प्रेषितांची कार्यं २१:१-४०
२१ जड मनाने बांधवांचा निरोप घेतल्यावर आम्ही समुद्रमार्गाने निघालो. आमचं जहाज वेगाने निघालं आणि कोस या ठिकाणी पोहोचलं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही रुदा इथे आलो आणि तिथून पातरा या ठिकाणी गेलो.
२ तिथे फेनिकेला जाणारं एक जहाज आम्हाला दिसलं, तेव्हा आम्ही त्यात बसून पुढे निघालो.
३ मग डावीकडे* कुप्र बेट दिसलं, तेव्हा आम्ही ते मागे टाकून पुढे सीरियाच्या दिशेने गेलो आणि सोर इथे उतरलो. कारण तिथे जहाजातला माल उतरवला जाणार होता.
४ तिथे आम्ही शिष्यांचा शोध घेतला आणि ते भेटल्यावर सात दिवस तिथेच राहिलो. पण पवित्र शक्तीने* जे प्रकट केलं होतं, त्यामुळे शिष्य वारंवार पौलला असं सांगू लागले, की त्याने यरुशलेमला जाऊ नये.+
५ मग तिथल्या मुक्कामाचे दिवस संपल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तेव्हा सगळे बांधव, स्त्रिया आणि मुलं आम्हाला शहराबाहेर पोहोचवायला आली. आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गुडघे टेकून प्रार्थना केली
६ आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर जहाजात चढलो. मग ते सगळे आपापल्या घरी निघून गेले.
७ मग, सोरपासूनचा आमचा समुद्रप्रवास संपवून आम्ही पतलमैस या ठिकाणी आलो. तिथल्या बांधवांना भेटून आम्ही एक दिवस त्यांच्याकडे राहिलो.
८ दुसऱ्या दिवशी तिथून निघून आम्ही कैसरीयाला पोहोचलो आणि प्रचारक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो. ज्या सात पुरुषांना आधी निवडण्यात आलं होतं, त्यांच्यापैकी तो एक होता.+
९ या माणसाला चार अविवाहित मुली* होत्या आणि त्या भविष्यवाणी करायच्या.+
१० पण आम्ही तिथे बरेच दिवस राहिल्यानंतर, यहूदीयाहून अगब+ नावाचा एक संदेष्टा आला.
११ आमच्याकडे येऊन त्याने पौलच्या कमरेचा पट्टा घेतला आणि आपले हातपाय बांधून तो म्हणाला: “पवित्र शक्ती म्हणते: ‘हा पट्टा ज्या माणसाचा आहे, त्याला यरुशलेमचे यहुदी अशाच प्रकारे बांधून+ विदेशी लोकांच्या हवाली करतील.’ ”+
१२ हे ऐकल्यावर आम्हीच नाही, तर तिथे असलेले इतर जणही, पौलला वर यरुशलेमला न जाण्याची विनंती करू लागले.
१३ तेव्हा पौल म्हणाला: “तुम्ही असं रडून माझा निश्चय मोडायचा* प्रयत्न का करता? मी तर, प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये फक्त बंधनांत जायलाच नाही, तर मरायलाही तयार आहे.”+
१४ तो आपला विचार बदलायला तयार नाही, हे पाहून आम्ही त्याला अडवायचं सोडून दिलं* आणि म्हणालो: “यहोवाच्या* इच्छेप्रमाणे घडो.”
१५ त्यानंतर, आम्ही प्रवासाची तयारी केली आणि यरुशलेमला जायला निघालो.
१६ कैसरीयाचे काही शिष्यसुद्धा आमच्यासोबत होते. त्यांनी आम्हाला, सुरुवातीच्या शिष्यांपैकी असलेल्या कुप्रच्या मनासोनकडे नेलं, कारण आम्ही त्याच्याच घरी उतरणार होतो.
१७ यरुशलेमला पोहोचल्यावर बांधवांनी आमचं आनंदाने स्वागत केलं.
१८ मग दुसऱ्या दिवशी पौलने याकोबची+ भेट घेतली. त्याने आम्हालाही सोबत नेलं होतं. शिवाय, त्या ठिकाणी सगळे वडीलसुद्धा होते.
१९ त्यांना भेटल्यावर, पौलने विदेशी लोकांमध्ये देवाने त्याच्या सेवाकार्याद्वारे ज्या गोष्टी घडवून आणल्या होत्या, त्यांबद्दल सविस्तर सांगितलं.
२० हे ऐकल्यावर ते देवाची स्तुती करू लागले. पण ते त्याला म्हणाले: “पौल, आमच्या भावा, यहुद्यांमध्ये विश्वास ठेवणारे हजारो लोक असून, ते सर्व नियमशास्त्राबद्दल आवेशी आहेत,+ हे तर तुला माहीतच आहे.
२१ पण, त्यांनी तुझ्याबद्दल अशा अफवा ऐकल्या आहेत, की तू सगळ्या राष्ट्रांतल्या यहुद्यांना मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध जायची* शिकवण देतोस. आणि त्यांनी आपल्या मुलांची सुंता करू नये आणि नेमून दिलेल्या प्रथा पाळू नयेत, असं शिकवतोस.+
२२ तर आता काय करावं? कारण तू इथे आल्याचं त्यांना नक्कीच कळेल.
२३ म्हणून आम्ही सांगतो तसं कर: आमच्यात चार माणसं आहेत आणि त्यांनी नवस केलाय.
२४ तर आता, या माणसांना सोबत घेऊन जा आणि स्वतःचं आणि त्यांचं विधीपूर्वक शुद्धीकरण करवून घे. आणि त्यांना मुंडण करता यावं म्हणून त्यांचा खर्च उचल. म्हणजे, तुझ्याबद्दल ऐकलेल्या अफवांमध्ये काहीच अर्थ नाही आणि तू काही चुकीचं करत नाहीस आणि नियमशास्त्राचंही पालन करतोस,+ हे सगळ्यांना समजेल.
२५ आणि विदेश्यांपैकी जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं, तर आम्ही त्यांना आपला निर्णय लिहून कळवलाय. तो असा, की मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी,+ रक्त,+ गळा दाबून मारलेले प्राणी*+ आणि अनैतिक लैंगिक कृत्यं* यांपासून त्यांनी दूर राहावं.”+
२६ दुसऱ्या दिवशी पौल त्या माणसांना घेऊन गेला आणि त्यांच्यासोबत त्याने स्वतःचं विधीपूर्वक शुद्धीकरण करवून घेतलं.+ मग, विधीपूर्वक शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील आणि त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी अर्पण केव्हा दिलं जावं, हे सांगायला तो मंदिरात गेला.
२७ मग शुद्धीकरणाचे सात दिवस संपत आले, तेव्हा आशियातून आलेल्या यहुद्यांनी पौलला मंदिरात पाहिलं. तेव्हा त्यांनी लगेच तिथे जमलेल्या सगळ्या लोकांना भडकवलं आणि त्यांनी त्याला धरलं.
२८ ते मोठ्याने ओरडू लागले: “इस्राएलच्या लोकांनो, मदत करा! हाच तो माणूस आहे, जो सगळीकडे जाऊन आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमशास्त्राविरुद्ध आणि या जागेविरुद्ध सगळ्यांना शिकवतो. इतकंच काय, तर त्याने ग्रीक लोकांना मंदिरात आणून हे पवित्र ठिकाण दूषित केलंय.”+
२९ त्यांनी आधी इफिसच्या त्रफिमला+ पौलसोबत शहरात पाहिलं होतं. त्यामुळे त्यांना वाटलं की पौलने त्याला मंदिरात आणलं असावं.
३० यावरून संपूर्ण शहरात गोंधळ माजला आणि सगळ्या लोकांनी धावत जाऊन पौलला धरलं आणि त्याला मंदिराबाहेर ओढत नेलं. आणि लगेच मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.
३१ ते त्याला ठार मारायच्या प्रयत्नात असताना, सैन्याच्या तुकडीच्या सेनापतीला अशी बातमी मिळाली, की संपूर्ण यरुशलेम शहरात खळबळ माजली आहे.
३२ तो लगेच आपल्या सैनिकांना आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन खाली त्यांच्याकडे धावत गेला. त्यांनी सेनापतीला आणि सैनिकांना येताना पाहिलं, तेव्हा त्यांनी पौलला मारायचं थांबवलं.
३३ मग सेनापतीने येऊन त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला दोन साखळ्यांनी बांधायचा हुकूम दिला.+ त्यानंतर, हा माणूस कोण आहे आणि त्याने काय केलं याची तो चौकशी करू लागला.
३४ पण लोकांमधून कोणी काही, तर कोणी काही ओरडत होतं. या गोंधळात त्याला काहीही स्पष्टपणे कळत नसल्यामुळे, त्याने पौलला सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी आणायचा हुकूम दिला.
३५ पण पौल जिन्याजवळ पोहोचला तेव्हा लोकांचा जमाव इतका हिंसक झाला, की सैनिकांना त्याला उचलून न्यावं लागलं.
३६ लोक “त्याला मारून टाका!” असं ओरडत त्यांच्या मागेमागे येत होते.
३७ सैनिक त्याला घेऊन आपल्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचणार, इतक्यात पौल सेनापतीला म्हणाला: “मी काही बोलू का?” तेव्हा सेनापती त्याला म्हणाला: “तुला ग्रीक बोलता येतं?
३८ मग, काही दिवसांआधी ज्याने बंड पुकारून ४,००० मारेकऱ्यांना ओसाड रानात नेलं होतं, तो इजिप्तचा माणूस तू नाहीस का?”
३९ तेव्हा पौल म्हणाला: “मी कोणत्या लहानसहान शहराचा नाही, तर किलिकियातल्या तार्सचा राहणारा यहुदी आहे.+ म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, मला लोकांशी बोलायची परवानगी द्या.”
४० त्याने परवानगी दिल्यावर पौलने पायऱ्यांवर उभं राहून लोकांना हाताने इशारा केला. जेव्हा सगळीकडे शांतता पसरली, तेव्हा तो इब्री भाषेत त्यांच्याशी बोलू लागला+ आणि म्हणाला:
तळटीपा
^ किंवा “बंदर होतं त्या दिशेला.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “कुमारी.”
^ किंवा “माझं मन खचवण्याचा.”
^ शब्दशः “आम्ही शांत राहिलो.”
^ शब्दशः “धर्मत्यागाची.”
^ किंवा “असे प्राणी, ज्यांना मारल्यावर त्यांचं रक्त नीट वाहू दिलं जात नाही.”
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.