योहानला झालेलं प्रकटीकरण १९:१-२१
१९ यानंतर, स्वर्गात एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहची स्तुती करा!*+ तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचं आहे.
२ कारण त्याचे निर्णय खरे आणि न्यायाला धरून आहेत.+ ज्या मोठ्या वेश्येने आपल्या अनैतिक लैंगिक कृत्यांनी* पृथ्वी भ्रष्ट केली, तिच्यावर त्याने न्यायदंड बजावला आहे. तिच्या हातांना लागलेल्या* आपल्या दासांच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.”+
३ तेव्हा लगेच, दुसऱ्यांदा ते म्हणाले: “याहची स्तुती करा!*+ तिच्या जळण्याचा धूर सदासर्वकाळ वर चढत राहतो.”+
४ तेव्हा त्या २४ वडिलांनी+ आणि त्या चार प्राण्यांनी,+ राजासनावर बसलेल्या देवाची गुडघे टेकून उपासना केली आणि म्हणाले: “आमेन! याहची स्तुती करा!”*+
५ तसंच, राजासनातून एक आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लहानमोठ्या दासांनो,+ आपल्या देवाची स्तुती करा.”+
६ आणि एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा, तसंच पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांसारखा आणि ढगांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहची स्तुती करा,*+ कारण आपल्या सर्वसमर्थ देवाने, यहोवाने,*+ राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहे!+
७ चला, आनंद आणि जल्लोष करू या आणि त्याचा गौरव करू या! कारण कोकऱ्याच्या लग्नाची वेळ आली आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजवलं आहे.
८ तिला चांगल्या प्रतीच्या मलमलीची तेजस्वी आणि शुद्ध वस्त्रं घालायला देण्यात आली आहेत. कारण ही वस्त्रं, म्हणजे पवित्र जनांची नीतिमान कार्यं.”+
९ मग तो स्वर्गदूत मला म्हणाला, “हे लिही: ज्यांना कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण मिळालं आहे ते सुखी!”+ पुढे तो म्हणाला: “ही देवाची खरी वचनं आहेत.”
१० हे ऐकताच, त्याची उपासना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. पण तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस!+ मी तर तुझ्यासारखाच आणि ज्यांना येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य+ मिळालं आहे त्या तुझ्या बांधवांसारखाच फक्त एक दास आहे. देवाची उपासना कर!+ कारण येशूबद्दलची साक्ष देणं हाच भविष्यवाणीचा उद्देश आहे.”+
११ नंतर, मला स्वर्ग उघडलेला दिसला, आणि पाहा! एक पांढरा घोडा मला दिसला.+ त्यावर बसलेल्याचं नाव विश्वासू+ आणि खरा,+ असं आहे; आणि तो नीतीने न्याय करतो आणि लढतो.+
१२ त्याचे डोळे आगीच्या ज्वालेसारखे आहेत+ आणि त्याच्या डोक्यावर बरेच मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिण्यात आलं आहे. ते त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.
१३ त्याने रक्ताचे डाग असलेलं* एक बाहेरचं वस्त्र घातलं आहे आणि ‘देवाचा शब्द’+ असं नाव त्याला देण्यात आलं आहे.
१४ तसंच, स्वर्गातली सैन्यंही पांढऱ्या घोड्यांवर त्याच्या पाठोपाठ जात होती. त्यांनी चांगल्या प्रतीच्या मलमलीची पांढरी आणि शुद्ध वस्त्रं घातली होती.
१५ आणि राष्ट्रांना मारण्यासाठी त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार तलवार निघते+ आणि तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार चालवेल.+ शिवाय, तो सर्वसमर्थ देवाच्या तीव्र क्रोधाचा द्राक्षकुंड तुडवतो.+
१६ त्याच्या बाहेरच्या वस्त्रावर, हो, त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,’ असं नाव लिहिण्यात आलं आहे.+
१७ तसंच, सूर्यात उभा असलेला एक स्वर्गदूतही मला दिसला. तो आकाशाच्या मधोमध* उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला: “इकडे या, देवाच्या संध्याकाळच्या मोठ्या मेजवानीसाठी एकत्र या.+
१८ हे यासाठी, की तुम्ही राजांचं मांस, सेनापतींचं मांस आणि ताकदवान माणसांचं मांस,+ घोड्यांचं आणि त्यांच्या स्वारांचं मांस खावं;+ तसंच, स्वतंत्र माणसांचं आणि दासांचं आणि लहानमोठ्या सर्वांचं मांस तुम्ही खावं.”
१९ मग जंगली पशू, पृथ्वीवरचे राजे आणि त्यांची सैन्यं यांना घोड्यावर बसलेला स्वार आणि त्याचं सैन्य यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी एकत्र झालेलं मी पाहिलं.+
२० त्यानंतर, जंगली पशूला आणि त्याच्यासोबत खोट्या संदेष्ट्यालाही+ पकडण्यात आलं. त्याने त्या जंगली पशूसमोर चमत्कार करून, स्वतःवर जंगली पशूची खूण करून घेतलेल्यांना+ आणि त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्यांना+ फसवलं होतं. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आलं.+
२१ पण जे बाकीचे होते, ते घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघणाऱ्या लांब तलवारीने मारले गेले.+ आणि त्यांचं मांस खाऊन सर्व पक्षी तृप्त झाले.+
तळटीपा
^ किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “तिच्या हातून.”
^ किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
^ किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
^ किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
^ किंवा कदाचित, “रक्त शिंपडलेलं.”
^ किंवा “हवेत; डोक्यावर.”