मत्तयने सांगितलेला संदेश २:१-२३

  • ज्योतिषी भेटायला येतात (१-१२)

  • इजिप्तला पळून जाणं (१३-१५)

  • हेरोद लहान मुलांची हत्या करतो (१६-१८)

  • नासरेथला परत येणं (१९-२३)

 हेरोद* राजाच्या काळात+ यहूदीयातल्या बेथलेहेममध्ये+ येशूचा जन्म झाला. त्याच्या काही काळानंतर पूर्वेकडचे काही ज्योतिषी यरुशलेमला आले, २  आणि विचारू लागले: “नुकताच जन्मलेला यहुद्यांचा राजा कुठे आहे?+ कारण आम्ही पूर्वेकडे असताना त्याचा तारा आम्हाला दिसला. म्हणून आम्ही त्याला नमन करायला आलोय.” ३  हे ऐकून हेरोद राजा आणि यरुशलेममधले सर्व लोक घाबरून गेले. ४  तेव्हा हेरोदने सगळ्या मुख्य याजकांना आणि शास्त्र्यांना एकत्र जमवून, ख्रिस्ताचा* जन्म कुठे होणार होता हे विचारलं. ५  ते म्हणाले: “यहूदीयातल्या बेथलेहेममध्ये.+ कारण संदेष्ट्याने असं लिहिलंय: ६  ‘हे यहूदा देशातल्या बेथलेहेम, राज्यपालांच्या शासनाखाली असलेल्या यहूदातल्या सर्व शहरांमध्ये, तुझं स्थान कमी महत्त्वाचं मुळीच नाही. कारण तुझ्यातूनच एक शासक येईल आणि माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करेल.’”+ ७  मग हेरोदने ज्योतिष्यांना गुपचूप बोलावून घेतलं. त्याने बारकाईने चौकशी करून, तो तारा केव्हा दिसला होता हे त्यांच्याकडून माहीत करून घेतलं. ८  मग त्यांना बेथलेहेमला पाठवताना तो म्हणाला: “जा, तो लहान मुलगा कुठे आहे ते नीट शोधा आणि तो सापडल्यावर परत येऊन मला सांगा. मग मीही जाऊन त्याला नमन करीन.” ९  राजाचं बोलणं ऐकून ते निघाले आणि पाहा! ते पूर्वेकडे असताना जो तारा त्यांना दिसला होता,+ तोच तारा त्यांच्या पुढेपुढे जाऊ लागला. मग ज्या घरात तो मुलगा होता त्या घरावर तो येऊन थांबला. १०  तो तारा पाहून त्यांना खूप आनंद झाला. ११  मग त्या घरात गेल्यावर त्यांना तो लहान मुलगा त्याच्या आईसोबत म्हणजे मरीयासोबत दिसला. तेव्हा त्यांनी गुडघे टेकून त्याला नमन केलं आणि आपल्या खजिन्याच्या पेट्या उघडून सोनं, ऊद आणि गंधरस* या भेटवस्तू त्याला दिल्या. १२  पण त्यांना स्वप्नात देवाकडून सूचना मिळाली होती,+ की हेरोदकडे परत जाऊ नका. म्हणून ते वेगळ्या मार्गाने आपल्या देशाकडे निघून गेले. १३  ते निघून गेल्यावर यहोवाचा* दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन+ म्हणाला: “ऊठ, लहान मुलाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्त* देशात पळून जा. मी सांगेपर्यंत तिथेच राहा, कारण या लहान मुलाचा जीव घेण्यासाठी हेरोद लवकरच त्याचा शोध घेणार आहे.” १४  म्हणून योसेफ उठला आणि त्याच रात्री मुलाला आणि मरीयाला घेऊन इजिप्तला निघून गेला. १५  हेरोदचा मृत्यू होईपर्यंत तो तिथेच राहिला. अशा प्रकारे यहोवाने* आपल्या संदेष्ट्याद्वारे जे म्हटलं होतं, की “मी माझ्या मुलाला इजिप्तमधून बोलावलं,” ते पूर्ण झालं.+ १६  ज्योतिष्यांनी आपल्याला फसवलं आहे हे कळल्यावर हेरोद खूप संतापला. त्याने माणसं पाठवून बेथलेहेम आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांतल्या दोन वर्षांच्या आणि त्याहून कमी वयाच्या सर्व मुलांना ठार मारलं. कारण त्याने आधीच नीट चौकशी करून त्या लहान मुलाच्या जन्माची वेळ ज्योतिष्यांकडून विचारून घेतली होती.+ १७  अशा प्रकारे यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगण्यात आलं होतं ते पूर्ण झालं. ते असं: १८  “रामा नगरातून रडण्याचा आणि शोक करण्याचा आवाज ऐकू आला. राहेल+ आपल्या मुलांसाठी रडत होती. तिचं काही केल्या सांत्वन होत नव्हतं, कारण तिची मुलं आता नाहीत.”+ १९  हेरोदचा मृत्यू झाल्यानंतर यहोवाच्या* दूताने इजिप्तमध्ये योसेफला स्वप्नात दर्शन दिलं.+ २०  तो म्हणाला: “ऊठ, लहान मुलाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात जा, कारण जे मुलाच्या जिवावर उठले होते ते आता मेले आहेत.” २१  म्हणून तो उठला आणि मुलाला व मरीयाला घेऊन इस्राएल देशात आला. २२  पण यहूदीयात हेरोदच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव राज्य करत आहे, हे कळल्यावर त्याला तिथे जायला भीती वाटली. शिवाय, देवाने त्याला स्वप्नात सूचना दिल्यामुळे+ तो गालीलच्या प्रदेशात+ निघून गेला. २३  तिथे तो नासरेथ नावाच्या शहरात जाऊन राहू लागला.+ अशा प्रकारे, “त्याला नासरेथकर* म्हटलं जाईल,” हे संदेष्ट्यांचे शब्द पूर्ण झाले.+

तळटीपा

किंवा “मसीहाचा; देवाच्या अभिषिक्‍ताचा.”
ऊद आणि गंधरस हे मौल्यवान, सुगंधी पदार्थ होते. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मिसर.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
कदाचित “अंकुर” या अर्थाच्या मूळ हिब्रू शब्दावरून.