मार्कने सांगितलेला संदेश १:१-४५
-
बाप्तिस्मा देणारा योहान घोषणा करतो (१-८)
-
येशूचा बाप्तिस्मा (९-११)
-
सैतान येशूची परीक्षा घेतो (१२, १३)
-
येशू गालीलमध्ये प्रचार करू लागतो (१४, १५)
-
पहिल्या शिष्यांची निवड (१६-२०)
-
येशू दुष्ट स्वर्गदूत काढतो (२१-२८)
-
कफर्णहूममध्ये येशू पुष्कळ जणांना बरं करतो (२९-३४)
-
येशू एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करतो (३५-३९)
-
येशू एका कुष्ठरोग्याला बरं करतो (४०-४५)
१ देवाचा मुलगा, येशू ख्रिस्त याच्याबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशाची सुरुवात:
२ यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असं लिहिलं होतं: “(पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे* पाठवतोय, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करेल.)+
३ ओसाड रानात घोषणा करणाऱ्या एकाचा आवाज ऐकू येतोय: ‘यहोवासाठी* मार्ग तयार करा! त्याच्यासाठी रस्ते मोकळे करा.’”+
४ त्याप्रमाणे, बाप्तिस्मा* देणारा योहान ओसाड रानात आला आणि अशी घोषणा करू लागला, की पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचं चिन्ह म्हणून बाप्तिस्मा घ्या.+
५ तेव्हा यहूदीयाच्या प्रदेशातले आणि यरुशलेममधले सगळे लोक त्याच्याकडे येऊ लागले. त्यांनी आपल्या पापांची उघडपणे कबुली देऊन त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.+
६ योहान उंटाच्या केसांचे कपडे घालायचा आणि कमरेला चामड्याचा पट्टा बांधायचा.+ टोळ आणि रानातला मध हेच त्याचं अन्न होतं.+
७ तो अशी घोषणा करायचा: “जो माझ्या मागून येतोय त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे आणि खाली वाकून त्याच्या जोड्यांचे बंद सोडायलाही मी योग्य नाही.+
८ मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तो तुम्हाला पवित्र शक्तीने* बाप्तिस्मा देईल.”+
९ त्याच दिवसांत, गालीलच्या नासरेथहून येशू आला आणि योहानने त्याला यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला.+
१० येशू पाण्यातून वर येताच त्याला आकाश उघडताना आणि पवित्र शक्ती* कबुतरासारखी आपल्यावर उतरताना दिसली.+
११ आणि स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा प्रिय मुलगा आहेस. तू माझं मन आनंदित केलं आहेस.”+
१२ त्यानंतर लगेच पवित्र शक्तीने त्याला ओसाड रानात जायला प्रवृत्त केलं.
१३ त्यामुळे तो ४० दिवस तिथे राहिला आणि तिथेच सैतानाने त्याची परीक्षा घेतली.+ तो जंगली प्राण्यांसोबत राहत होता आणि स्वर्गदूत त्याची सेवा करत होते.+
१४ मग योहानला अटक झाल्यानंतर येशू गालीलमध्ये गेला+ आणि असं म्हणून देवाबद्दल आनंदाचा संदेश सांगू लागला:+
१५ “नेमलेली वेळ आली आहे आणि देवाचं राज्य जवळ आलंय. म्हणून पश्चात्ताप करा+ आणि या आनंदाच्या संदेशावर विश्वास ठेवा.”
१६ गालील समुद्राजवळून जात असताना येशूला शिमोन आणि शिमोनचा भाऊ अंद्रिया दिसला.+ ते समुद्रात जाळी टाकत होते,+ कारण ते मासे धरणारे होते.+
१७ तो त्यांना म्हणाला: “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करीन.”+
१८ हे ऐकताच त्यांनी आपली जाळी टाकून दिली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.+
१९ तिथून थोडं पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे दोघं दिसले. ते आपल्या नावेत जाळी नीट करत होते.+
२० त्यांना पाहताच येशूने त्यांना बोलावलं, तेव्हा ते आपले वडील जब्दी यांना नावेतच मजुरांसोबत सोडून त्याच्यामागे चालू लागले.
२१ मग ते कफर्णहूमला गेले.
शब्बाथाचा दिवस सुरू होताच, तो सभास्थानात जाऊन शिकवू लागला.+
२२ त्याची शिकवण्याची पद्धत पाहून लोक थक्क झाले, कारण तो शास्त्र्यांसारखा नाही, तर अधिकार असलेल्या व्यक्तीसारखा त्यांना शिकवत होता.+
२३ त्याच वेळी, दुष्ट स्वर्गदूताच्या* प्रभावाखाली असलेला एक माणूस त्यांच्या सभास्थानात होता. तो ओरडून म्हणाला:
२४ “हे नासरेथच्या येशू, आमचं तुझ्याशी काय घेणंदेणं?+ तू काय आमचा नाश करायला आला आहेस? तू कोण आहेस हे मला चांगलं माहीत आहे. तू देवाचा पवित्र सेवक आहेस!”+
२५ पण, येशू त्याला धमकावून म्हणाला: “शांत राहा आणि त्याच्यातून बाहेर निघ!”
२६ तेव्हा दुष्ट स्वर्गदूताने त्या माणसाच्या शरीराला पिळवटून काढलं आणि मोठ्याने किंचाळत तो त्याच्यातून बाहेर निघाला.
२७ हे पाहून सगळे लोक इतके चकित झाले, की ते आपसात चर्चा करू लागले: “हे आहे तरी काय? ही कोणती नवीन शिकवण्याची पद्धत?* हा तर दुष्ट स्वर्गदूतांनासुद्धा अधिकाराने आज्ञा देतो आणि तेही त्याचं ऐकतात.”
२८ तेव्हा त्याच्याबद्दलची बातमी पाहतापाहता गालीलच्या संपूर्ण प्रदेशात चारही दिशांना पसरली.
२९ मग सभास्थानातून निघून ते याकोब आणि योहानसोबत, शिमोन आणि अंद्रिया यांच्या घरी गेले.+
३० तिथे शिमोनची सासू+ तापाने आजारी पडली होती. तेव्हा त्यांनी लगेच येशूला याबद्दल सांगितलं.
३१ म्हणून येशूने जवळ जाऊन तिचा हात धरला आणि तिला उठवलं. तेव्हा तिचा ताप उतरला आणि ती त्यांची सेवा करू लागली.
३२ संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, लोक त्याच्याकडे सगळ्या आजारी लोकांना आणि दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेल्यांना आणू लागले.+
३३ संपूर्ण शहरच त्यांच्या दारासमोर जमलं.
३४ तेव्हा त्याने वेगवेगळे आजार असलेल्या लोकांना बरं केलं+ आणि बऱ्याच दुष्ट स्वर्गदूतांना काढलं. पण, तो ख्रिस्त आहे* हे त्या दुष्ट स्वर्गदूतांना माहीत असल्यामुळे त्याने त्यांना बोलू दिलं नाही.
३५ दुसऱ्या दिवशी पहाटे, अंधार असतानाच तो उठून बाहेर गेला आणि एका एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करू लागला.+
३६ तेव्हा शिमोन आणि बाकीचे लोक त्याला शोधू लागले.
३७ तो त्यांना सापडला तेव्हा ते म्हणाले: “सगळे तुला शोधत आहेत.”
३८ तेव्हा तो म्हणाला: “आपण दुसरीकडे, आसपासच्या गावांत जाऊ या, म्हणजे मला तिथेही प्रचार करता येईल, कारण यासाठीच मी आलोय.”+
३९ मग तो तिथून निघाला आणि त्यांच्या सभास्थानांत शिकवत आणि दुष्ट स्वर्गदूत काढत संपूर्ण गालीलमध्ये फिरला.+
४० मग एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून अशी विनवणी करू लागला: “तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.”+
४१ तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला आणि त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हणाला: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.”+
४२ त्याच क्षणी त्याचा कुष्ठरोग नाहीसा होऊन तो शुद्ध झाला.
४३ मग येशूने त्याला लगेच पाठवून दिलं आणि अशी ताकीद दिली,
४४ “हे बघ, कोणाला काहीही सांगू नकोस. तर याजकाकडे जाऊन स्वतःला दाखव आणि त्यांना साक्ष मिळावी म्हणून शुद्ध होण्यासाठी मोशेने सांगितलेल्या गोष्टी अर्पण कर.”+
४५ पण तिथून निघाल्यानंतर, तो माणूस सगळ्यांना याबद्दल सांगू लागला. आणि त्याने ही बातमी सगळीकडे इतकी पसरवली की येशूला कोणत्याही शहरात उघडपणे जाणं कठीण झालं. म्हणून तो शहराबाहेर एकांत ठिकाणांत राहू लागला. तरीसुद्धा लोक सगळीकडून त्याच्याकडे येतच राहिले.+
तळटीपा
^ शब्दशः “तुझ्या चेहऱ्यापुढे.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “नवीनच शिकवण.”
^ किंवा कदाचित, “तो कोण आहे.”