फिलिप्पैकर यांना पत्र २:१-३०
२ ख्रिस्तासोबत ऐक्यात असल्यामुळे तुम्ही इतरांना प्रेमाने प्रोत्साहन देता आणि त्यांचं सांत्वन करता. तसंच, त्यांच्याबद्दल काळजी, जिव्हाळा आणि करुणा व्यक्त करता.
२ तेव्हा, पुढेही अशाच प्रकारे वागत राहा. म्हणजेच, एक मनाचे होऊन आणि एकमेकांवर सारखंच प्रेम करून, पूर्ण एकतेत राहून* आणि एकच ध्येय मनात ठेवून चाला,+ म्हणजे मी खूप आनंदी होईल.
३ भांडखोर वृत्तीने+ किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका,+ तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.+
४ फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका,+ तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.+
५ ख्रिस्त येशूमध्ये असलेली ही मनोवृत्ती नेहमी आपल्यामध्ये असू द्या.+
६ तो देवाच्या स्वरूपात असूनही+ त्याने कधीही देवाचं स्थान बळकावण्याचा, म्हणजेच देवाशी बरोबरी करण्याचा विचार केला नाही.+
७ उलट, त्याने आपल्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि एखाद्या दासासारखा होऊन+ तो माणूस* बनला.+
८ इतकंच नाही, तर माणूस म्हणून आल्यावर* त्याने स्वतःला नम्र केलं आणि मरण सोसण्याइतपत, हो, वधस्तंभावरचं* मरण+ सोसण्याइतपत तो आज्ञाधारक झाला.+
९ याच कारणामुळे, देवाने एक श्रेष्ठ स्थान देऊन त्याचा गौरव केला+ आणि त्याच्यावर कृपा करून इतर सगळ्या नावांपेक्षा महान असलेलं नाव त्याला बहाल केलं.+
१० हे यासाठी, की स्वर्गात, पृथ्वीवर आणि जमिनीखाली असलेल्यांपैकी* प्रत्येकाने येशूच्या नावाने गुडघे टेकावेत.+
११ आणि देव जो आपला पिता, त्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू असल्याचं उघडपणे मान्य करावं.+
१२ माझ्या प्रिय बांधवांनो, तुम्ही नेहमीच आज्ञा पाळत आला आहात. त्याच प्रकारे, मी तुमच्या जवळ असतानाच नाही, तर विशेषकरून आता, मी तुमच्यापासून दूर असतानासुद्धा तुम्ही भीतभीत आणि थरथर कापत आपलं तारण मिळवून घ्यायचा प्रयत्न करत राहा.
१३ कारण देवाला योग्य वाटतं त्याप्रमाणे तो स्वतः तुम्हाला उत्साहित करतो. आणि तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करावं, म्हणून तो तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करतो आणि ते कार्य करायची ताकदही देतो.
१४ कुरकुर+ आणि वादविवाद न करता सगळ्या गोष्टी करत जा.+
१५ हे यासाठी, की एका बिघडलेल्या आणि विकृत पिढीत+ तुम्ही निर्दोष, निरागस आणि निष्कलंक अशी देवाची मुलं ठरावं.+ या पिढीत तुम्ही जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत आहात.+
१६ तसंच, जीवनाचं वचन अगदी घट्ट धरून ठेवा,+ म्हणजे, ख्रिस्ताच्या दिवशी मला हे जाणून आनंद होईल, की माझं धावणं आणि माझी मेहनत वाया गेली नाही.
१७ पण तुम्ही विश्वासामुळे देत असलेल्या बलिदानावर+ आणि पवित्र सेवेवर* जरी मला पेयार्पणाप्रमाणे ओतलं जात असलं,+ तरी मी तुम्हा सगळ्यांसोबत याबद्दल खूप आनंदी आहे.
१८ त्याच प्रकारे तुम्हीसुद्धा आनंदी होऊन माझ्यासोबत आनंद केला पाहिजे.
१९ मी आशा करतो की प्रभू येशूची इच्छा असेल, तर मला लवकरच तीमथ्यला तुमच्याकडे पाठवता येईल.+ म्हणजे तुमची खबर ऐकून मला प्रोत्साहन मिळेल.
२० कारण त्याच्यासारखा स्वभाव असलेला असा कोणीही माझ्याजवळ नाही, जो तुमची अगदी मनापासून काळजी घेईल.
२१ कारण बाकीचे सर्व जण येशू ख्रिस्ताच्या नाही, तर स्वतःच्याच हिताचा विचार करत आहेत.
२२ पण तीमथ्यबद्दल तुम्हाला स्वतःला हे माहीत आहे, की जसा एखादा मुलगा+ आपल्या वडिलांना मदत करतो, तशीच त्याने माझ्यासोबत आनंदाच्या संदेशाच्या वाढीसाठी मेहनत केली आहे.
२३ म्हणून, माझ्या बाबतीत पुढे काय होणार हे समजताच, मी त्याला तुमच्याकडे पाठवण्याची आशा करतो.
२४ खरंतर, मला ही खातरी वाटते की प्रभूची इच्छा असेल, तर लवकरच मी स्वतःसुद्धा तुमच्याकडे येईन.+
२५ पण सध्या एपफ्रदीतला तुमच्याकडे पाठवणं मला आवश्यक वाटतं. तो माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुम्ही पाठवलेला दूत व मला मदत करणारा सेवक आहे.+
२६ तो तुम्हा सगळ्यांना भेटायला अधीर झाला आहे आणि तो आजारी पडल्याचं तुम्हाला कळल्यामुळे फार निराश झाला आहे.
२७ तो खरंच खूप आजारी पडला होता, अगदी मरायला टेकला होता, पण देवाने त्याच्यावर दया केली. खरंतर फक्त त्याच्यावर नाही तर माझ्यावरही केली. हे यासाठी, की मला एकापाठोपाठ एक दुःख सहन करावं लागू नये.
२८ म्हणून, मी त्याला लवकरात लवकर तुमच्याकडे पाठवतो, म्हणजे त्याला पाहून तुम्ही पुन्हा आनंदी व्हाल आणि माझीही काळजी थोडी कमी होईल.
२९ तो आल्यावर प्रभूमध्ये त्याचं आनंदाने आणि रीतसर स्वागत करा आणि अशा माणसांची नेहमी कदर करत जा.+
३० कारण ख्रिस्ताच्या कार्यासाठी* त्याने आपला प्राण जवळजवळ गमावलाच होता. शिवाय, माझी सेवा करायला तुम्ही स्वतः येऊ शकत नसल्यामुळे, तुमची कमी भरून काढण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला.+
तळटीपा
^ किंवा “एकजिवाचे होऊन.”
^ शब्दशः “माणसांच्या स्वरूपाचा.”
^ शब्दशः “जेव्हा तो माणसाच्या स्वरूपात आढळला तेव्हा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ म्हणजे, ज्यांचं पुनरुत्थान केलं जाईल असे लोक.
^ किंवा “जनसेवेवर.”
^ किंवा कदाचित, “प्रभूच्या कार्यासाठी.”