मत्तयने सांगितलेला संदेश २०:१-३४
२० स्वर्गाचं राज्य अशा एका जमीनदारासारखं आहे, जो आपल्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी मजूर ठरवायला पहाटेच निघाला.+
२ दिवसाला एक दिनार* याप्रमाणे मजुरी द्यायचं ठरल्यावर, त्याने त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवून दिलं.
३ मग पुन्हा सकाळी नऊच्या सुमारास* तो बाहेर गेला, तेव्हा त्याला बाजारात आणखी काही जण दिसले. त्यांना अजूनही काम मिळालं नव्हतं.
४ तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मी तुम्हाला योग्य ती मजुरी देईन.’
५ तेव्हा तेही मळ्यात गेले. मग दुपारी बाराच्या* आणि तीनच्या* सुमारास तो पुन्हा बाहेर गेला आणि त्याने तसंच केलं.
६ शेवटी पाचच्या सुमारास* तो बाहेर गेला, तेव्हा त्याला आणखी काही जण नुसतेच उभे असलेले दिसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘तुम्ही दिवसभर इथे रिकामेच का उभे राहिलात?’
७ त्यांनी उत्तर दिलं, ‘कारण आम्हाला कोणीच काम दिलं नाही.’ तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा.’
८ मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा मालक आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, ‘मजुरांना बोलावून त्यांना त्यांची मजुरी दे.+ जे शेवटी आले होते त्यांना आधी आणि जे आधी आले होते त्यांना शेवटी मजुरी दे.’
९ पाच वाजता कामावर घेतलेले मजूर आले, तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक दिनार* मजुरी मिळाली.
१० त्यामुळे सुरुवातीला कामावर घेतलेले मजूर जेव्हा आपली मजुरी घ्यायला आले, तेव्हा आपल्याला जास्त मजुरी मिळेल असं त्यांना वाटलं. पण त्यांनाही एकच दिनार* देण्यात आला.
११ तेव्हा ते जमीनदाराविरुद्ध कुरकुर करू लागले
१२ आणि म्हणाले, ‘आम्ही दिवसभर उन्हातान्हात राबलो, पण या शेवटी आलेल्यांनी फक्त एकच तास काम केलं; तरी तुम्ही त्यांना आमच्यासारखंच लेखलं!’
१३ तेव्हा तो त्यांच्यापैकी एकाला म्हणाला, ‘हे बघ, मी तुझ्यावर काही अन्याय केला नाही. तू एक दिनार* मजुरीवर काम करायला तयार झाला होतास की नाही?+
१४ मग तुझी मजुरी घे आणि जा. मला या शेवटच्या मजुरालाही तुझ्याइतकीच मजुरी द्यायची आहे.
१५ जे माझ्या मालकीचं आहे, त्याचं माझ्या मनाप्रमाणे करायचा मला अधिकार नाही का? की माझ्या चांगुलपणामुळे* तुझी नजर द्वेषाने* भरली आहे?’+
१६ अशा प्रकारे, शेवटचे ते पहिले आणि पहिले ते शेवटचे होतील.”+
१७ मग वर यरुशलेमला जात असताना येशू वाटेत आपल्या १२ शिष्यांना बाजूला घेऊन म्हणाला:+
१८ “पाहा! आपण वर यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या मुलाला मुख्य याजकांच्या आणि शास्त्र्यांच्या हवाली केलं जाईल. ते त्याला मृत्युदंड सुनावतील+
१९ आणि विदेश्यांच्या हाती सोपवतील आणि ते त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील आणि वधस्तंभावर* खिळतील+ आणि तिसऱ्या दिवशी त्याला उठवलं जाईल.”+
२० मग जब्दीच्या मुलांची+ आई आपल्या मुलांना येशूजवळ घेऊन आली आणि तिने त्याला नमन केलं. तिला त्याच्याकडे काहीतरी मागायचं होतं.+
२१ म्हणून तो तिला म्हणाला: “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली: “तुझ्या राज्यात माझ्या या मुलांपैकी एक जण तुझ्या उजवीकडे आणि दुसरा तुझ्या डावीकडे बसेल असं वचन दे.”+
२२ येशू म्हणाला: “तुम्ही काय मागत आहात याची तुम्हाला कल्पना नाही. जो प्याला मी लवकरच पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल का?”+ ते म्हणाले: “हो, पिता येईल.”
२३ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही माझा प्याला जरूर प्याल,+ पण माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसण्याचा अधिकार देणं माझ्या हातात नाही. माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तो राखून ठेवलाय त्यांना तो मिळेल.”+
२४ ही गोष्ट बाकीच्या दहा जणांनी ऐकली तेव्हा त्यांना त्या दोघा भावांचा खूप राग आला.+
२५ पण येशू त्यांना आपल्याजवळ बोलावून म्हणाला: “विदेश्यांचे राजे लोकांवर सत्ता चालवतात आणि महत्त्वाच्या पदांवर असलेले त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हाला माहीत आहे.+
२६ पण तुमच्यामध्ये असं व्हायला नको.+ उलट, ज्याला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे.+
२७ आणि ज्याला तुमच्यामध्ये प्रमुख व्हायचं असेल त्याने तुमचा दास झालं पाहिजे.+
२८ कारण, मनुष्याचा मुलगापण सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला+ आणि बऱ्याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.”+
२९ ते यरीहोमधून बाहेर जात असताना एक मोठा समुदाय त्याच्यामागे आला.
३० तितक्यात, रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन आंधळ्यांनी येशू तिथून जात असल्याचं ऐकलं. तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “हे प्रभू, दावीदच्या मुला, आमच्यावर दया कर!”+
३१ पण लोकांनी त्यांना दटावून गप्प बसायला सांगितलं. तेव्हा ते आणखीनच मोठ्याने ओरडून म्हणाले: “हे प्रभू, दावीदच्या मुला, आमच्यावर दया कर!”
३२ म्हणून येशू थांबला आणि त्यांना बोलावून म्हणाला: “मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?”
३३ ते त्याला म्हणाले, “प्रभू, आम्हाला दिसू दे.”
३४ तेव्हा येशूला त्यांचा कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला,+ तेव्हा लगेच त्यांची दृष्टी परत आली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.
तळटीपा
^ शब्दशः “सुमारे तिसऱ्या तासाला.”
^ शब्दशः “सुमारे सहाव्या तासाला.”
^ शब्दशः “सुमारे नवव्या तासाला.”
^ शब्दशः “सुमारे अकराव्या तासाला.”
^ किंवा “उदारतेमुळे.”
^ शब्दशः “वाईटपणाने; दुष्टतेने.”
^ शब्दार्थसूची पाहा.