मत्तयने सांगितलेला संदेश ९:१-३८
९ मग नावेत बसून तो पलीकडे, आपल्या शहरात गेला.+
२ तेव्हा काही जणांनी खाटेवर पडून असलेल्या एका माणसाला त्याच्याकडे आणलं. त्याला लकवा मारला होता. त्यांचा विश्वास पाहून येशू त्या माणसाला म्हणाला: “मुला, काळजी करू नकोस. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”+
३ तेव्हा, काही शास्त्री आपसात म्हणू लागले: “हा तर देवाची निंदा करतोय.”
४ त्यांचे विचार ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही असे दुष्ट विचार का करता?+
५ मला सांगा, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे, की ‘ऊठ आणि चालायला लाग,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे?+
६ तरी, मनुष्याच्या मुलाला पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे हे तुम्हाला कळावं म्हणून . . . . ” मग येशू त्या लकवा मारलेल्या माणसाला म्हणाला: “ऊठ, आपली खाट उचल आणि घरी जा.”+
७ तेव्हा तो उठला आणि आपल्या घरी गेला.
८ लोकांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना भीती वाटली आणि माणसांना असा अधिकार देणाऱ्या देवाचा त्यांनी गौरव केला.
९ मग तिथून पुढे जाताना येशूला मत्तय नावाचा एक माणूस जकात नाक्यावर बसलेला दिसला. तो त्या माणसाला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.” तेव्हा तो माणूस उठला आणि त्याच्यामागे चालू लागला.+
१० नंतर येशू मत्तयच्या घरी जेवायला बसला होता, तेव्हा बरेच जकातदार आणि पापी लोक तिथे आले. ते येशूसोबत आणि त्याच्या शिष्यांसोबत जेवायला बसले.+
११ हे पाहून परूशी त्याच्या शिष्यांना म्हणाले: “तुमचा गुरू जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत बसून कसा काय जेवतो?”+
१२ त्यांचं हे बोलणं ऐकून तो म्हणाला: “वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी लोकांना असते.+
१३ म्हणून आता जा आणि ‘मला बलिदान नको, दया हवी,’ याचा काय अर्थ होतो हे शिका.+ कारण मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.”
१४ मग योहानच्या शिष्यांनी येशूकडे येऊन विचारलं: “परूशी लोक आणि आम्ही उपास करतो, पण तुमचे शिष्य उपास करत नाहीत, असं का बरं?”+
१५ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “नवरा मुलगा+ सोबत असेपर्यंत त्याच्या मित्रांना शोक करायची गरज असते का? पण असे दिवस येतील, जेव्हा नवऱ्या मुलाला त्यांच्यापासून दूर केलं जाईल+ आणि तेव्हा ते उपास करतील.
१६ जुन्या झग्याला कोणीही नवीन कापडाचं ठिगळ लावत नाही. कारण नवीन कापड आकसतं आणि झग्याला पडलेलं छिद्र आणखीनच मोठं होतं.+
१७ तसंच, लोक कधीही जुन्या बुधल्यांमध्ये* नवीन द्राक्षारस भरत नाहीत. कारण असं केलं, तर बुधल्या फाटून द्राक्षारस सांडेल आणि बुधल्याही खराब होतील. म्हणून, लोक नवीन द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये भरतात आणि त्यामुळे दोन्ही टिकतात.”
१८ तो या गोष्टी त्यांना सांगत होता, इतक्यात एक अधिकारी त्याच्याकडे आला. तो त्याला नमन करून म्हणाला: “आतापर्यंत तर माझी मुलगी मेली असेल. पण माझ्या घरी येऊन तिच्यावर हात ठेवा म्हणजे ती जिवंत होईल.”+
१९ मग येशू उठला आणि त्याच्या शिष्यांसोबत त्या अधिकाऱ्याच्या मागे गेला.
२० इतक्यात, १२ वर्षांपासून रक्तस्रावाने+ आजारी असलेली एक स्त्री येशूच्या मागून आली. आणि तिने त्याच्या कपड्यांच्या काठाला हात लावला.+
२१ कारण ती मनातल्या मनात म्हणत होती: “मी फक्त त्याच्या कपड्यांना हात लावला तरी बरी होईन.”
२२ येशूने मागे वळून तिला पाहिलं आणि तो म्हणाला: “मुली, घाबरू नकोस! तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय.”+ आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.+
२३ मग येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी आला, तेव्हा त्याने बासरीवर शोकसंगीत वाजवणाऱ्या आणि मोठमोठ्याने रडणाऱ्या लोकांना पाहिलं.+
२४ तो म्हणाला: “तुम्ही सगळे बाहेर जा. कारण मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+ तेव्हा, लोक त्याची थट्टा करत हसू लागले.
२५ लोकांना बाहेर पाठवल्यावर तो आत गेला आणि त्याने मुलीचा हात आपल्या हातात घेतला.+ तेव्हा ती लगेच उठली.+
२६ या घटनेची बातमी त्या पूर्ण प्रदेशात पसरली.
२७ येशू तिथून पुढे गेला तेव्हा दोन आंधळी माणसं+ त्याच्या मागेमागे चालत मोठ्याने म्हणत होती: “हे दावीदच्या मुला, आमच्यावर दया कर.”
२८ मग तो घरात गेल्यावर ती आंधळी माणसं त्याच्याजवळ आली आणि त्याने त्यांना विचारलं: “मी तुमची दृष्टी परत देऊ शकतो असा विश्वास तुम्हाला आहे का?”+ ते म्हणाले: “हो, प्रभू.”
२९ मग, त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला+ आणि तो म्हणाला: “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.”
३० तेव्हा त्यांना लगेच दिसू लागलं. मग येशूने त्यांना असं बजावून सांगितलं: “कोणालाही याबद्दल कळू देऊ नका.”+
३१ पण तिथून गेल्यावर त्यांनी त्या प्रदेशातल्या सगळ्या लोकांना याबद्दल सांगितलं.
३२ ते तिथून जात होते, तेव्हा लोकांनी दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलेल्या एका मुक्या माणसाला त्याच्याकडे आणलं.+
३३ त्याने दुष्ट स्वर्गदूताला काढल्यावर तो मुका माणूस बोलू लागला.+ लोकांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “इस्राएलमध्ये पूर्वी कधीच असं घडलं नव्हतं.”+
३४ पण परूशी लोक म्हणू लागले: “हा दुष्ट स्वर्गदूतांच्या अधिकाऱ्याच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+
३५ मग, येशू सभास्थानांत शिकवत आणि देवाच्या राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत सगळ्या नगरांतून आणि गावांतून फिरला. तसंच त्याने सर्व प्रकारचे रोग आणि दुखणीही बरी केली.+
३६ त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला.+ कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले आणि भरकटलेले होते.+
३७ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “पीक तर भरपूर आहे, पण कामकरी कमी आहेत.+
३८ म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करायला कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.”+