प्रेषितांची कार्यं २०:१-३८
२० गोंधळ शांत झाल्यावर पौलने शिष्यांना बोलावून त्यांना प्रोत्साहन दिलं. मग त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियाला जायला निघाला.
२ त्या प्रदेशांतून जाताना त्याने तिथल्या शिष्यांना बऱ्याच गोष्टी सांगून प्रोत्साहन दिलं. मग तो ग्रीसला गेला.
३ तो तिथे तीन महिने राहिला. पण, तो जहाजाने सीरियाला जाणार होता, तेव्हा यहुद्यांनी त्याच्याविरुद्ध कट केला.+ म्हणून त्याने मासेदोनियातून परत जायचा विचार केला.
४ त्याच्यासोबत, बिरुया शहराचा पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीकाचे अरिस्तार्ख+ आणि सकूंद, दर्बेचा गायस तसंच तीमथ्य+ आणि आशिया प्रांतातले तुखिक+ आणि त्रफिम+ हेसुद्धा होते.
५ ही माणसं पुढे जाऊन त्रोवस इथे आमची वाट पाहत होती.
६ पण बेखमीर भाकरींच्या सणानंतर,+ आम्ही फिलिप्पैहून समुद्रमार्गाने निघालो आणि पाच दिवसांत त्रोवसला त्यांच्याकडे आलो. तिथे आम्ही सात दिवस राहिलो.
७ आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही जेवायला एकत्र आलो. दुसऱ्या दिवशी पौल जाणार असल्यामुळे, तो जमलेल्या लोकांना सल्ला देऊ लागला. त्याचं भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबलं.
८ ज्या माडीवरच्या खोलीत आम्ही जमलो होतो तिथे बरेच दिवे होते.
९ पौल बोलत असताना, खिडकीत बसलेल्या युतुख नावाच्या एका तरुणाला गाढ झोप लागली आणि तो तिसऱ्या मजल्यावरून* खाली पडला. त्याला उचलण्यात आलं तेव्हा तो मेला होता.
१० पण पौल खाली गेला आणि त्याने वाकून त्याला मिठी मारली.+ तो बांधवांना म्हणाला: “गोंधळ घालू नका, कारण आता तो जिवंत आहे.”*+
११ मग वर जाऊन पौलने भाकर मोडली आणि तो जेवला. त्यानंतर तो बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्याशी बोलत राहिला आणि मग तिथून निघाला.
१२ यानंतर त्यांनी त्या मुलाला परत नेलं आणि तो जिवंत झाल्यामुळे त्यांना खूप सांत्वन मिळालं.
१३ मग, आम्ही पुढे जहाजाने अस्साला जायला निघालो. पौलने सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे त्याला आमच्यासोबत जहाजात घेणार होतो. पण तिथपर्यंत तो स्वतः पायीच येणार होता.
१४ अस्सामध्ये तो आम्हाला भेटला, तेव्हा आम्ही त्याला आमच्यासोबत जहाजात घेतलं आणि मितुलेना या ठिकाणी गेलो.
१५ मग दुसऱ्या दिवशी तिथून जहाजाने निघून आम्ही खिया बेटासमोर आलो. पण त्यानंतरच्या दिवशी आम्ही सामा बंदरावर काही वेळ थांबलो आणि दुसऱ्या दिवशी मिलेताला पोहोचलो.
१६ आशिया प्रांतात थांबायचं नसल्यामुळे, पौलने इफिसमध्ये मुक्काम न करता+ प्रवास पुढे चालू ठेवायचं ठरवलं होतं. शक्यतो पेन्टेकॉस्टच्या सणापर्यंत यरुशलेमला पोहोचता यावं,+ म्हणून तो तिथे जायची घाई करत होता.
१७ पण मिलेताहून त्याने इफिसला निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतलं.
१८ ते आल्यावर तो त्यांना म्हणाला: “मी आशिया प्रांतात पाऊल ठेवलं त्या दिवसापासून तुमच्यामध्ये कसा राहिलो, हे तुम्हाला चांगलं माहीत आहे.+
१९ आणि यहुद्यांच्या कटांमुळे ओढवलेल्या परीक्षांना तोंड देत आणि अश्रू गाळत मी खूप नम्रपणे प्रभूची सेवा केली.+
२० शिवाय, तुमच्या हिताच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला सांगण्यापासून, तसंच सार्वजनिक रीत्या+ आणि घरोघरी+ शिकवण्यापासून मी माघार घेतली नाही.
२१ पण पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याबद्दल+ आणि आपल्या प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याबद्दल+ मी यहुदी आणि ग्रीक लोकांनासुद्धा अगदी पूर्णपणे साक्ष दिली.
२२ आणि आता पवित्र शक्तीच्या* मार्गदर्शनाप्रमाणे, मी यरुशलेमला जातोय. तिथे गेल्यावर माझं काय होईल हे मला माहीत नाही.
२३ मला इतकंच माहीत आहे, की तुरुंगवास आणि संकटं माझी वाट पाहत असल्याची साक्ष, पवित्र शक्ती मला प्रत्येक शहरात देत आहे.+
२४ तरीसुद्धा, मी स्वतःच्या जिवाची जराही किंमत करत नाही. माझी फक्त इतकीच इच्छा आहे, की मी माझी धाव पूर्ण करावी.+ तसंच, मला प्रभू येशूकडून मिळालेलं सेवाकार्य मी पार पाडावं, म्हणजेच देवाच्या अपार कृपेबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशाची अगदी पूर्णपणे साक्ष द्यावी.
२५ तुमच्यामध्ये मी ज्यांना राज्याचा प्रचार केला त्यांपैकी कोणीही मला पुन्हा पाहणार नाही, हे मला माहीत आहे.
२६ म्हणून, आजच्या दिवशी मी तुम्हाला साक्षी मानून सांगतो, की मी सगळ्या लोकांच्या रक्ताबद्दल निर्दोष आहे.+
२७ कारण देवाच्या इच्छेबद्दल* तुम्हाला सगळं काही सांगण्यापासून मी माघार घेतली नाही.+
२८ स्वतःकडे आणि पूर्ण कळपाकडे लक्ष द्या.+ कारण पवित्र शक्तीने तुम्हाला त्यांच्यावर देखरेख करणारे म्हणून नेमलंय.+ देवाने स्वतःच्या मुलाच्या रक्ताने+ विकत घेतलेल्या मंडळीची तुम्ही मेंढपाळांप्रमाणे काळजी घ्यावी,+ म्हणून तुम्हाला नेमण्यात आलंय.
२९ मला माहीत आहे, की मी गेल्यानंतर क्रूर लांडगे तुमच्यात शिरतील+ आणि ते कळपाशी दयाळूपणे वागणार नाहीत.
३० तुमच्यामधूनच काही माणसं उठतील आणि शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चुकीच्या गोष्टी शिकवतील.+
३१ म्हणून सावध राहा आणि हे विसरू नका, की तीन वर्षं+ रात्रंदिवस अश्रू गाळत, मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सल्ला द्यायचं सोडलं नाही.
३२ आणि आता मी तुम्हाला देवाच्या आणि त्याच्या अपार कृपेच्या वचनाच्या स्वाधीन करतो. हे वचन तुम्हाला सगळ्या पवित्र जनांना मिळणारा वारसा आणि बळ देईल.+
३३ मी कोणाच्याही चांदीचा, सोन्याचा किंवा कपड्यालत्त्याचा लोभ धरला नाही.+
३४ स्वतःच्या आणि माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवायला मी माझ्या या हातांनी कष्ट केले,+ हे तुम्हाला माहीत आहे.
३५ मी तुम्हाला सगळ्या बाबतींत दाखवून दिलंय, की तुम्हीही असंच कष्ट करून+ दुर्बलांना मदत करावी. आणि प्रभू येशूचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवावेत, की ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.’ ”+
३६ या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्यावर त्याने त्या सर्वांसोबत गुडघे टेकून प्रार्थना केली.
३७ तेव्हा, ते सगळे खूप रडू लागले आणि पौलच्या गळ्यात पडून प्रेमाने त्याचे मुके घेऊ लागले.
३८ कारण, तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही,+ असं जे तो म्हणाला, ते ऐकून त्यांना खूप दुःख झालं होतं. मग त्यांनी त्याला जहाजापर्यंत नेऊन सोडलं.
तळटीपा
^ इथे तळमजल्याला पहिला मजला म्हणून मोजण्यात आलं आहे.
^ किंवा “याचा जीव याच्यामध्ये आहे.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “संकल्पाबद्दल.”