प्रेषितांची कार्यं १०:१-४८

  • कर्नेल्यला दिसलेला दृष्टान्त (१-८)

  • शुद्ध प्राण्यांविषयी पेत्रला दिसलेला दृष्टान्त (९-१६)

  • पेत्र कर्नेल्यच्या घरी जातो (१७-३३)

  • पेत्र विदेश्‍यांना आनंदाचा संदेश घोषित करतो (३४-४३)

    • “देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही” (३४, ३५)

  • विदेशी लोकांवर पवित्र शक्‍ती येते आणि त्यांचा बाप्तिस्मा होतो (४४-४८)

१०  कैसरीया इथे कर्नेल्य नावाचा एक माणूस होता. तो सैन्यातल्या इटालियन तुकडीचा* अधिकारी* होता. २  तो एक नीतिमान माणूस होता. तो आणि त्याचं संपूर्ण घराणं देवाला भिऊन वागायचं. तो पुष्कळ लोकांना दान द्यायचा आणि देवाला नेहमी याचना करायचा. ३  दुपारी तीनच्या सुमारास*+ त्याला एका दृष्टान्तात देवाचा दूत त्याच्याजवळ येताना स्पष्टपणे दिसला. तो त्याला म्हणाला: “कर्नेल्य!” ४  तेव्हा कर्नेल्य घाबरून त्याच्याकडे एकटक पाहू लागला. त्याने त्याला विचारलं: “काय प्रभू?” तो कर्नेल्यला म्हणाला: “तुझ्या प्रार्थनांची आणि तू दिलेल्या दानांची देवाने आठवण केली आहे.+ ५  म्हणून आता यापो इथे माणसांना पाठवून, पेत्र म्हटलेल्या शिमोन नावाच्या माणसाला बोलावून घे. ६  हा माणूस चामड्याचं काम करणाऱ्‍या आणि समुद्राजवळ राहणाऱ्‍या शिमोनच्या घरी उतरलाय.”* ७  त्याच्याशी बोलणारा स्वर्गदूत निघून गेल्यावर लगेच त्याने आपल्या सेवकांपैकी दोन दासांना आणि एका धार्मिक वृत्तीच्या सैनिकाला बोलावलं. ८  त्याने त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि यापोला पाठवलं. ९  दुसऱ्‍या दिवशी प्रवास करत ते शहराजवळ आले, तेव्हा पेत्र दुपारी बाराच्या सुमाराला* घराच्या छतावर प्रार्थना करायला गेला. १०  पण त्याला खूप भूक लागली आणि काहीतरी खावंसं वाटलं. जेवण तयार होत असताना त्याला एक दृष्टान्त दिसला+ ११  आणि त्याला आकाश उघडलेलं आणि चार कोपरे धरून पृथ्वीवर सोडलेल्या एका मलमलीच्या मोठ्या चादरीसारखं काहीतरी* खाली येताना दिसलं. १२  त्यात सर्व प्रकारचे चार-पायांचे आणि सरपटणारे प्राणी, तसंच, आकाशात उडणारे पक्षीसुद्धा होते. १३  मग एक आवाज त्याला म्हणाला: “पेत्र, ऊठ यांना कापून खा!” १४  पण पेत्र म्हणाला: “शक्यच नाही प्रभू, कारण मी आजपर्यंत कधीही दूषित आणि अशुद्ध+ असं काहीही खाल्लं नाही.” १५  मग त्याला दुसऱ्‍यांदा तो आवाज ऐकू आला: “देवाने ज्या गोष्टी शुद्ध केल्या आहेत त्यांना तू दूषित म्हणायचं सोडून दे.” १६  असंच तिसऱ्‍यांदा घडलं आणि पेत्रला जे दिसलं होतं, ते लगेच वर आकाशात घेतलं गेलं. १७  या दृष्टान्ताचा काय अर्थ असू शकेल याबद्दल पेत्र अजूनही विचारात असताना, कर्नेल्यने पाठवलेली माणसं शिमोनचं घर कुठे आहे असं विचारत फाटकाजवळ येऊन थांबली.+ १८  त्यांनी हाक मारली आणि पेत्र म्हटलेला शिमोन इथेच उतरला आहे का, असं विचारलं. १९  पेत्र अजूनही दृष्टान्ताबद्दल विचार करत असताना, पवित्र शक्‍तीने*+ त्याला म्हटलं: “पाहा! तीन माणसं तुझ्याविषयी विचारपूस करत आहेत. २०  म्हणून ऊठ आणि खाली जा. मनात कोणतीही शंका न आणता त्यांच्यासोबत जा, कारण मीच त्यांना पाठवलंय.” २१  तेव्हा पेत्र खाली त्या माणसांकडे गेला आणि म्हणाला: “तुम्ही ज्याला शोधताय तो मीच आहे. तुम्ही कशासाठी आला आहात?” २२  ते म्हणाले: “सैन्याचा अधिकारी असलेला कर्नेल्य+ हा एक नीतिमान आणि देवाला भिऊन वागणारा माणूस आहे. तो संपूर्ण यहुदी राष्ट्रात नावाजलेला आहे. देवाने त्याला एका पवित्र दूताद्वारे, तुम्हाला निरोप पाठवून आपल्या घरी बोलावून घ्यायची आणि तुम्ही जे सांगाल ते ऐकायची सूचना दिली.” २३  तेव्हा त्याने त्यांना घरात बोलावलं आणि आपले पाहुणे म्हणून त्यांची राहायची सोय केली. दुसऱ्‍या दिवशी तो उठला आणि त्यांच्यासोबत निघाला. यापोचे काही बांधवही त्याच्यासोबत गेले. २४  त्याच्या दुसऱ्‍या दिवशी तो कैसरीयाला पोहोचला. कर्नेल्य त्यांची वाट पाहत होता आणि त्याने आपल्या नातेवाइकांना आणि जवळच्या मित्रांना आपल्या घरी बोलावून घेतलं होतं. २५  पेत्र आत जाताच कर्नेल्य त्याला भेटायला आला आणि त्याच्या पाया पडून त्याने त्याला नमन केलं. २६  पण पेत्रने त्याला उठवून म्हटलं: “ऊठ, उभा राहा; मीसुद्धा एक माणूसच आहे.”+ २७  तो त्याच्याशी बोलतबोलत आत गेला तेव्हा त्याला बरेच लोक जमलेले दिसले. २८  तो त्यांना म्हणाला: “नियमाप्रमाणे एका यहुद्याने दुसऱ्‍या जातीच्या माणसाशी व्यवहार करणं किंवा त्याच्याकडे जाणं किती चुकीचं आहे,+ हे तर तुम्हाला माहीतच आहे. तरीपण, मी कोणत्याही माणसाला दूषित किंवा अशुद्ध म्हणू नये, असं देवाने मला दाखवलंय.+ २९  म्हणूनच, तुम्ही मला बोलावलं तेव्हा मी खरंतर कोणतीच हरकत न घेता आलो. तर आता मी तुम्हाला विचारतो, की तुम्ही मला कशासाठी बोलावलं?” ३०  मग कर्नेल्य म्हणाला: “आजपासून बरोबर चार दिवसांआधी, मी दुपारी तीनच्या सुमारास* माझ्या घरी प्रार्थना करत असताना, तेजस्वी वस्त्रं घातलेला एक माणूस माझ्यासमोर येऊन उभा राहिला. ३१  तो म्हणाला: ‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना देवाने ऐकली आहे आणि तू दिलेल्या दानांची त्याने आठवण केली आहे. ३२  म्हणून, आपल्या माणसांना यापोला पाठव आणि पेत्र म्हटलेल्या शिमोनला बोलावून घे. हा माणूस चामड्याचं काम करणाऱ्‍या आणि समुद्राजवळ राहणाऱ्‍या शिमोनच्या घरी उतरलाय.’+ ३३  म्हणून मी लगेच तुम्हाला निरोप पाठवून बोलावून घेतलं. आमच्याकडे येऊन तुम्ही आमच्यावर कृपा केली आहे. तर आता, आम्ही सगळे देवासमोर हजर आहोत आणि यहोवाने* तुम्हाला जे काही सांगायची आज्ञा केली आहे, ते ऐकायला उत्सुक आहोत.” ३४  हे ऐकल्यावर पेत्र बोलू लागला: “आता माझी खातरी पटली आहे, की देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही.+ ३५  तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.+ ३६  त्याने इस्राएलच्या मुलांपुढे घोषित करण्यासाठी एक संदेश पाठवला. जो सर्वांचा प्रभू आहे, त्या येशू ख्रिस्ताद्वारे+ मिळणाऱ्‍या शांतीचा हा संदेश होता.+ ३७  योहानने घोषित केलेल्या बाप्तिस्म्यानंतर, गालीलपासून+ सुरू होऊन संपूर्ण यहूदीयात घडलेल्या घटनांबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे. ३८  म्हणजेच नासरेथच्या येशूबद्दल घडलेल्या घटना. त्याला देवाने पवित्र शक्‍तीने आणि सामर्थ्याने अभिषिक्‍त केलं.+ तो चांगली कामं करत आणि सैतानाने* पीडित केलेल्या लोकांना बरं करत संपूर्ण देशभर फिरला,+ कारण देव त्याच्यासोबत होता.+ ३९  त्याने यहुद्यांच्या देशात आणि यरुशलेममध्ये केलेल्या सगळ्या गोष्टींचे आम्ही साक्षीदार आहोत. पण त्यांनी त्याला वधस्तंभावर* खिळून ठार मारलं. ४०  देवाने त्याला तिसऱ्‍या दिवशी उठवलं+ आणि त्याला लोकांसमोर प्रकट होऊ दिलं;* ४१  पण सगळ्या लोकांसमोर नाही, तर देवाने पूर्वीच ठरवलेल्या साक्षीदारांसमोर, म्हणजे आमच्यासमोर त्याला प्रकट केलं. आणि तो मेलेल्यांतून उठल्यावर आम्ही त्याच्यासोबत खातपीत होतो.+ ४२  तसंच, त्याने आम्हाला लोकांकडे जाऊन असा प्रचार करायचा आणि पूर्ण साक्ष द्यायचा आदेश दिला,+ की ज्याला देवाने जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करायला नियुक्‍त केलं तो हाच आहे.+ ४३  सगळे संदेष्टे त्याच्याविषयी अशी साक्ष देतात,+ की जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवेल, त्याला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल.”+ ४४  पेत्र त्यांच्याशी या गोष्टींबद्दल अजून बोलतच होता, तेव्हा वचन ऐकणाऱ्‍या सर्वांवर पवित्र शक्‍ती आली.+ ४५  पवित्र शक्‍तीचं मोफत दान विदेशी लोकांनाही मिळालं आहे हे पाहून, जे सुंता झालेले विश्‍वासू बांधव पेत्रसोबत आले होते, त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं. ४६  कारण त्यांनी त्यांना विदेशी भाषांमध्ये बोलताना आणि देवाची स्तुती करताना ऐकलं.+ तेव्हा पेत्र म्हणाला: ४७  “आपल्यासारखीच यांनाही पवित्र शक्‍ती मिळाली आहे, मग यांना पाण्यात बाप्तिस्मा घेण्यापासून कोण रोखू शकतं?”+ ४८  असं म्हणून त्याने त्यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायची आज्ञा दिली.+ मग त्यांनी त्याला काही दिवस आपल्याकडे राहायची विनंती केली.

तळटीपा

रोमी सैन्यातली ६०० सैनिकांची तुकडी.
किंवा “शताधिपती,” १०० सैनिकांच्या तुकडीचा अधिकारी.
शब्दशः “दिवसाच्या नवव्या तासाला.”
किंवा “पाहुणा म्हणून राहतोय.”
शब्दशः “दिवसाच्या सहाव्या तासाला.”
शब्दशः “एक प्रकारचं पात्र.”
शब्दशः “दिवसाच्या नवव्या तासाला.”
अति. क५ पाहा.
शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.
किंवा “झाडावर.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “लोकांना दिसू दिलं.”