मत्तयने सांगितलेला संदेश २४:१-५१

  • ख्रिस्ताच्या उपस्थितीचं चिन्ह (१-५१)

    • लढाया, दुष्काळ, भूकंप ()

    • आनंदाचा संदेश घोषित करणं (१४)

    • मोठं संकट (२१, २२)

    • मनुष्याच्या मुलाचं चिन्ह (३०)

    • अंजिराचं झाड (३२-३४)

    • नोहाच्या दिवसांसारखी परिस्थिती (३७-३९)

    • जागे राहा (४२-४४)

    • विश्‍वासू दास आणि दुष्ट दास (४५-५१)

२४  मग येशू मंदिरातून बाहेर जात असताना त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याला मंदिराच्या इमारती दाखवू लागले. २  तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही या सर्व गोष्टी पाहताय ना? मी तुम्हाला खरं सांगतो, इथे एकाही दगडावर दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”+ ३  तो जैतुनांच्या डोंगरावर बसलेला असताना, शिष्य एकांतात त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “आम्हाला सांग, या गोष्टी केव्हा होतील आणि तुझ्या उपस्थितीचं*+ आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं* चिन्ह काय असेल?”+ ४  यावर येशूने त्यांना उत्तर दिलं: “तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.+ ५  कारण माझ्या नावाने बरेच जण येतील आणि ‘मी ख्रिस्त आहे,’ असं म्हणून पुष्कळ जणांना फसवतील.+ ६  तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल. पण सांभाळा, घाबरून जाऊ नका, कारण या गोष्टी घडणं आवश्‍यक आहे, पण इतक्यात अंत येणार नाही.+ ७  कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.+ ठिकठिकाणी दुष्काळ पडतील+ आणि भूकंप होतील.+ ८  पण या सगळ्या गोष्टी संकटांची* फक्‍त सुरुवात असेल. ९  तेव्हा लोक तुमचा छळ करण्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्‍यांच्या हवाली करतील.+ ते तुम्हाला ठार मारतील+ आणि माझ्या नावामुळे सगळी राष्ट्रं तुमचा द्वेष करतील.+ १०  तसंच, त्या वेळी बरेच लोक अडखळतील* आणि एकमेकांचा विश्‍वासघात करतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. ११  पुष्कळ खोटे संदेष्टे उठून बऱ्‍याच जणांना फसवतील.+ १२  आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होईल. १३  पण जो शेवटपर्यंत धीर धरेल* त्यालाच वाचवलं जाईल.*+ १४  आणि सगळ्या राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल+ आणि त्यानंतर अंत येईल. १५  म्हणून दानीएल संदेष्ट्याने सांगितलेली उद्ध्‌वस्त करणारी घृणास्पद गोष्ट जेव्हा तुम्ही एका पवित्र ठिकाणात उभी असलेली पाहाल+ (वाचणाऱ्‍याने हे समजून घ्यावं), १६  तेव्हा जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करावी.+ १७  आणि घराच्या छतावर असलेल्या माणसाने आपल्या घरातून काही वस्तू घ्यायला खाली येऊ नये, १८  शेतात असलेल्या माणसानेही आपलं बाहेरचं वस्त्र घ्यायला परत जाऊ नये. १९  त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्‍या स्त्रियांची फार दुर्दशा होईल! २०  तुम्हाला हिवाळ्यात किंवा शब्बाथाच्या दिवशी पळून जावं लागू नये म्हणून प्रार्थना करत राहा. २१  कारण तेव्हा, जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही+ असं मोठं संकट येईल.+ २२  खरं पाहता, जर ते दिवस कमी करण्यात आले नाहीत, तर कोणीच वाचू शकणार नाही; पण निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील.+ २३  तेव्हा जर कोणी तुम्हाला म्हणालं, की ‘पाहा! ख्रिस्त इथे आहे,’+ किंवा ‘तिथे आहे!’ तर त्यावर विश्‍वास ठेवू नका.+ २४  कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे+ उठतील आणि लोकांना, इतकंच काय तर निवडलेल्या लोकांनाही फसवण्यासाठी मोठमोठी चिन्हं आणि चमत्कार करतील.+ २५  पण पाहा! मी तुम्हाला हे सगळं आधीच सांगून ठेवलंय. २६  म्हणून, जर लोक तुम्हाला म्हणाले, की ‘पाहा! तो ओसाड रानात आहे,’ तर बाहेर जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, ‘पाहा! तो आतल्या खोल्यांमध्ये आहे,’ तर त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका.+ २७  कारण वीज जशी पूर्वेकडे चमकून पश्‍चिमेपर्यंत चकाकत जाते, तशीच मनुष्याच्या मुलाची उपस्थितीही* असेल.+ २८  जिथे प्रेत आहे तिथे गिधाडं जमा होतील.+ २९  त्या दिवसांतल्या संकटानंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल+ आणि चंद्र प्रकाश देणार नाही. तसंच तारे आकाशातून खाली पडतील आणि आकाशातल्या शक्‍तींना हादरे बसतील.+ ३०  मग मनुष्याच्या मुलाचं चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवर सगळ्या वंशांचे लोक दुःखाने छाती बडवून घेतील.+ ते मनुष्याच्या मुलाला+ आकाशातल्या ढगांवर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील.+ ३१  तो आपल्या स्वर्गदूतांना कर्ण्याच्या मोठ्या आवाजासोबत पाठवेल आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना चारही दिशांतून* गोळा करतील.+ ३२  आता अंजिराच्या झाडाच्या उदाहरणावरून एक गोष्ट समजून घ्या: अंजिराच्या झाडाच्या कोवळ्या फांदीला जेव्हा पालवी फुटते, तेव्हा उन्हाळा जवळ आलाय हे तुम्ही ओळखता.+ ३३  त्याच प्रकारे तुम्हीपण या सगळ्या गोष्टी पाहाल तेव्हा तो दाराजवळच आहे हे ओळखा.+ ३४  मी तुम्हाला खरं सांगतो, या सगळ्या गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी मुळीच नाहीशी होणार नाही. ३५  आकाश आणि पृथ्वीही नाहीशी होईल, पण माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत.+ ३६  त्या दिवसाबद्दल आणि त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही,+ स्वर्गदूतांना नाही आणि देवाच्या मुलालाही नाही; फक्‍त पित्याला माहीत आहे.+ ३७  कारण नोहाच्या दिवसांत जसं होतं+ तसंच मनुष्याच्या मुलाच्या उपस्थितीच्या* काळातही होईल.+ ३८  कारण जलप्रलय येण्याआधीच्या काळात, नोहा जहाजात* गेला त्या दिवसापर्यंत+ लोक खातपीत होते, लग्नं करत होते ३९  आणि जलप्रलय येऊन ते सगळे त्यात वाहून जाईपर्यंत+ त्यांनी लक्ष दिलं नाही. त्याच प्रकारे, मनुष्याच्या मुलाच्या उपस्थितीच्या काळातही होईल. ४०  तेव्हा जर दोन माणसं शेतात असतील, तर एकाला घेतलं जाईल आणि दुसऱ्‍याला सोडून दिलं जाईल. ४१  दोन बायका जात्यावर दळत असतील, तर एकीला घेतलं जाईल आणि दुसरीला सोडून दिलं जाईल.+ ४२  म्हणून जागे राहा, कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येतोय हे तुम्हाला माहीत नाही.+ ४३  पण एक गोष्ट लक्षात असू द्या: चोर कोणत्या प्रहरी* येणार आहे हे जर घराच्या मालकाला माहीत असतं,+ तर तो जागाच राहिला असता आणि त्याने त्याला आपलं घर फोडू दिलं नसतं.+ ४४  म्हणून तुम्हीही तयार राहा,+ कारण तुम्ही विचारही केला नसेल अशा वेळी मनुष्याचा मुलगा येईल. ४५  आपल्या घरातल्या सेवकांना योग्य वेळी अन्‍न पुरवण्यासाठी मालकाने ज्याला नेमलं, असा विश्‍वासू आणि बुद्धिमान* दास खरोखर कोण आहे?+ ४६  मालक परत आल्यावर तो त्याला तसं करताना दिसला, तर तो दास आशीर्वादित ठरेल!+ ४७  मी तुम्हाला खरं सांगतो, तो त्याला आपल्या सगळ्या मालमत्तेवर अधिकार देईल. ४८  पण जर तो दुष्ट दास कधी मनात म्हणाला, की ‘माझ्या मालकाला परत यायला उशीर लागतोय,’+ ४९  आणि जर तो आपल्या सोबतच्या दासांना मारहाण करू लागला आणि अट्टल दारुड्यांसोबत खाऊपिऊ लागला, ५०  तर त्याने अपेक्षाही केली नसेल अशा दिवशी आणि त्याने कल्पनाही केली नसेल अशा वेळी त्याचा मालक येईल.+ ५१  तो त्याला सगळ्यात कडक शिक्षा देईल आणि अविश्‍वासू लोकांमध्ये त्याला टाकून देईल. तिथे तो रडेल आणि आक्रोश करेल.*+

तळटीपा

किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीचं.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “बाळाच्या जन्माच्या वेळी स्त्रीला येणाऱ्‍या कळांची.”
किंवा “आपला विश्‍वास गमावतील.”
किंवा “धीर धरतो.”
किंवा “त्याचंच तारण होईल.”
शब्दशः “वाऱ्‍यांतून.”
शब्दशः “पेटी.” हे चौकोनी कोपरे आणि खालचा भाग सपाट असलेल्या पेटीच्या आकाराच्या एका लांबुळक्या जहाजाला सूचित करतं.
किंवा “रात्री कोणत्या वेळी.”
किंवा “समजदार.”
किंवा “दात खाईल.”