मलाखी ४:१-६

  • यहोवाचा दिवस येण्याआधी एलीया येईल (१-६)

    • नीतीचा सूर्य चमकेल ()

 “कारण पाहा! तो दिवस येत आहे. तो भट्टीच्या आगीसारखा धगधगत आहे.+ त्या दिवशी सगळे गर्विष्ठ आणि दुष्ट लोक सुकलेल्या गवतासारखे होतील. तो येणारा दिवस नक्कीच त्यांना भस्म करेल आणि तो त्यांचं मूळ किंवा फांदी, काहीच राहू देणार नाही,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. २  पण माझ्या नावाचा आदर करणाऱ्‍यांनो,* नीतीचा सूर्य तुमच्यावर चमकेल आणि त्याची किरणं* आरोग्य देतील; आणि तुम्ही धष्टपुष्ट वासरांसारखे इथे-तिथे उड्या माराल.” ३  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण ज्या दिवशी मी हे घडवून आणीन, त्या दिवशी ते तुमच्या पायाच्या धुळीसारखे होतील. ४  माझा सेवक मोशे याचं नियमशास्त्र, म्हणजेच मी होरेब इथे सर्व इस्राएली लोकांना दिलेले कायदे आणि न्याय-निर्णय* आठवा.+ ५  पाहा! यहोवाचा महान आणि विस्मयकारक दिवस+ येण्याआधी, मी तुमच्याकडे एलीया संदेष्ट्याला पाठवत आहे.+ ६  तो वडिलांची मनं मुलांकडे, आणि मुलांची मनं वडिलांकडे वळवेल.+ म्हणजे, मला येऊन पृथ्वीचा नाश करावा लागणार नाही.”

तळटीपा

शब्दशः “भय मानणाऱ्‍यांनो.”
शब्दशः “पंख.”