फिलिप्पैकर यांना पत्र १:१-३०
१ ख्रिस्त येशूचे दास, पौल आणि तीमथ्य यांच्याकडून, फिलिप्पै+ इथे ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या सगळ्या पवित्र जनांना, तसंच मंडळीतले देखरेख करणारे आणि सहायक सेवक यांना:+
२ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.
३ तुमची आठवण काढून मी नेहमी माझ्या देवाला धन्यवाद देतो.
४ तुम्हा सर्वांसाठी देवाला याचना करताना प्रत्येक वेळी मला मनापासून आनंद होतो.+
५ कारण अगदी पहिल्या दिवसापासून या क्षणापर्यंत, आनंदाच्या संदेशाच्या प्रसारासाठी तुम्ही खूप चांगलं योगदान दिलं आहे.*
६ कारण ज्या देवाने तुमच्यामध्ये एका चांगल्या कार्याची सुरुवात केली, तो ते कार्य ख्रिस्त येशूच्या दिवसापर्यंत+ पूर्णही करेल+ याची मला खातरी आहे.
७ तुम्हा सर्वांबद्दल माझं अशा प्रकारे विचार करणं योग्यच आहे, कारण माझं तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. माझ्या तुरुंगवासातल्या बंधनांत+ आणि आनंदाच्या संदेशाचं समर्थन करण्यात,+ तसंच त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात, तुम्ही माझ्यासोबत देवाच्या अपार कृपेचे भागीदार आहात.
८ ख्रिस्त येशूला तुमच्याबद्दल जसा जिव्हाळा वाटतो, तसाच मलाही वाटत असल्यामुळे, मी तुम्हा सर्वांना भेटायला अधीर झालो आहे. या बाबतीत स्वतः देव माझा साक्षी आहे.
९ मी सतत हीच प्रार्थना करतो, की तुमचं प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत राहावं+ आणि तुम्हाला सत्याचं अचूक ज्ञान+ आणि पूर्ण समज मिळावी.+
१० हे यासाठी, की कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी,+ म्हणजे ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तुम्ही निर्दोष राहाल आणि इतरांसाठी अडखळण ठरणार नाही.+
११ तसंच, येशू ख्रिस्ताद्वारे उत्पन्न होणाऱ्या नीतिमत्त्वाच्या फळाने तुम्ही भरून जावं+ आणि याद्वारे देवाचा गौरव आणि स्तुती व्हावी.
१२ आता बांधवांनो, तुम्हाला हे माहीत असावं अशी माझी इच्छा आहे, की माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे खरंतर आनंदाच्या संदेशाच्या वाढीला हातभारच लागला आहे.
१३ कारण, मी ख्रिस्तासाठी तुरुंगात आहे+ ही गोष्ट सम्राटाच्या अंगरक्षक दलातल्या* सगळ्यांना आणि इतर लोकांनाही समजली आहे.+
१४ मी तुरुंगात असल्यामुळे प्रभूमध्ये असलेल्या बहुतेक बांधवांचं मनोबल वाढलं आहे आणि ते आता आणखीनच धैर्याने आणि निर्भयपणे देवाचं वचन सांगत आहेत.
१५ हे खरं आहे, की काही जण ईर्ष्येच्या आणि शत्रुत्वाच्या भावनेने ख्रिस्ताचा प्रचार करत आहेत. पण, इतर जण मात्र चांगल्या भावनेने प्रचार करत आहेत.
१६ मला आनंदाच्या संदेशाचं समर्थन करण्यासाठी नेमण्यात आलं आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे, हे लोक प्रेमापोटी ख्रिस्ताबद्दल घोषणा करत आहेत.+
१७ पण आधी उल्लेख केलेले लोक भांडखोर वृत्तीने प्रचार करतात. त्यांचे हेतू चांगले नाहीत, कारण माझ्या या तुरुंगवासात मला दुःखी करण्याचा त्यांचा इरादा आहे.
१८ पण याचा काय परिणाम झाला आहे? हाच, की कोणी चांगल्या हेतूने प्रचार करो किंवा वाईट, पण यामुळे ख्रिस्ताबद्दल सगळीकडे घोषणा होत आहे आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे. खरंतर, मी असाच आनंद मानत राहीन,
१९ कारण तुमच्या याचनांमुळे आणि येशू ख्रिस्ताला देण्यात आलेल्या पवित्र शक्तीच्या* मदतीमुळे+ माझं तारण होईल हे मला माहीत आहे.+
२० मी असा भरवसा आणि आशा बाळगतो, की कोणत्याही बाबतीत माझी लाजिरवाणी स्थिती होणार नाही. तर, नेहमीच होत आलं आहे तसं आताही, मी मनमोकळेपणाने बोलत असल्यामुळे, मी जगलो काय किंवा मेलो काय, माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमाच होईल.+
२१ कारण माझ्याबद्दल बोलायचं, तर माझं जगणं हे ख्रिस्तासाठी आहे+ आणि मरणंही माझ्या फायद्याचंच आहे.+
२२ जोपर्यंत मी या शरीरात जिवंत आहे, तोपर्यंत माझ्या कार्याद्वारे मी आणखी फळ उत्पन्न करीन. पण मी काय निवडीन, हे मी सांगत नाही.
२३ या दोन गोष्टींमुळे माझी घालमेल होत आहे, कारण सुटका होऊन ख्रिस्तासोबत असण्याची माझी खरोखर इच्छा आहे.+ आणि हे नक्कीच कित्येक पटींनी चांगलंही आहे.+
२४ पण तुमच्यासाठी माझं शरीरातच राहणं जास्त गरजेचं आहे.
२५ याची पूर्ण खातरी असल्यामुळे मला माहीत आहे की मी शरीरातच, पुढेही तुम्हा सर्वांसोबत राहीन. हे यासाठी, की तुमची प्रगती व्हावी आणि विश्वासात तुम्हाला आनंद मिळावा.
२६ आणि जेव्हा मी पुन्हा तुमच्यासोबत असेन, तेव्हा माझ्यामुळे ख्रिस्त येशूमध्ये तुमचा आनंद ओसंडून वाहावा.
२७ इतकंच सांगतो, की ख्रिस्ताबद्दलच्या आनंदाच्या संदेशाला शोभेल अशा प्रकारे वागत जा.*+ म्हणजे मी तुम्हाला येऊन भेटलो, किंवा तुमच्यापासून दूर असलो तरीसुद्धा मला तुमच्याबद्दल नेहमी हेच ऐकायला मिळावं, की तुम्ही एकदिलाने आणि एकजूटपणे+ आनंदाच्या संदेशावरच्या विश्वासासाठी खांद्याला खांदा लावून झटत आहात.
२८ आणि तुमच्या विरोधकांना तुम्ही कोणत्याही प्रकारे भीत नाही. ही गोष्ट त्यांच्यासाठी नाशाचा,+ तर तुमच्यासाठी तारणाचा पुरावा आहे+ आणि हे देवापासून आहे.
२९ कारण तुम्हाला ख्रिस्तासाठी हा सन्मान मिळाला आहे, की तुम्ही त्याच्यावर फक्त विश्वासच ठेवू नये, तर त्याच्यासाठी दुःखही सहन करावं.+
३० कारण मला जो संघर्ष करताना तुम्ही पाहिलं+ आणि आताही मी जो करत असल्याचं तुम्ही ऐकत आहात, तोच संघर्ष तुम्हालाही करावा लागत आहे.
तळटीपा
^ किंवा “आनंदाच्या संदेशाच्या प्रसारात तुम्ही सहभाग घेतला आहे.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “नागरिकांसारखी वागणूक ठेवा.”