प्रेषितांची कार्यं १:१-२६
१ हे थियफील, येशूने ज्या सर्व गोष्टी करायला आणि शिकवायला सुरुवात केली, त्यांबद्दल मी माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिलं होतं.+
२ त्याला स्वर्गात घेण्यात आलं त्या दिवसापर्यंतच्या घटना+ त्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. त्याआधी त्याने आपल्या निवडलेल्या प्रेषितांना+ पवित्र शक्तीद्वारे* काही सूचना दिल्या होत्या.
३ मरणापर्यंत दुःख सहन केल्यानंतर, आपण पुन्हा जिवंत झालो आहोत हे त्याने पुष्कळ खातरीलायक पुराव्यांच्या मदतीने आपल्या शिष्यांना दाखवलं.+ ४० दिवसांच्या काळादरम्यान तो बऱ्याचदा त्यांना दिसला आणि त्यांच्याशी देवाच्या राज्याबद्दल बोलत राहिला.+
४ शिष्यांची भेट घेत असताना त्याने त्यांना असा आदेश दिला: “यरुशलेम सोडून जाऊ नका,+ तर पित्याने ज्याबद्दल वचन दिलंय आणि ज्याबद्दल तुम्ही माझ्याकडून ऐकलंय त्याची वाट पाहा.+
५ कारण योहानने तर पाण्याने बाप्तिस्मा* दिला होता, पण थोड्याच दिवसांनंतर तुमचा पवित्र शक्तीने बाप्तिस्मा होईल.”+
६ त्यामुळे, ते एकत्र जमलेले असताना त्यांनी त्याला विचारलं: “प्रभू, तू आताच इस्राएलच्या राज्याची परत स्थापना करणार आहेस का?”+
७ तो त्यांना म्हणाला: “जे काळ आणि नेमलेले दिवस* पित्याने आपल्या इच्छेप्रमाणे ठरवले आहेत, ते तुम्ही जाणून घेऊ शकत नाही.+
८ पण पवित्र शक्ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल+ आणि तुम्ही यरुशलेममध्ये,+ संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये,+ तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत*+ माझ्याबद्दल साक्ष द्याल.”+
९ या गोष्टी बोलल्यावर, ते अजून त्याच्याकडे पाहतच होते तेवढ्यात तो वर घेतला गेला आणि एका ढगाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केलं.+
१० तो जात असताना ते आकाशाकडे एकटक पाहत होते. तेव्हा अचानक, पांढरेशुभ्र कपडे घातलेली दोन माणसं+ त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली.
११ ती त्यांना म्हणाली: “गालीलच्या माणसांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हा येशू, जो तुमच्यामधून वर आकाशात घेतला गेलाय, तो ज्या पद्धतीने तुम्हाला आकाशात जाताना दिसला, त्याच पद्धतीने परत येईल.”
१२ मग ते जैतुनांच्या डोंगरावरून यरुशलेमला परत आले.+ हा डोंगर यरुशलेमपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर* होता.
१३ यरुशलेमला पोहोचल्यावर ते जिथे राहत होते त्या माडीवरच्या खोलीत गेले. तिथे पेत्र, योहान आणि याकोब, तसंच अंद्रिया, फिलिप्प आणि थोमा, बर्थलमय आणि मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब आणि ज्याला आवेशी म्हणायचे तो शिमोन आणि याकोबचा मुलगा यहूदा हे होते.+
१४ ते सगळे सतत एकदिलाने प्रार्थना करत राहिले. त्यांच्यासोबत तिथे काही स्त्रिया+ आणि येशूची आई मरीया, तसंच त्याचे भाऊसुद्धा होते.+
१५ त्या दिवसांत बांधव एकत्र जमले असताना, (त्यांची* संख्या जवळजवळ १२० इतकी होती) पेत्र त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला:
१६ “माणसांनो, भावांनो, येशूला अटक करणाऱ्यांना ज्याने त्याच्याकडे नेलं,+ त्या यहूदाबद्दल पवित्र शक्तीने दावीदच्या द्वारे जी भविष्यवाणी केली होती ती पूर्ण होणं गरजेचं होतं.+
१७ कारण तोही आपल्यातलाच एक होता+ आणि त्यालाही या सेवाकार्यासाठी निवडण्यात आलं होतं.
१८ (तर याच माणसाने त्याच्या अनीतीच्या कमाईने एक शेत विकत घेतलं.+ तो डोक्यावर आपटून पडला आणि त्याचं पोट फुटलं* आणि त्याची सगळी आतडी बाहेर आली.+
१९ हे यरुशलेमच्या सगळ्या रहिवाशांना कळलं आणि त्यामुळे त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा म्हणजे, “रक्ताचं शेत” असं नाव पडलं.)
२० कारण स्तोत्रांच्या पुस्तकात असं लिहिलंय, ‘त्याचं निवासस्थान ओसाड पडो आणि त्यात एकही माणूस न उरो’+ तसंच, ‘देखरेख करण्याची त्याची जबाबदारी दुसऱ्याला मिळो.’+
२१ म्हणूनच, प्रभू येशूने आमच्यात केलेली बरीच कार्यं* ज्या माणसांनी त्या संपूर्ण काळात आमच्यामध्ये राहून पाहिली आहेत,
२२ त्यांच्यापैकी एकाने आमच्यासोबत येशूच्या पुनरुत्थानाचा* साक्षीदार होणं गरजेचं आहे.+ म्हणजेच, योहानने येशूला बाप्तिस्मा दिला त्या दिवसापासून,+ तो आमच्यातून वर घेतला गेला त्या दिवसापर्यंत,+ ज्यांनी ती सगळी कार्यं पाहिली, त्यांच्यापैकी तो एक असला पाहिजे.”
२३ म्हणून त्यांनी दोघांची नावं सुचवली, बर्सब्बा म्हटलेला योसेफ, ज्याला युस्त असंही म्हटलं जायचं आणि मत्थिया.
२४ मग त्यांनी प्रार्थना केली आणि ते म्हणाले: “हे यहोवा,* तू सगळ्यांची मनं जाणतोस.+ तेव्हा यांपैकी तू कोणाला निवडलं आहेस ते आम्हाला दाखव.
२५ म्हणजे यहूदाने जे सेवाकार्य आणि प्रेषितपण सोडून आपला मार्ग निवडला,+ ते तो हाती घेऊ शकेल.”
२६ तेव्हा त्यांनी त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या+ आणि मत्थियाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यामुळे, त्या ११ जणांसोबत त्याचाही प्रेषितांमध्ये समावेश करण्यात आला. *
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “समय; ऋतू.”
^ किंवा “सगळ्यात दूरच्या भागांत.”
^ शब्दशः “एका शब्बाथ दिवसाच्या अंतरावर.” शब्बाथाच्या दिवशी यहुद्यांना इतक्याच अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी होती.
^ किंवा “जमलेल्या लोकांची.”
^ किंवा “शरीर मधोमध फुटलं.”
^ शब्दशः “त्याचं आत येणं आणि बाहेर जाणं.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “ओळखण्यात आलं,” म्हणजे, त्यालाही इतर ११ प्रेषितांसारखंच मानण्यात आलं.