प्रेषितांची कार्यं १५:१-४१
१५ मग, यहूदीयाहून काही माणसं आली आणि बांधवांना असं शिकवू लागली: “जोपर्यंत मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे तुमची सुंता होत नाही,+ तोपर्यंत तुमचं तारण होणं शक्य नाही.”
२ पण या विषयावरून पौल आणि बर्णबा यांचा त्यांच्यासोबत बराच मतभेद आणि वादावादी झाली. म्हणून असं ठरवण्यात आलं, की पौल आणि बर्णबा तसंच, इतर काही जणांनी यरुशलेमला जाऊन+ हा वाद* प्रेषित आणि वडील यांच्यापुढे मांडावा.
३ त्यामुळे मंडळीने काही अंतरापर्यंत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना निरोप दिला. मग ही माणसं फेनिके आणि शोमरोन या प्रांतांतून प्रवास करत गेली. आणि विदेशी लोक कशा प्रकारे परिवर्तन करून देवाकडे वळले, हे त्यांनी तिथल्या बांधवांना सविस्तरपणे सांगितलं. यामुळे बांधवांना खूप आनंद झाला.
४ यरुशलेमला आल्यावर मंडळीतल्या बांधवांनी, प्रेषितांनी आणि वडिलांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं. मग पौल आणि बर्णबा यांनी, देवाने त्यांच्या हातून घडवून आणलेल्या पुष्कळ गोष्टींबद्दल त्या बांधवांना सांगितलं.
५ पण परूश्यांच्या* पंथातून, ज्यांनी विश्वास स्वीकारला होता असे काही जण आपल्या जागेवरून उठून म्हणाले: “परिवर्तन झालेल्या विदेशी लोकांची सुंता झाली पाहिजे. त्यांना मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करायची आज्ञा दिली पाहिजे.”+
६ म्हणून प्रेषित आणि वडील या विषयावर चर्चा करायला एकत्र जमले.
७ मग बरीच चर्चा* झाल्यावर पेत्र उठला आणि त्यांना म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, माझ्या तोंडून विदेशी लोकांनी आनंदाचा संदेश ऐकावा आणि विश्वास ठेवावा म्हणून, देवाने पूर्वीपासूनच तुमच्यामधून माझी निवड केली हे तुम्हाला माहीतच आहे.+
८ आणि अंतःकरण जाणणाऱ्या देवाने+ आपल्याप्रमाणेच त्यांनाही पवित्र शक्ती* देऊन+ या गोष्टीची साक्ष दिली.
९ त्याने त्यांच्यात आणि आपल्यात कोणताच भेदभाव केला नाही.+ तर, त्याने त्यांच्या विश्वासामुळे त्यांची अंतःकरणं शुद्ध केली.+
१० तर मग, आपल्या पूर्वजांना किंवा आपल्यालाही जे वाहता आलं नाही,+ असं जड ओझं* या शिष्यांच्या मानेवर लादून+ तुम्ही देवाची परीक्षा का पाहताय?
११ उलट, त्यांच्याप्रमाणे प्रभू येशूच्या अपार कृपेनेच आपलंही तारण होतं,+ असा विश्वास आपण बाळगतो.”
१२ तेव्हा, जमलेले सगळे लोक शांत झाले. देवाने आपल्या हातून विदेशी लोकांमध्ये केलेली बरीच चिन्हं आणि चमत्कार, यांबद्दल पौल आणि बर्णबा सांगत असलेल्या गोष्टी ते ऐकू लागले.
१३ त्यांचं बोलणं संपल्यावर याकोब म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, माझं ऐका.
१४ देवाने आपल्या नावाकरता लोक निवडण्यासाठी+ पहिल्यांदाच विदेशी लोकांकडे कशा प्रकारे आपलं लक्ष वळवलं, याबद्दल शिमोनने*+ अगदी सविस्तरपणे आपल्याला सांगितलंय.
१५ आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांतसुद्धा असं म्हटलंय:
१६ ‘या गोष्टी घडल्यावर मी परत येऊन दावीदचा पडलेला तंबू* पुन्हा उभा करीन. त्याचे कोसळलेले भाग मी पुन्हा बांधीन आणि त्याची पुन्हा स्थापना करीन.
१७ म्हणजे, त्यांपैकी उरलेली माणसं सगळ्या राष्ट्रांच्या* लोकांसोबत, अर्थात माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांसोबत मिळून अगदी मनापासून यहोवाचा* शोध घेतील. या सगळ्या गोष्टी घडवणाऱ्या यहोवाचे* हे शब्द आहेत.+
१८ त्याने फार पूर्वीच या गोष्टी करायचं ठरवलं होतं.’+
१९ तेव्हा माझा असा निर्णय* आहे, की देवाकडे वळणाऱ्या विदेशी लोकांना आपण त्रास देऊ नये.+
२० तर त्यांना असं लिहून कळवावं, की त्यांनी मूर्तींनी दूषित झालेल्या गोष्टी,+ अनैतिक लैंगिक कृत्यं,*+ गळा दाबून मारलेले प्राणी* आणि रक्त यांपासून दूर राहावं.+
२१ कारण मोशेच्या पुस्तकांतून या नियमांचं दर शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक शहरातल्या सभास्थानांत, मोठ्याने वाचन करून उपदेश करणारी माणसं प्राचीन काळापासूनच आहेत.”+
२२ मग प्रेषितांनी, वडिलांनी आणि संपूर्ण मंडळीने त्यांच्यातल्या काही निवडलेल्या माणसांना पौल आणि बर्णबा यांच्यासोबत अंत्युखियाला पाठवायचं ठरवलं. त्यांनी बर्सब्बा म्हटलेला यहूदा आणि सीला+ यांना पाठवलं. ते बांधवांमध्ये नेतृत्व करत होते.
२३ त्यांनी त्यांच्या हाती असं लिहून पाठवलं:
“अंत्युखिया,+ सीरिया आणि किलिकिया इथल्या विदेशी बांधवांना, प्रेषित आणि वडील म्हणजेच तुमचे बांधव यांच्याकडून नमस्कार!
२४ आमच्या असं ऐकण्यात आलंय, की इथल्या काही बांधवांनी, आम्ही कोणत्याही सूचना दिलेल्या नसताना काही गोष्टी सांगून तुम्हाला त्रास दिला+ आणि तुमची दिशाभूल करायचा प्रयत्न केला.
२५ त्यामुळे आम्ही काही माणसांना निवडून त्यांना आमचे प्रिय भाऊ, बर्णबा आणि पौल यांच्यासोबत तुमच्याकडे पाठवायचं एकमताने ठरवलं.
२६ या दोघांनीही, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावासाठी आपलं जीवन* वाहिलंय.+
२७ आम्ही यहूदा आणि सीला यांना पाठवतोय, म्हणजे तेसुद्धा याच गोष्टी तुम्हाला सांगतील.+
२८ कारण पवित्र शक्तीच्या+ मदतीने आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत, की पुढे सांगितलेल्या आवश्यक गोष्टींशिवाय, इतर कोणत्याही गोष्टींचं ओझं तुमच्यावर लादू नये:
२९ मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी,+ रक्त,+ गळा दाबून मारलेले प्राणी*+ आणि अनैतिक लैंगिक कृत्यं* यांपासून दूर राहा.+ या गोष्टींचं तुम्ही काळजीपूर्वक पालन केलं, तर तुमचं कल्याण होईल. आमच्या सदिच्छा नेहमी तुमच्यासोबत आहेत!”
३० बांधवांचा निरोप घेऊन ही माणसं खाली अंत्युखियाला गेली आणि त्यांनी संपूर्ण मंडळीला एकत्र करून त्यांना हे पत्र दिलं.
३१ ते प्रोत्साहन देणारं पत्र वाचून बांधवांना खूप आनंद झाला.
३२ यहूदा आणि सीला हे संदेष्टे असल्यामुळे त्यांनी बरीच भाषणं देऊन बांधवांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांचा विश्वास मजबूत केला.+
३३ काही काळ तिथे राहिल्यानंतर, ज्यांनी त्यांना पाठवलं होतं त्यांच्याकडे बांधवांनी त्यांना सुखरूप परत पाठवून दिलं.
३४ *——
३५ पण पौल आणि बर्णबा अंत्युखियातच राहून बांधवांना शिकवत राहिले आणि इतर बऱ्याच जणांसोबत मिळून यहोवाच्या* वचनाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत राहिले.
३६ काही दिवसांनंतर, पौल बर्णबाला म्हणाला: “ज्या ज्या शहरात आपण यहोवाच्या* वचनाची घोषणा केली होती, त्या त्या शहरात आपण परत* जाऊ या आणि तिथल्या बांधवांची भेट घेऊन त्यांचं कसं चाललंय हे पाहू या.”+
३७ बर्णबाला कसंही करून मार्क म्हटलेल्या योहानला आपल्यासोबत घेऊन जायचं होतं.+
३८ पण पौलला त्याला सोबत न्यायची मुळीच इच्छा नव्हती. कारण तो पंफुल्या इथे त्यांना मधेच सोडून निघून गेला होता आणि प्रचारकार्यासाठी त्यांच्यासोबत पुढे गेला नव्हता.+
३९ यावरून त्यांच्यात इतकं कडाक्याचं भांडण झालं, की ते एकमेकांपासून वेगळे झाले. बर्णबा+ मार्कला आपल्यासोबत घेऊन जहाजाने कुप्रला निघून गेला.
४० तर पौलने सीला याला निवडलं. मग बांधवांनी पौलला यहोवाच्या* अपार कृपेच्या स्वाधीन केल्यावर तोही तिथून निघाला.+
४१ तो सीरिया आणि किलिकिया प्रांतातून प्रवास करत आणि तिथल्या मंडळ्यांचा विश्वास मजबूत करत गेला.
तळटीपा
^ किंवा “ही समस्या.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “वादावादी.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “जोखड; जू.”
^ किंवा “पेत्रने.”
^ किंवा “मंडप; घर.”
^ किंवा “विदेशी.”
^ किंवा “मत.”
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “असे प्राणी, ज्यांना मारल्यावर त्यांचं रक्त नीट वाहू दिलं जात नाही.”
^ किंवा “जीव.”
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “असे प्राणी, ज्यांना मारल्यावर त्यांचं रक्त नीट वाहू दिलं जात नाही.”
^ किंवा कदाचित, “कसंही करून परत.”