प्रेषितांची कार्यं १६:१-४०
१६ नंतर पौल दर्बे आणि लुस्त्र+ या शहरांतही आला. तिथे तीमथ्य+ नावाचा एक शिष्य होता. तो प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. पण त्याचे वडील ग्रीक होते.
२ लुस्त्र आणि इकुन्यातले बांधव त्याची खूप प्रशंसा करायचे.
३ पौलने आपल्या प्रवासात तीमथ्यला सोबत न्यायची इच्छा व्यक्त केली. मग त्या ठिकाणी राहणाऱ्या यहुद्यांच्या समाधानासाठी त्याने त्याला नेऊन त्याची सुंता केली.+ कारण तीमथ्यचे वडील ग्रीक आहेत हे सगळ्यांना माहीत होतं.
४ प्रवासादरम्यान ते वेगवेगळ्या शहरांत गेले आणि यरुशलेममधल्या प्रेषितांनी आणि वडिलांनी घेतलेले निर्णय त्यांनी बांधवांना सांगितले.+
५ याचा परिणाम असा झाला, की मंडळ्या विश्वासात मजबूत होत गेल्या आणि शिष्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली.
६ मग पवित्र शक्तीने* त्यांना आशिया प्रांतात देवाचं वचन सांगण्यापासून अडवल्यामुळे ते फ्रुगिया आणि गलतीयाच्या प्रदेशांतून प्रवास करत पुढे गेले.+
७ नंतर मुसिया या ठिकाणी आल्यावर त्यांनी बिथुनिया इथे जायचा प्रयत्न केला.+ पण येशूने पवित्र शक्तीद्वारे त्यांना तिथे जाण्यापासून रोखलं.
८ त्यामुळे ते मुसियाच्या मार्गाने* खाली त्रोवसला आले.
९ मग, रात्रीच्या वेळी पौलला एक दृष्टान्त दिसला. त्याने पाहिलं, की एक माणूस त्याच्यासमोर उभा राहून त्याला अशी विनंती करत आहे: “मासेदोनियात येऊन आम्हाला मदत कर.”
१० त्याने हा दृष्टान्त पाहिल्यावर आम्ही लगेच मासेदोनियाला जायला निघालो. कारण तिथल्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी देवाने आम्हाला बोलावलं आहे, हे आम्ही ओळखलं.
११ त्यामुळे, त्रोवस इथून जहाजाने निघून आम्ही सरळ समथ्राके इथे गेलो. आणि दुसऱ्या दिवशी नियापुलीस या ठिकाणी पोहोचलो.
१२ तिथून मग आम्ही फिलिप्पै इथे आलो.+ हे मासेदोनिया जिल्ह्याचं प्रमुख शहर असून तिथे रोमी लोकांची एक वसाहत आहे. या शहरात आम्ही काही दिवस राहिलो.
१३ आणि शब्बाथाच्या दिवशी शहराच्या फाटकांबाहेर जाऊन आम्ही एका नदीच्या किनाऱ्यावर गेलो. तिथे प्रार्थनेचं एखादं ठिकाण असावं असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही तिथे जाऊन बसलो आणि जमलेल्या स्त्रियांना आनंदाचा संदेश सांगू लागलो.
१४ तिथे लुदिया नावाची एक स्त्रीसुद्धा होती. ती थुवतीरा+ शहराची असून जांभळ्या कपड्यांचा व्यापार करायची. देवाची उपासक असलेली ही स्त्री पौलचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती. तेव्हा, पौल सांगत असलेल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी यहोवाने* तिचं मन पूर्णपणे उघडलं.
१५ नंतर तिने आणि तिच्या घराण्याने बाप्तिस्मा घेतल्यावर+ ती आम्हाला आग्रह करून म्हणू लागली: “मी यहोवाला* विश्वासू आहे असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल, तर माझ्या घरी येऊन राहा.” तिने इतका आग्रह केला, की शेवटी आम्हाला जावंच लागलं.
१६ एकदा असं झालं, की प्रार्थनेच्या ठिकाणी जात असताना आम्हाला एक मुलगी भेटली. ती भविष्य सांगणाऱ्या दुष्ट स्वर्गदूताच्या*+ प्रभावाखाली होती आणि एक दासी होती. ती भविष्य सांगून आपल्या मालकांना बराच पैसा मिळवून द्यायची.
१७ पौल आणि आम्ही जिथे कुठे जायचो तिथे ही मुलगी आमच्या मागेमागे यायची आणि मोठ्याने ओरडून म्हणायची: “ही माणसं सर्वोच्च देवाचे सेवक आहेत+ आणि तुम्हाला तारणाचा मार्ग घोषित करत आहेत.”
१८ असं ती बऱ्याच दिवसांपर्यंत करत राहिली. शेवटी पौल कंटाळला आणि तो वळून तिच्यातल्या दुष्ट स्वर्गदूताला म्हणाला: “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला हुकूम देतो, हिच्यातून बाहेर निघ.” आणि त्याच क्षणी तो दुष्ट स्वर्गदूत तिच्यातून बाहेर निघाला.+
१९ आपली कमाई बंद झाली,+ हे पाहून त्या मुलीच्या मालकांनी पौल आणि सीला यांना धरलं आणि त्यांना बाजारपेठेत फरफटत नेऊन अधिकाऱ्यांपुढे उभं केलं.+
२० त्यांना नगर-अधिकाऱ्यांकडे नेऊन ते म्हणाले: “ही माणसं आपल्या शहरात खळबळ माजवत आहेत.+ हे लोक यहुदी आहेत
२१ आणि ते आपल्याला असे रितीरिवाज मानायला आणि पाळायला शिकवतात, जे आपल्या रोमी लोकांसाठी योग्य नाहीत.”
२२ हे ऐकून, लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. नगर-अधिकाऱ्यांनी त्यांचे कपडे फाडले आणि त्यांना काठ्यांनी मारायचा हुकूम दिला.+
२३ मग बेदम मारल्यावर त्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं आणि तुरुंगाच्या अधिकाऱ्याला त्यांच्यावर कडक पहारा ठेवायचा हुकूम दिला.+
२४ असा हुकूम मिळाल्यामुळे त्याने त्यांना आतल्या कोठडीत डांबलं आणि त्यांचे पाय खोड्यांत* अडकवले.
२५ मग, मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सीला प्रार्थना करत होते. ते गीत गाऊन देवाची स्तुती करत होते+ आणि बाकीचे कैदी ऐकत होते.
२६ तेव्हा अचानक इतका मोठा भूकंप झाला, की तुरुंगाचा पायासुद्धा हादरला. शिवाय, सगळे दरवाजे एकाएकी उघडले गेले आणि सगळ्यांच्या साखळ्या गळून पडल्या.+
२७ तुरुंगाचा अधिकारी झोपेतून उठला तेव्हा त्याने पाहिलं, की तुरुंगाचे दरवाजे उघडे आहेत. सगळे कैदी पळून गेले असावेत, असं समजून त्याने स्वतःचा जीव घेण्यासाठी आपली तलवार काढली.+
२८ पण पौल मोठ्याने ओरडून त्याला म्हणाला: “आपला जीव घेऊ नकोस, आम्ही सगळे इथेच आहोत!”
२९ तेव्हा कंदील मागवून तो घाईघाईने आत गेला आणि थरथर कापत पौल आणि सीला यांच्या पायांसमोर पडला.
३० त्यांना बाहेर आणून तो म्हणाला: “तारण होण्यासाठी मी काय करू?”
३१ ते त्याला म्हणाले: “प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल.”+
३२ असं म्हणून त्यांनी त्याला आणि त्याच्या घरातल्या सगळ्यांना यहोवाचं* वचन सांगितलं.
३३ मग तेवढ्या रात्री त्यांना आपल्यासोबत नेऊन त्याने त्यांच्या जखमा धुतल्या. त्यानंतर उशीर न लावता त्याने आणि त्याच्या घराण्यातल्या सगळ्यांनी बाप्तिस्मा घेतला.+
३४ त्याने त्यांना आपल्या घरी नेऊन जेवू घातलं. मग आपल्या संपूर्ण घराण्यासोबत त्याने खूप आनंद साजरा केला, कारण आता त्याने देवावर विश्वास ठेवला होता.
३५ दुसऱ्या दिवशी सकाळी, नगर-अधिकाऱ्यांनी शिपायांच्या हाती असा निरोप पाठवला, की “त्या माणसांना सोडून द्या.”
३६ तेव्हा तुरुंगाच्या अधिकाऱ्याने पौलला तो निरोप सांगितला आणि म्हणाला: “नगर-अधिकाऱ्यांनी आपल्या माणसांच्या हाती तुम्हा दोघांना सोडून देण्याचा निरोप पाठवलाय. तर आता बाहेर या आणि शांतीने जा.”
३७ पण पौल त्यांना म्हणाला: “आम्ही रोमी नागरिक असूनसुद्धा, त्यांनी गुन्हा सिद्ध न करताच* आम्हाला सगळ्यांसमोर फटके मारून+ तुरुंगात डांबलं. आणि आता काय आम्हाला गुपचूप इथून बाहेर काढायचा त्यांचा विचार आहे? ते काही नाही! त्यांना म्हणावं, स्वतः येऊन आम्हाला इथून बाहेर न्या.”
३८ शिपायांनी जाऊन त्याचे हे शब्द नगर-अधिकाऱ्यांच्या कानावर घातले. तेव्हा, ती माणसं रोमी आहेत हे ऐकून ते घाबरले.+
३९ त्यामुळे त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली आणि त्यांना बाहेर आणल्यावर शहर सोडून जायची विनंती केली.
४० पण तुरुंगातून बाहेर आल्यावर ते लुदियाच्या घरी गेले. मग, बांधवांना भेटून त्यांना प्रोत्साहन दिल्यावर+ ते तिथून निघून गेले.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “मुसियातून.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “चौकशी न करताच.”