प्रेषितांची कार्यं १९:१-४१

  • इफिसमध्ये पौल; काहींचा पुन्हा बाप्तिस्मा होतो (१-७)

  • पौलचं शिकवण्याचं कार्य (८-१०)

  • दुष्ट स्वर्गदूतांवर विजय (११-२०)

  • इफिसमध्ये दंगल (२१-४१)

१९  नंतर, अपुल्लो+ करिंथमध्ये असताना पौल किनारपट्टीपासून दूर, आशियाच्या आतल्या भागांतून प्रवास करत खाली इफिसला+ आला. तिथे त्याला काही शिष्य भेटले. २  तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “तुम्ही विश्‍वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र शक्‍ती* मिळाली होती का?”+ ते त्याला म्हणाले: “पवित्र शक्‍तीबद्दल तर आम्ही कधीच ऐकलं नाही.” ३  त्यामुळे तो त्यांना म्हणाला: “मग तुम्ही कोणता बाप्तिस्मा घेतला?” ते म्हणाले: “योहानचा बाप्तिस्मा.”+ ४  पौल म्हणाला: “योहानने पश्‍चात्तापाचं चिन्ह असलेला बाप्तिस्मा दिला+ आणि त्याने लोकांना आपल्यामागून येणाऱ्‍यावर, म्हणजेच येशूवर विश्‍वास ठेवायला सांगितलं.”+ ५  हे ऐकल्यावर त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. ६  मग पौलने त्यांच्यावर आपले हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र शक्‍ती आली.+ ते विदेशी भाषांमध्ये बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले.+ ७  ते एकूण १२ जण होते. ८  मग, तीन महिने पौल सभास्थानात जाऊन+ धैर्याने बोलत राहिला. तो देवाच्या राज्याबद्दल भाषणं द्यायचा आणि पटण्यासारखे तर्क लोकांपुढे मांडायचा.+ ९  पण काही जण अडून राहिले* आणि त्यांनी विश्‍वास ठेवायला नकार दिला. तसंच, ते सगळ्यांसमोर प्रभूच्या मार्गाची+ निंदा करू लागले. तेव्हा पौल त्यांच्यामधून निघाला+ आणि शिष्यांनाही आपल्यासोबत घेऊन तो तुरन्‍न इथल्या शाळेच्या सभागृहात दररोज भाषणं देऊ लागला. १०  असं दोन वर्षांपर्यंत चाललं. त्यामुळे आशिया प्रांतात राहणाऱ्‍या सगळ्या यहुदी आणि ग्रीक लोकांना प्रभूचं वचन ऐकायची संधी मिळाली. ११  शिवाय, पौलच्या हातून देव खूप आश्‍चर्यकारक चमत्कार घडवत राहिला.+ १२  इतके, की त्याचा स्पर्श झालेले रुमाल आणि कपडेसुद्धा लोक आजारी माणसांकडे घेऊन जायचे+ आणि त्यांचे रोग बरे व्हायचे. तसंच, त्यांच्यातले दुष्ट स्वर्गदूतसुद्धा* बाहेर निघायचे.+ १३  पण यहुद्यांपैकी काही जण, जे ठिकठिकाणी प्रवास करून दुष्ट स्वर्गदूत काढायचे, त्यांनीसुद्धा प्रभू येशूच्या नावाने दुष्ट स्वर्गदूत काढायचा प्रयत्न केला. ते म्हणायचे: “पौल ज्याच्याबद्दल प्रचार करतो, त्या येशूच्या नावाने मी तुला आज्ञा देतो.”+ १४  स्किवा नावाच्या एका यहुदी मुख्य याजकाची सात मुलंसुद्धा असंच करायची. १५  पण दुष्ट स्वर्गदूताने त्यांना असं उत्तर दिलं: “मी येशूला ओळखतो+ आणि पौललाही ओळखतो,+ पण तुम्ही कोण?” १६  असं म्हणून, दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेल्या त्या माणसाने त्यांच्यावर झडप घातली. मग त्यांच्याशी लढून त्याने एकेकाला असं काबूत आणलं, की ते जखमी होऊन उघडेच त्या घरातून बाहेर पळाले. १७  इफिसमध्ये राहणाऱ्‍या सगळ्या यहुदी आणि ग्रीक लोकांच्या कानावर ही गोष्ट आली, तेव्हा त्या सगळ्यांना दहशत बसली. आणि प्रभू येशूच्या नावाचा गौरव होत गेला. १८  तसंच, विश्‍वास ठेवणारे बरेच जण येऊन आपली पापं कबूल करू लागले आणि आपण केलेली वाईट कामं उघडपणे सांगू लागले. १९  इतकंच काय, तर जादूटोणा करणाऱ्‍या पुष्कळ लोकांनी आपली पुस्तकं जमा करून सगळ्यांसमोर जाळून टाकली.+ हिशोब केल्यावर, त्यांची किंमत ५०,००० चांदीच्या नाण्यांइतकी असल्याचं दिसून आलं. २०  अशा रितीने, यहोवाच्या* शक्‍तीमुळे त्याचं वचन पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला.+ २१  या गोष्टी घडल्यानंतर, पौलने मासेदोनिया+ आणि अखयातून प्रवास केल्यावर पुढे यरुशलेमला जायचं ठरवलं.+ तो म्हणाला: “तिथे गेल्यावर मला रोमलासुद्धा गेलं पाहिजे.”+ २२  म्हणून त्याने आपली सेवा करणाऱ्‍यांपैकी तीमथ्य+ आणि एरास्त+ या दोघांना मासेदोनियाला पाठवलं. पण तो स्वतः काही काळ आशिया प्रांतातच राहिला. २३  त्याच वेळी, इफिसमध्ये प्रभूच्या मार्गाबद्दल+ बरीच खळबळ माजली.+ २४  कारण तिथे अर्तमी देवीचे चांदीचे देव्हारे बनवणारा देमेत्रिय नावाचा एक सोनार, आपल्या कारागिरांना बराच पैसा मिळवून द्यायचा.+ २५  तो त्यांना आणि इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हणाला: “याच धंद्यातून आपल्याला भरपूर पैसा मिळतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे. २६  पण या पौलने इफिसमध्येच+ नाही, तर जवळजवळ सगळ्या आशिया प्रांतात कितीतरी लोकांना भडकवलंय. त्याने कशा प्रकारे त्यांची मनं वळवली आहेत, हे तुम्ही स्वतः पाहिलंय आणि ऐकलंय. ‘हातांनी घडवलेले देव, मुळात देव नाहीत,’ असं तो लोकांना शिकवतोय.+ २७  यामुळे आपल्या धंद्याची तर बदनामी होईलच, पण महान अर्तमी देवीच्या मंदिरालाही लोक कवडीमोलाचं समजतील. आणि जिची पूजाअर्चा फक्‍त आशिया प्रांतातच नाही, तर संपूर्ण जगात केली जाते तिचं ऐश्‍वर्यसुद्धा धुळीला मिळेल.” २८  हे ऐकून लोक रागाने पेटून उठले आणि “इफिसकरांची अर्तमी देवी महान!” असं मोठमोठ्याने ओरडू लागले. २९  त्यामुळे संपूर्ण शहरात गोंधळ उडाला आणि सगळे लोक नाट्यगृहाकडे धावत गेले. त्यांनी आपल्यासोबत पौलचे प्रवासातले सोबती, म्हणजे मासेदोनियाचे गायस आणि अरिस्तार्ख+ यांनाही तिथे फरफटत नेलं. ३०  पौल तर स्वतः आत लोकांकडे जायला तयार होता, पण शिष्यांनी त्याला अडवलं. ३१  इतकंच काय, तर उत्सवांच्या आणि खेळांच्या आयोजकांपैकी काही, जे पौलच्या ओळखीचे होते, त्यांनी त्याला निरोप पाठवला आणि नाट्यगृहात जाऊन आपला जीव धोक्यात घालू नकोस अशी विनंती केली. ३२  जमावात कोणी काही, तर कोणी काही ओरडत होतं. कारण सगळे लोक गोंधळलेले होते आणि त्यांच्यापैकी बहुतेकांना आपण इथे का जमलो आहोत, हेच माहीत नव्हतं. ३३  तेव्हा, त्यांनी आलेक्सांद्रला पुढे केलं आणि यहुद्यांनी त्याला ढकलत लोकांपुढे आणलं. मग आलेक्सांद्रने लोकांना खुणावून आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला. ३४  पण तो यहुदी असल्याचं लक्षात येताच, ते सगळे एका आवाजात “इफिसकरांची अर्तमी देवी महान!” असं तब्बल दोन तास ओरडत राहिले. ३५  शेवटी, नगर-प्रमुख जमावाला कसंबसं शांत करून म्हणाला: “इफिसकरांनो, असा कोण आहे ज्याला हे माहीत नाही, की इफिस शहर महान अर्तमी देवीच्या मंदिराचं आणि आकाशातून पडलेल्या मूर्तीचं रक्षक आहे? ३६  ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही. म्हणून शांत राहा आणि उतावळेपणाने काही करू नका. ३७  कारण ही जी माणसं तुम्ही इथे आणली आहेत, ती मंदिरं लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत. ३८  तर मग, देमेत्रिय+ आणि त्याच्या कारागिरांची कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तर यासाठी विशिष्ट दिवशी न्यायालयं उघडी असतात आणि राज्यपालसुद्धा* आहेत. तेव्हा, त्यांनी तिथे जाऊन एकमेकांवर आरोप लावावेत. ३९  पण याशिवाय तुमची दुसरी काही तक्रार असेल, तर त्याबद्दल कायद्याप्रमाणे नेमलेल्या सभेत ठरवलं जाईल. ४०  खरंतर, आजच्या या प्रकरणावरून आपल्यावर राजद्रोहाचा आरोप लावला जाऊ शकतो. कारण ही दंगल का झाली यासाठी आपल्याला कोणतंही कारण देता येणार नाही.” ४१  असं म्हणून त्याने लोकांना पाठवून दिलं.

तळटीपा

किंवा “काहींनी आपलं हृदय कठोर केलं.”
अति. क५ पाहा.