प्रेषितांची कार्यं ११:१-३०

  • पेत्र प्रेषितांना घडलेल्या गोष्टी सांगतो (१-१८)

  • सूरियाच्या अंत्युखियात बर्णबा आणि शौल (१९-२६)

    • शिष्यांना पहिल्यांदा ‘ख्रिस्ती’ म्हणण्यात आलं (२६)

  • अगब दुष्काळाबद्दल भविष्यवाणी करतो (२७-३०)

११  मग, विदेशी लोकांनीही देवाचं वचन स्वीकारलं, हे यहूदीयातल्या प्रेषितांच्या आणि बांधवांच्या कानावर आलं. २  म्हणून जेव्हा पेत्र वर यरुशलेमला आला, तेव्हा सुंता केलीच पाहिजे असं ज्या लोकांचं म्हणणं होतं,+ ते त्याची टीका करू लागले.* ३  ते म्हणाले: “तू सुंता न झालेल्यांच्या घरात जाऊन त्यांच्यासोबत जेवलास.” ४  तेव्हा पेत्रने जे काही घडलं होतं, ते त्यांना सविस्तरपणे सांगितलं. तो म्हणाला: ५  “यापो शहरात मी प्रार्थना करत होतो, तेव्हा मला एक दृष्टान्त दिसला. मग चार कोपरे धरून पृथ्वीवर सोडलेल्या मलमलीच्या एका मोठ्या चादरीसारखं काहीतरी* आकाशातून खाली येताना मला दिसलं आणि ते सरळ माझ्याजवळ आलं.+ ६  मी नीट पाहिलं, तेव्हा मला त्यात पृथ्वीवरचे चार-पायांचे प्राणी, जंगली जनावरं, सरपटणारे प्राणी आणि आकाशातले पक्षी दिसले. ७  आणि मला असा आवाज ऐकू आला: ‘पेत्र, ऊठ यांना कापून खा!’ ८  पण मी म्हणालो: ‘शक्यच नाही प्रभू, कारण मी आजपर्यंत कधीही दूषित किंवा अशुद्ध असं काहीही खाल्लं नाही.’ ९  मग दुसऱ्‍यांदा आकाशातून तो आवाज ऐकू आला: ‘देवाने ज्या गोष्टी शुद्ध केल्या आहेत त्यांना तू दूषित म्हणायचं सोडून दे.’ १०  हे तिसऱ्‍यांदा घडलं आणि मग त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आकाशात घेतल्या गेल्या. ११  शिवाय, त्याच क्षणी तीन माणसं आम्ही ज्या घरात राहत होतो, तिथे येऊन पोहोचली. त्यांना कैसरीयाहून माझ्याकडे पाठवण्यात आलं होतं.+ १२  तेव्हा पवित्र शक्‍तीने* मला कोणतीही शंका न घेता त्यांच्यासोबत जायला सांगितलं. हे सहा बांधवही माझ्यासोबत आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. १३  त्याने आम्हाला सांगितलं, की त्याला त्याच्या घरात एक स्वर्गदूत उभा असलेला दिसला. तो त्याला म्हणाला: ‘यापोला माणसं पाठव आणि पेत्र म्हटलेल्या शिमोनला बोलावून घे.+ १४  तो तुला अशा गोष्टी सांगेल, ज्यांमुळे तुला आणि तुझ्या सगळ्या घराण्याला तारण मिळू शकेल.’ १५  पण मी बोलू लागताच, सुरुवातीला जशी आपल्यावर पवित्र शक्‍ती आली होती तशीच त्यांच्यावरही आली.+ १६  तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले. तो म्हणायचा: ‘योहानने पाण्याने बाप्तिस्मा दिला,+ पण तुम्हाला पवित्र शक्‍तीने बाप्तिस्मा दिला जाईल.’+ १७  म्हणून, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्यामुळे देवाने आपल्याला जे मोफत दान दिलं, तेच त्यांनाही दिलं. तर मग देवाला अडवणारा* मी कोण?”+ १८  हे ऐकल्यावर त्यांनी आणखी वाद घातला नाही.* त्यांनी असं म्हणून देवाचा गौरव केला: “याचा अर्थ देवाने विदेशी लोकांना जीवन मिळावं म्हणून त्यांनाही पश्‍चात्ताप करायची संधी दिली आहे.”+ १९  स्तेफनच्या हत्येनंतर बांधवांचा छळ होऊ लागल्यामुळे ज्यांची पांगापांग झाली,+ ते फेनिके, कुप्र आणि अंत्युखियापर्यंत गेले. पण त्यांनी फक्‍त यहुद्यांनाच वचनाबद्दल सांगितलं.+ २०  मग त्यांच्यापैकी काही जण कुप्र आणि कुरेने इथून अंत्युखियाला आले आणि ते ग्रीक बोलणाऱ्‍या लोकांना प्रभू येशूबद्दलचा आनंदाचा संदेश सांगू लागले. २१  शिवाय, यहोवाचा* हात त्यांच्यावर होता आणि बरेच जण विश्‍वास स्वीकारून प्रभूकडे वळले.+ २२  त्यांच्याबद्दलचा वृत्तान्त यरुशलेमच्या मंडळीपर्यंत पोहोचला आणि त्यांनी बर्णबाला+ अंत्युखियाला पाठवलं. २३  तिथे आल्यावर देवाची अपार कृपा पाहून त्याला खूप आनंद झाला आणि त्याने त्या सगळ्यांना पूर्ण मनाने प्रभूची आज्ञा पाळत राहायचं प्रोत्साहन दिलं.+ २४  कारण तो चांगला माणूस होता. तो विश्‍वासाने आणि पवित्र शक्‍तीने भरलेला होता. तेव्हा प्रभूच्या शिष्यांत पुष्कळ जणांची भर पडली.+ २५  मग तो शौलला शोधायला तार्सला गेला.+ २६  शौल सापडल्यावर बर्णबाने त्याला अंत्युखियाला आणलं. मग एक वर्षभर ते तिथल्या मंडळीत जाऊन पुष्कळ लोकांना शिकवत राहिले. अंत्युखियातच, पहिल्यांदा शिष्यांना देवाच्या मार्गदर्शनाने ‘ख्रिस्ती’ असं म्हणण्यात आलं.+ २७  त्या दिवसांत यरुशलेमहून काही संदेष्टे+ अंत्युखियाला आले. २८  त्यांच्यापैकी, अगब+ नावाच्या एकाने उभं राहून पवित्र शक्‍तीद्वारे अशी भविष्यवाणी केली, की संपूर्ण पृथ्वीवर एक मोठा दुष्काळ येणार आहे.+ हा दुष्काळ क्लौद्यच्या काळात आला. २९  म्हणून शिष्यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे+ यहूदीयातल्या बांधवांना मदत पाठवायचा*+ निश्‍चय केला. ३०  आणि त्यांनी तसंच केलं. त्यांनी ही मदत बर्णबा आणि शौल यांच्या हातून वडिलांकडे पाठवली.+

तळटीपा

किंवा “त्याच्यासोबत वाद घालू लागले.”
शब्दशः “एक प्रकारचं पात्र.”
किंवा “देवाच्या मार्गात उभा राहणारा.”
शब्दशः “ते गप्प झाले.”
अति. क५ पाहा.
किंवा “गरजेच्या वस्तू पाठवून मदतकार्य करायचा.”