मत्तयने सांगितलेला संदेश २८:१-२०
२८ शब्बाथानंतर, आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असताना मग्दालीया मरीया आणि दुसरी मरीया येशूची कबर पाहायला आल्या.+
२ आणि पाहा! मोठा भूकंप झाला होता कारण यहोवाचा* दूत स्वर्गातून उतरला होता आणि कबरेच्या दारावरचा दगड लोटून तो त्यावर बसला होता.+
३ तो चमकणाऱ्या विजेसारखा दिसत होता आणि त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.+
४ त्याला पाहून पहारेकरी भीतीने थरथर कापू लागले आणि त्यांची स्थिती मेलेल्या माणसांसारखी झाली.
५ पण स्वर्गदूत त्या स्त्रियांना म्हणाला: “घाबरू नका, कारण ज्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला, त्या येशूला तुम्ही शोधत आहात हे मला माहीत आहे.+
६ तो इथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला उठवण्यात आलंय.+ या, आणि त्याला जिथे ठेवण्यात आलं होतं ती जागा पाहा.
७ मग लगेच जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, की त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय. कारण पाहा! तो तुमच्यापुढे गालीलला जातोय.+ तुम्ही त्याला तिथे पाहाल. बघा! मी हाच संदेश सांगायला आलोय.”+
८ तेव्हा त्या कबरेजवळून* निघून त्याच्या शिष्यांना ही बातमी सांगायला धावत गेल्या. त्या फार घाबरलेल्या होत्या पण खूप आनंदीसुद्धा होत्या.+
९ आणि पाहा! येशू त्यांना भेटला आणि म्हणाला: “तुम्हाला शांती असो!” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचे पाय धरले आणि त्याला नमन केलं.
१० मग येशू त्यांना म्हणाला: “घाबरू नका! जा आणि माझ्या भावांना ही बातमी सांगा, म्हणजे ते गालीलमध्ये जातील आणि तिथे मला पाहतील.”
११ त्या जात असताना पहारेकऱ्यांपैकी काही जण+ शहरात गेले आणि त्यांनी घडलेली सगळी हकिगत मुख्य याजकांना सांगितली.
१२ मग त्यांनी वडीलजनांसोबत चर्चा केल्यानंतर, सैनिकांना भरपूर चांदीची नाणी दिली
१३ आणि ते म्हणाले: “असं म्हणा, की ‘आम्ही रात्री झोपेत होतो, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला चोरून नेलं.’+
१४ आणि ही गोष्ट राज्यपालाच्या कानावर गेलीच, तर आम्ही त्याला सगळं काही समजावून सांगू,* तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही.”
१५ तेव्हा त्यांनी ती चांदीची नाणी घेऊन त्यांना सांगितल्याप्रमाणे केलं. आणि हीच गोष्ट यहुद्यांमध्ये पसरली आणि आजपर्यंत सांगितली जाते.
१६ इकडे, ११ शिष्य गालीलमध्ये,+ येशूने त्यांना ज्या डोंगरावर भेटायला सांगितलं होतं त्या डोंगरावर गेले.+
१७ त्याला पाहिल्यावर त्यांनी त्याला नमन केलं, पण काहींच्या मनात शंका आली.
१८ मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याशी बोलला. तो त्यांना म्हणाला: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला देण्यात आलाय.+
१९ म्हणून, जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा+ आणि त्यांना पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्तीच्या* नावाने बाप्तिस्मा द्या,+
२० आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.+ आणि पाहा! जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत*+ मी नेहमी तुमच्यासोबत असेन.”
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “स्मारक कबरेजवळून.”
^ शब्दशः “त्याचं मन वळवू.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीपर्यंत.” शब्दार्थसूची पाहा.