योहानला झालेलं प्रकटीकरण ४:१-११
४ यानंतर पाहा! मला स्वर्गात एक उघडलेला दरवाजा दिसला आणि माझ्याशी बोलत असलेला जो पहिला आवाज मला ऐकू आला, तो एका कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला: “इकडे वर ये, म्हणजे पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मी तुला दाखवीन.”
२ यानंतर लगेच मी पवित्र शक्तीच्या* प्रभावाखाली आलो, आणि पाहा! स्वर्गात एक राजासन होतं आणि त्या राजासनावर एक जण बसलेला होता.+
३ त्याचं रूप यास्फे*+ आणि सार्दी या रत्नांसारखं* होतं आणि राजासनाच्या सभोवती पाचूसारखं दिसणारं मेघधनुष्य होतं.+
४ राजासनाच्या भोवती २४ राजासनं होती आणि या राजासनांवर मी २४ वडिलांना बसलेलं पाहिलं.+ त्यांनी पांढरी वस्त्रं घातली होती आणि त्यांच्या डोक्यांवर सोन्याचे मुकुट होते.
५ राजासनातून विजा चमकत होत्या.+ तसंच आवाज आणि ढगांचा गडगडाट ऐकू येत होता;+ आणि राजासनापुढे आगीचे सात दिवे होते. हे सात दिवे देवाच्या सात अदृश्य शक्तींना* सूचित करतात.+
६ राजासनासमोर स्फटिकासारखा, जणू काचेचा समुद्र होता.+
राजासनाच्या मधोमध आणि चारही बाजूंना चार जिवंत प्राणी होते.+ त्यांच्या अंगावर पुढे आणि मागे डोळेच डोळे होते.
७ पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा+ तर दुसरा बैलासारखा होता.+ तिसऱ्या जिवंत प्राण्याचा+ चेहरा माणसासारखा होता आणि चौथा जिवंत प्राणी+ उडणाऱ्या गरुडासारखा होता.+
८ चार जिवंत प्राण्यांपैकी प्रत्येकाला सहा पंख होते. त्या पंखांवर सगळीकडे आणि आतल्या बाजूलाही डोळेच डोळे होते.+ ते प्राणी रात्रंदिवस सतत अशी घोषणा करत राहतात: “यहोवा* देव, सर्वशक्तिमान, जो होता, जो आहे आणि जो येत आहे,+ तोच पवित्र, पवित्र, पवित्र!”+
९ जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी, राजासनावर जो बसला आहे आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे+ त्याचा गौरव, सन्मान आणि उपकारस्तुती करतात,
१० तेव्हा तेव्हा २४ वडील,+ राजासनावर जो बसलेला आहे आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला नमन करून त्याची उपासना करतात. ते राजासनापुढे आपले मुकुट ठेवून म्हणतात:
११ “यहोवा* आमच्या देवा, गौरव,+ सन्मान+ आणि सामर्थ्य+ मिळण्यासाठी तूच योग्य आहेस. कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या+ आणि तुझ्याच इच्छेने त्या अस्तित्वात आल्या आणि निर्माण करण्यात आल्या.”
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ काहींच्या मते हे हिऱ्याला सूचित करतं.
^ किंवा “लाल रंगाच्या एका रत्नासारखं.”
^ ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.