मलाखी २:१-१७
२ “याजकांनो, ही आज्ञा तुमच्यासाठी आहे.+
२ जर तुम्ही माझं ऐकलं नाही आणि माझ्या नावाचा गौरव करण्याकडे लक्ष दिलं नाही, तर मी तुमच्यावर शाप पाठवीन.+ आणि तुमचे आशीर्वाद शापांमध्ये बदलीन.+ हो, तुम्ही लक्ष देत नसल्यामुळे, मी तुमचे आशीर्वाद शापांत बदलले आहेत,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
३ “पाहा! मी तुमच्यामुळे तुमचं पेरलेलं बियाणं नष्ट करीन,*+ आणि तुमच्या सणांतल्या बलिदानांच्या प्राण्यांचं शेण तुमच्या तोंडाला फासीन आणि तुम्हाला नेऊन शेणाच्या ढिगाऱ्यावर* फेकलं जाईल.
४ मग तुम्हाला कळेल, की लेवीसोबत केलेला माझा करार पुढे चालू राहावा,+ म्हणून मी तुम्हाला ही आज्ञा दिली आहे,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
५ “त्याने माझं भय मानावं,* म्हणून मी त्याच्यासोबत जीवनाचा आणि शांतीचा हा करार केला होता. त्याने माझं भय मानलं आणि माझ्या नावाचा सन्मान केला.
६ सत्याचा नियम* त्याच्या तोंडात होता+ आणि त्याच्या ओठांवर कोणतीही अनीती दिसून आली नाही. तो माझ्यासोबत शांतीने आणि सरळ मार्गाने चालला+ आणि त्याने अनेकांना अपराधापासून वळवलं.
७ याजकाच्या ओठांनी ज्ञानाचं रक्षण केलं पाहिजे आणि लोकांनी त्याच्याकडे नियमशास्त्राबद्दल* विचारपूस केली पाहिजे,+ कारण तो सैन्यांचा देव यहोवा याचा दूत आहे.”
८ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “तुम्ही मात्र मार्गावरून भरकटला आहात. तुम्ही बऱ्याच लोकांना नियमशास्त्राच्या बाबतीत* अडखळायला लावलं आहे.+ तुम्ही लेवीचा करार मोडला आहे.+
९ मी तुम्हाला लोकांमध्ये तुच्छ करीन आणि ते तुमचा तिरस्कार करतील, कारण तुम्ही माझ्या मार्गांनी चालला नाहीत. उलट माझं नियमशास्त्र लागू करताना तुम्ही भेदभाव केला.”+
१० “आपल्या सगळ्यांचा एकच पिता नाही का?+ एकाच देवाने आपल्याला निर्माण केलं नाही का? मग आपण एकमेकांशी विश्वासघात करून,+ आपल्या वाडवडिलांच्या कराराचा अनादर का करावा?
११ यहूदाने विश्वासघात केलाय आणि इस्राएलमध्ये व यरुशलेममध्ये घृणास्पद असं काहीतरी घडलंय. यहोवा ज्या पावित्र्यावर*+ प्रेम करतो, त्याचा यहूदाने अनादर केलाय. आणि त्याने एका परक्या देवाच्या मुलीशी लग्न केलंय.+
१२ यहोवा असं करणाऱ्या प्रत्येकाला, याकोबच्या तंबूंमधून नष्ट करेल, मग तो कोणीही असो.* जरी त्याने सैन्यांचा देव यहोवा याच्यासाठी अर्पण आणलं, तरी त्याला नष्ट केलं जाईल.”+
१३ “तुम्ही आणखी* एक गोष्ट करता; आणि त्यामुळे यहोवाची वेदी अश्रूंनी भिजली आहे आणि तिथे रडण्याचा व उसासे टाकण्याचा आवाज ऐकू येत आहे. म्हणूनच, आता तो तुमच्या अर्पणांकडे लक्ष देत नाही आणि तुमच्या हातून काहीही स्वीकारत नाही.+
१४ तुम्ही म्हणता, ‘हे कशामुळे?’ कारण, यहोवा तुमच्यामध्ये आणि तुमच्या तरुणपणाच्या बायकोमध्ये साक्षीदार झाला आहे. ती कराराने तुमची बायको* आणि जीवनसाथी आहे, तरी तुम्ही तिच्याशी विश्वासघात केला.+
१५ पण तुमच्यात असे काही जण आहेत, ज्यांनी अशा प्रकारे न वागण्याचं आपल्या मनात ठरवलं आहे. कारण त्यांना अशी मुलं हवी आहेत, जी खरोखर देवाच्या लोकांपैकी* असतील. हे लोक अजूनही देवाच्या पवित्र शक्तीच्या* मार्गदर्शनाप्रमाणे वागतात. म्हणून आता तुम्हीही आपल्या मनाचं परीक्षण करा आणि योग्य मनोवृत्ती उत्पन्न करा. आपल्या तरुणपणाच्या बायकोसोबत विश्वासघात न करण्याचा निश्चय करा.
१६ कारण मला* घटस्फोटाची घृणा वाटते,’+ असं इस्राएलचा देव यहोवा म्हणतो. “आणि जो हिंसाचाराने आपले कपडे डागाळतो* त्याचीही मला घृणा वाटते,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. “म्हणून आपल्या मनाचं परीक्षण करा आणि योग्य मनोवृत्ती उत्पन्न करा. यापुढे विश्वासघात करू नका.+
१७ तुम्ही यहोवाला आपल्या शब्दांनी हैराण केलं आहे.+ पण तुम्ही म्हणता, ‘आम्ही त्याला कसं हैराण केलं?’ ‘दुष्टता करणारा प्रत्येक जण यहोवाच्या नजरेत चांगला आहे आणि तो त्याला स्वीकारतो,’+ असं बोलून आणि, ‘न्यायाचा देव कुठे आहे?’ असं म्हणून, तुम्ही त्याला हैराण केलं आहे.”
तळटीपा
^ शब्दशः “रागावीन.”
^ म्हणजे जिथे बलिदानांच्या प्राण्याचं शेण फेकलं जायचं.
^ किंवा “आदर करावा.”
^ किंवा “शिक्षण.”
^ किंवा “शिक्षणाबद्दल.”
^ किंवा कदाचित, “तुमच्या शिक्षणाने.”
^ किंवा कदाचित, “पवित्र ठिकाणावर.”
^ शब्दशः “जो जागा आहे आणि जो उत्तर देतो.”
^ शब्दशः “दुसरी.”
^ किंवा “कायदेशीर पत्नी.”
^ शब्दशः “देवाची संतती.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “त्याला.”
^ किंवा “जो हिंसाचार करतो.”