फिलिप्पैकर यांना पत्र ४:१-२३

  • एकता, आनंद, योग्य विचार (१-९)

    • कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका (६, ७)

  • फिलिप्पैकरांनी पाठवलेल्या भेटींबद्दल कदर (१०-२०)

  • निरोपाचे शब्द (२१-२३)

 माझ्या प्रिय बांधवांनो, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला भेटायला मी आतुर आहे. तुम्ही माझा आनंद आणि माझा मुकुट आहात.+ म्हणून प्रभूमध्ये असेच स्थिर उभे राहा.+ २  मी युवदीयाला विनंती करतो आणि सुंतुखेलाही विनंती करतो, की प्रभूमध्ये एक मनाच्या असा.+ ३  हो, माझा खरा सहकारी* असलेल्या तुलाही मी विनंती करतो, की या स्त्रियांना मदत करत राहा. कारण त्यांनी माझ्यासोबत तसंच क्लेमेंतसोबत आणि जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावं आहेत,+ त्या माझ्या इतर सहकाऱ्‍यांसोबत खांद्याला खांदा लावून खूप मेहनत केली आहे. * ४  प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा. पुन्हा एकदा सांगतो, आनंदी राहा!+ ५  तुमचा समजूतदारपणा+ सर्वांना कळून येऊ द्या. प्रभू जवळ आहे. ६  कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका.+ तर, सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.+ ७  म्हणजे, सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती+ ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचं+ आणि बुद्धीचं* रक्षण करेल. ८  शेवटी बांधवांनो, जे काही खरं, जे काही गंभीरतेने विचार करण्यासारखं, जे काही नीतिमान, जे काही शुद्ध, जे काही प्रिय मानण्यालायक, जे काही आदरणीय, जे काही चांगलं आणि जे काही प्रशंसनीय आहे, अशाच गोष्टींचा नेहमी विचार* करत जा.+ ९  तुम्ही ज्या गोष्टी शिकून घेतल्या आणि स्वीकारल्या, तसंच माझ्याकडून ज्या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या त्या पाळत राहा,+ म्हणजे शांतीचा देव तुमच्यासोबत राहील. १०  प्रभूमध्ये मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो, की शेवटी तुम्ही पुन्हा माझ्या भल्याचा विचार करू लागला आहात.+ आधीसुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटत होती, पण ती दाखवायची संधी तुम्हाला मिळाली नाही. ११  अर्थात, मला एखाद्या गोष्टीची गरज आहे म्हणून मी असं म्हणत नाही. कारण, कोणत्याही परिस्थितीत समाधानी* राहायला मी शिकून घेतलं आहे.+ १२  हलाखीच्या परिस्थितीत कसं राहायचं+ आणि समृद्धीत कसं राहायचं हे मला माहीत आहे. सर्व बाबतींत आणि सर्व परिस्थितींत भरल्या पोटी कसं राहायचं आणि उपाशी कसं राहायचं; तसंच, समृद्धी असताना आणि अडचण असताना कसं राहायचं याचं रहस्य मी शिकलो आहे. १३  जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.+ १४  तरीसुद्धा, माझ्या संकटात मला मदत करून तुम्ही चांगलंच केलं. १५  खरंतर, तुम्हा फिलिप्पैकरांना हेही माहीत आहे, की तुम्ही पहिल्यांदा आनंदाचा संदेश ऐकल्यावर, मी मासेदोनियाहून निघालो, त्या वेळी तुमच्याशिवाय दुसऱ्‍या कोणत्याच मंडळीने माझ्यासोबत देवाणघेवाण केली नाही.+ १६  कारण मी थेस्सलनीकामध्ये असताना माझी गरज भागवण्यासाठी तुम्ही फक्‍त एकदा नाही, तर दोनदा मला काहीतरी पाठवलं होतं. १७  तुमच्याकडून एखादी भेट मिळण्याची मला अपेक्षा आहे असं नाही, तर तुमच्या चांगल्या कामांमुळे तुम्हालाच जास्त फायदा व्हावा असं मला वाटतं. १८  माझ्याजवळ गरजेच्या सगळ्या वस्तू आहेत. खरंतर, गरजेपेक्षा जास्त आहेत. आणि आता एपफ्रदीतच्या+ हातून तुम्ही जे पाठवलं, ते मिळाल्यामुळे मला कसलीच कमी नाही. तुम्ही पाठवलेली ही भेट देवाच्या दृष्टीत एक मोहक सुगंध+ आणि त्याला आनंद देणारं अर्पण आहे. १९  याच्या बदल्यात, माझा देव त्याच्या गौरवी वैभवातून, ख्रिस्त येशूच्या द्वारे तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल.+ २०  आपला देव आणि पिता याला सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन. २१  ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या पवित्र जनांपैकी प्रत्येकाला माझा नमस्कार सांगा. माझ्यासोबत असलेले बांधव तुम्हाला नमस्कार सांगतात. २२  सर्व पवित्र जन आणि खासकरून जे कैसराच्या* घराण्यातले आहेत,+ ते तुम्हाला नमस्कार सांगतात. २३  तुम्ही दाखवत असलेल्या योग्य मनोवृत्तीमुळे प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्यावर असो.

तळटीपा

शब्दशः “जू वाहण्यात खरा सहकारी.”
किंवा “खूप संघर्ष केला आहे.”
किंवा “विचारांचं.”
किंवा “मनन.”
किंवा “संतुष्ट.”
किंवा “रोमी सम्राटाच्या.” शब्दार्थसूची पाहा.