थोडा काळ राहावं लागेल. ११  आणि जो जंगली पशू होता, पण आता नाही,+ तो आठवा राजासुद्धा आहे; पण, तो सातांपासून झाला आहे, आणि त्याचा नाश होईल. १२  जी दहा शिंगं तू पाहिली ती दहा राजांना सूचित करतात. त्यांना अजूनपर्यंत राज्य मिळालेलं नाही; पण त्यांना जंगली पशूसोबत एका तासासाठी राजांसारखा अधिकार मिळतो. १३  त्या सगळ्यांचा एकच विचार आहे आणि म्हणून ते जंगली पशूला आपलं सामर्थ्य आणि अधिकार देतात. १४  ते कोकऱ्‍यासोबत+ लढतील, पण कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल,+ कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे.+ तसंच, जे बोलावण्यात आलेले, निवडलेले आणि विश्‍वासू जन त्याच्यासोबत आहेत तेसुद्धा विजय मिळवतील.”+ १५  तो स्वर्गदूत मला म्हणाला: “जे पाण्याचे प्रवाह तू पाहिले, ज्यांच्यावर ती वेश्‍या बसली होती ते खरंतर लोक, जनसमुदाय, राष्ट्रं आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे आहेत.+ १६  तसंच, दहा शिंगं+ आणि तू पाहिलेला जंगली पशू+ हे वेश्‍येचा तिरस्कार करतील.+ ते तिला उद्ध्‌वस्त आणि नग्न करतील तसंच, तिचं मांस खातील आणि तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकतील.+ १७  कारण, देवाने आपला विचार पूर्ण करण्याचं त्यांच्या मनात घातलं;+ हो, देवाची वचनं पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपलं राज्य जंगली पशूला देण्याद्वारे+ त्यांचा जो एकच विचार आहे तो पूर्ण करावा, असं देवाने त्यांच्या मनात घातलं. १८  आणि तू पाहिलेली स्त्री+ म्हणजे पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी महानगरी आहे.”

तळटीपा

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “गुंडाळीत.”