प्रेषितांची कार्यं २२:१-३०

  • पौल लोकांसमोर आपली बाजू मांडतो (१-२१)

  • पौल रोमी नागरिक म्हणून आपल्या हक्कांचा उपयोग करतो (२२-२९)

  • न्यायसभा एकत्र जमते (३०)

२२  “बांधवांनो आणि वडीलजनांनो, आता माझी बाजू ऐकून घ्या.”+ २  त्यांनी त्याला इब्री भाषेत बोलताना ऐकलं, तेव्हा ते आणखीनच शांत झाले. मग तो म्हणाला: ३  “मी किलिकियाच्या तार्स शहरात जन्मलेला+ आणि याच शहरात गमलियेलच्या पायाशी बसून शिक्षण घेतलेला+ एक यहुदी आहे.+ मला आपल्या वाडवडिलांच्या नियमशास्त्राचं काटेकोर पालन करायला शिकवण्यात आलं.+ आणि तुम्ही सगळे जसे आज देवासाठी आवेशी आहात, तसाच मीही आहे.+ ४  मी प्रभूच्या मार्गावर चालणाऱ्‍यांचा मरेपर्यंत छळ केला. स्त्रिया असोत की पुरुष, मी सगळ्यांना अटक करून तुरुंगात डांबलं.+ ५  महायाजक आणि वडिलांची संपूर्ण सभा या गोष्टीची साक्ष देऊ शकते. त्यांच्याकडून मी दिमिष्क इथल्या यहुदी बांधवांसाठी पत्रंही लिहून घेतली. तिथे असलेल्यांना यरुशलमेला आणून शिक्षा द्यावी म्हणून मी त्यांना धरून आणायला चाललो होतो. ६  पण प्रवास करत दुपारच्या सुमारास मी दिमिष्कच्या जवळ पोहोचलो, तेव्हा अचानक माझ्याभोवती आकाशातून एक खूप तेजस्वी प्रकाश चमकला.+ ७  तेव्हा मी खाली पडलो आणि मला एक आवाज ऐकू आला. तो मला म्हणाला: ‘शौल, शौल, तू मला का छळत आहेस?’ ८  मी म्हणालो: ‘प्रभू, तू कोण आहेस?’ तेव्हा तो मला म्हणाला: ‘मी नासरेथकर येशू आहे, ज्याला तू छळत आहेस.’ ९  माझ्यासोबत असलेल्या माणसांना तो प्रकाश तर दिसला, पण माझ्याशी बोलणाऱ्‍याचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. १०  तेव्हा मी म्हणालो: ‘प्रभू, आता मी काय करू?’ त्यावर प्रभू मला म्हणाला: ‘ऊठ आणि दिमिष्कला जा. तुला ज्या गोष्टी करण्यासाठी नेमण्यात आलंय, त्यांबद्दल तिथे गेल्यावर तुला सगळं काही सांगितलं जाईल.’+ ११  पण त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला काहीच दिसत नव्हतं. म्हणून, माझ्यासोबत असलेल्या माणसांनी माझा हात धरून मला दिमिष्कला आणलं. १२  मग, नियमशास्त्राप्रमाणे चालणारा आणि देवाची भीती बाळगणारा हनन्या नावाचा एक माणूस माझ्याकडे आला. तिथे राहणारे सगळे यहुदी त्याची प्रशंसा करायचे. १३  तो माझ्याजवळ उभा राहून मला म्हणाला: ‘शौल, माझ्या भावा, तुझी दृष्टी तुला परत मिळो!’ आणि त्याच क्षणी माझी दृष्टी परत आली आणि मी त्याला पाहिलं.+ १४  तो म्हणाला: ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुला त्याची इच्छा जाणून घेण्यासाठी, जो पवित्र आणि नीतिमान आहे+ त्याला पाहण्यासाठी आणि त्याचा आवाज ऐकण्यासाठी निवडलंय. १५  कारण तू पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींची तुला सगळ्या माणसांसमोर त्याच्या वतीने साक्ष द्यायची आहे.+ १६  तर मग, आता उशीर का लावतोस? ऊठ, बाप्तिस्मा घे आणि त्याच्या नावाने प्रार्थना करून+ आपली पापं धुऊन टाक.’+ १७  पण यरुशलेमला परत आल्यानंतर+ मंदिरात प्रार्थना करत असताना मला एक दृष्टान्त दिसला. १८  त्या दृष्टान्तात प्रभू मला म्हणाला: ‘चल, लवकरात लवकर यरुशलेममधून बाहेर पड. कारण माझ्याबद्दल तू दिलेली साक्ष ते स्वीकारणार नाहीत.’+ १९  तेव्हा मी त्याला म्हणालो: ‘प्रभू, तुझ्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना मी कसा तुरुंगात डांबायचो आणि एका सभास्थानातून दुसऱ्‍या सभास्थानात जाऊन त्यांना कशी मारहाण करायचो, हे त्यांना चांगलं माहीत आहे.+ २०  तसंच, तुझा साक्षीदार असलेल्या स्तेफनची ते हत्या करत होते, तेव्हा मला ते मान्य होतं. मी तिथेच उभा राहून त्याच्या मारेकऱ्‍यांच्या कपड्यांची राखण करत होतो.’+ २१  पण तरीसुद्धा प्रभू मला म्हणाला: ‘जा, कारण मी तुला दूरदूरच्या राष्ट्रांकडे पाठवीन.’ ”+ २२  इथपर्यंत त्यांनी त्याचं ऐकून घेतलं. पण मग ते ओरडू लागले आणि म्हणाले: “या माणसाला मारून टाका. हा जिवंत राहायच्या लायकीचा नाही!” २३  ते आरडाओरडा करून आपली बाहेरची वस्त्रं फेकू लागले आणि हवेत धूळ उडवू लागले.+ २४  तेव्हा, सेनापतीने पौलला सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी आणायचा आणि त्याला फटके मारून त्याची उलटतपासणी करायचा हुकूम दिला. कारण ते पौलविरुद्ध अशा घोषणा नक्की का करत होते, हे त्याला जाणून घ्यायचं होतं. २५  पण चाबकाने मारण्यासाठी त्यांनी त्याला बांधलं, तेव्हा पौल तिथे उभ्या असलेल्या सैन्याच्या अधिकाऱ्‍याला म्हणाला: “गुन्हा सिद्ध न झालेल्या* एका रोमी नागरिकाला तुम्ही फटके मारत आहात, हे कायद्याने योग्य आहे का?”+ २६  हे ऐकल्यावर सैन्याच्या अधिकाऱ्‍याने सेनापतीला जाऊन याबद्दल सांगितलं आणि तो म्हणाला: “मग आता तुमचा काय विचार आहे? कारण हा माणूस तर रोमी आहे.” २७  तेव्हा, सेनापती पौलजवळ येऊन त्याला म्हणाला: “तू खरंच रोमी आहेस का?” तो म्हणाला: “हो.” २८  सेनापती त्याला म्हणाला: “मी खूप मोठी रक्कम देऊन रोमी नागरिकाचे हक्क विकत घेतले आहेत.” पौल त्याला म्हणाला: “मला तर ते जन्मापासूनच मिळाले आहेत.”+ २९  हे ऐकताच, त्याचा छळ करून त्याची उलटतपासणी करायला निघालेली माणसं मागे सरकली. आणि तो रोमी असूनही आपण त्याला साखळ्यांनी बांधलं या विचाराने सेनापती घाबरला.+ ३०  यहुदी लोक पौलला नेमकं का दोषी ठरवत होते, याची सेनापतीला खातरी करायची होती. म्हणून, दुसऱ्‍या दिवशी त्याने पौलला मोकळं केलं आणि मुख्य याजकांना आणि संपूर्ण न्यायसभेला* एकत्र जमण्याचा आदेश दिला. मग त्याने पौलला खाली आणून त्यांच्यामध्ये उभं केलं.+

तळटीपा

किंवा “न्यायचौकशी न झालेल्या.”
म्हणजे, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.