मार्कने सांगितलेला संदेश १५:१-४७

  • पिलातसमोर येशू (१-१५)

  • लोक थट्टा करतात (१६-२०)

  • गुलगुथा इथे वधस्तंभावर खिळलं जातं (२१-३२)

  • येशूचा मृत्यू (३३-४१)

  • येशूचा मृतदेह कबरेत ठेवला जातो (४२-४७)

१५  पहाट होताच मुख्य याजक, वडीलजन आणि शास्त्री यांनी, म्हणजे खरंतर संपूर्ण न्यायसभेने* आपसात चर्चा केली. मग ते येशूला बांधून तिथून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला पिलातच्या हवाली केलं.+ २  तेव्हा पिलातने त्याला विचारलं: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?”+ त्याने उत्तर दिलं: “तुम्ही स्वतःच तसं म्हणत आहात.”+ ३  पण मुख्य याजक त्याच्यावर बरेच आरोप लावत होते. ४  म्हणून पिलातने त्याला पुन्हा विचारलं: “तू काहीच कसं बोलत नाहीस?+ बघ, ही माणसं तुझ्यावर किती आरोप लावत आहेत!”+ ५  पण येशूने पुढे काहीच उत्तर दिलं नाही. यामुळे, पिलातला खूप आश्‍चर्य वाटलं.+ ६  दरवर्षी, त्या सणाच्या वेळी पिलात लोकांच्या विनंतीप्रमाणे कोणत्याही एका कैद्याची सुटका करायचा.+ ७  त्या वेळी, बरब्बा नावाचा एक माणूस इतर बंडखोरांसोबत तुरुंगात होता. त्या बंडखोरांनी सरकारविरुद्ध बंड केलं होतं आणि लोकांची हत्या केली होती. ८  तेव्हा, लोक पिलातपुढे येऊन विनंती करू लागले, की त्याने आपल्या रितीप्रमाणे एका कैद्याची सुटका करावी. ९  पिलातने त्यांना विचारलं: “मी यहुद्यांच्या राजाची सुटका करावी अशी तुमची इच्छा आहे का?”+ १०  कारण पिलातला माहीत होतं, की मुख्य याजकांनी द्वेषामुळे येशूला पकडून दिलं आहे.+ ११  पण मुख्य याजकांनी, येशूच्या ऐवजी बरब्बाची सुटका करावी अशी विनंती करायला लोकांना भडकवलं.+ १२  पिलातने त्यांना पुन्हा एकदा विचारलं: “मग, तुम्ही ज्याला यहुद्यांचा राजा म्हणता त्याचं मी काय करू?”+ १३  ते पुन्हा मोठ्याने ओरडून म्हणाले: “त्याला वधस्तंभावर* खिळा!”*+ १४  तेव्हा पिलात त्यांना म्हणाला: “पण का? त्याने कोणतं वाईट काम केलंय?” तरीसुद्धा, ते आणखीनच ओरडू लागले: “त्याला वधस्तंभावर खिळा!”*+ १५  मग लोकांना खूश करण्यासाठी त्याने बरब्बाची सुटका केली. पण येशूला चाबकाचे फटके मारून+ त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी सैनिकांच्या हाती दिलं.+ १६  मग सैनिकांनी येशूला अंगणात, म्हणजे राज्यपालाच्या भवनात नेलं आणि त्यांनी बाकीच्या सगळ्या सैनिकांना तिथे जमवलं.+ १७  त्यांनी त्याला जांभळं वस्त्र घातलं आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला. १८  मग ते मोठ्याने ओरडून म्हणू लागले: “यहुद्यांच्या राजाचा जयजयकार असो!”*+ १९  तसंच, ते वेताच्या काठीने त्याच्या डोक्यावर मारू लागले आणि त्याच्यावर थुंकू लागले आणि त्यांनी गुडघे टेकून त्याला नमन केलं. २०  शेवटी, त्याची अशी थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावर घातलेलं जांभळं वस्त्र काढलं आणि त्याला पुन्हा त्याचा झगा घालून ते त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले.+ २१  त्या वेळी, शिमोन नावाचा एक माणूस त्या रस्त्याने शेतांतून शहराकडे येत होता. तो मूळचा कुरेनेचा होता आणि आलेक्सांद्र आणि रूफ यांचा पिता होता. तेव्हा, सैनिकांनी त्याला येशूचा वधस्तंभ उचलून न्यायला भाग पाडलं.+ २२  मग त्यांनी येशूला गुलगुथा या ठिकाणी आणलं. त्याचा अर्थ “कवटीची जागा” असा होतो.+ २३  तिथे त्यांनी त्याला गंधरस* मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला,+ पण त्याने तो प्यायला नकार दिला. २४  मग त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळलं आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणी कोणते घ्यावेत, हे ठरवायला चिठ्ठ्या टाकल्या आणि ते आपसात वाटून घेतले.+ २५  त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळलं तेव्हा सकाळचे सुमारे नऊ वाजले होते.* २६  त्याच्याविरुद्ध असलेला आरोप लिहून वधस्तंभावर लावण्यात आला. त्यावर लिहिलं होतं: “यहुद्यांचा राजा.”+ २७  शिवाय, त्यांनी येशूसोबत दोन चोरांनाही वधस्तंभांवर लटकवलं, एकाला त्याच्या उजवीकडे आणि दुसऱ्‍याला डावीकडे.+ २८  *​—— २९  तेव्हा तिथून येणारे-जाणारे लोक डोकं हलवून त्याची निंदा करत होते+ आणि म्हणत होते: “काय रे, मंदिर पाडून तीन दिवसांत पुन्हा उभं करणार होतास ना?+ ३०  मग आता वधस्तंभावरून खाली येऊन स्वतःला वाचव!” ३१  तसंच, मुख्य याजक आणि शास्त्रीही आपसात त्याची अशी थट्टा करू लागले: “याने दुसऱ्‍यांना वाचवलं, पण याला स्वतःला वाचवता येत नाही!+ ३२  आता इस्राएलच्या या राजाने, या ख्रिस्ताने वधस्तंभावरून खाली यावं. म्हणजे ते पाहून आम्ही विश्‍वास ठेवू.”+ तसंच, वधस्तंभांवर त्याच्या बाजूला असलेले चोरसुद्धा त्याची निंदा करत होते.+ ३३  मग, दुपारी सुमारे बारा वाजेपासून* ते सुमारे तीन वाजेपर्यंत* पृथ्वीवर अंधार पसरला.+ ३४  तीन वाजले, तेव्हा येशू मोठ्याने ओरडून म्हणाला: “एली, एली, लामा साबाखतानी?” ज्याचा अर्थ असा होतो, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?”+ ३५  हे ऐकून तिथे उभे असलेले काही लोक म्हणू लागले: “पाहा! तो एलीयाला हाक मारतोय.” ३६  तेवढ्यात कोणीतरी धावत जाऊन एक बोळा आणला आणि तो आंबट द्राक्षारसात बुडवून एका वेताच्या टोकावर ठेवला. मग त्याला चोखायला देऊन+ तो म्हणाला: “असू दे! एलीया याला खाली उतरवायला येतो का ते पाहू या.” ३७  पण येशूने मोठ्याने ओरडून प्राण सोडला.*+ ३८  तेव्हा, मंदिराच्या पवित्र स्थानाचा पडदा+ वरपासून खालपर्यंत फाटून त्याचे दोन भाग झाले.+ ३९  जवळच, त्याच्यासमोर उभ्या असलेल्या सैन्याच्या अधिकाऱ्‍याने त्याच्या मृत्यूच्या वेळी घडलेल्या घटना पाहिल्या, तेव्हा तो म्हणाला, “खरंच, हा देवाचा मुलगा होता!”+ ४०  बऱ्‍याच स्त्रियासुद्धा दुरून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, तसंच धाकटा याकोब आणि योसे यांची आई मरीया आणि सलोमी या होत्या.+ ४१  येशू गालीलमध्ये असताना या स्त्रिया त्याच्यासोबत असायच्या आणि त्याची सेवा करायच्या.+ तसंच, त्याच्यासोबत यरुशलेमहून आलेल्या इतर बऱ्‍याच स्त्रियाही तिथे होत्या. ४२  दुपार टळून गेली होती आणि तो तयारीचा दिवस, म्हणजेच शब्बाथाच्या आधीचा दिवस होता. ४३  तेव्हा, अरिमथाई इथला योसेफ तिथे आला. तो न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता आणि तोसुद्धा देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तो हिंमत करून पिलातकडे गेला आणि त्याने येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी त्याला विनंती केली.+ ४४  पण येशू इतक्यात कसा काय मेला याचं पिलातला आश्‍चर्य वाटलं. म्हणून त्याने सैन्याच्या अधिकाऱ्‍याला बोलावून येशू खरोखरच मेला का, असं त्याला विचारलं. ४५  मग सैन्याच्या अधिकाऱ्‍याकडून खातरी करून घेतल्यावर त्याने येशूचा मृतदेह योसेफला दिला. ४६  योसेफने उत्तम प्रतीचं मलमलीचं कापड विकत आणलं आणि येशूचं शरीर खाली उतरवून ते त्या कापडात गुंडाळलं. मग त्याने ते खडकात खोदलेल्या एका कबरेत* ठेवलं+ आणि मोठा दगड लोटून कबरेचं दार बंद केलं.+ ४७  पण मग्दालीया मरीया आणि योसेची आई मरीया, त्याला ठेवण्यात आलं होतं त्या जागेकडे बराच वेळ पाहत राहिल्या.+

तळटीपा

किंवा “वधस्तंभावर मृत्युदंड द्या!”
किंवा “वधस्तंभावर मृत्युदंड द्या!”
किंवा “यहुद्यांच्या राजा, नमस्कार!”
किंवा “गुंगीचा पदार्थ.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “तिसरा तास होता.”
अति. क३ पाहा.
शब्दशः “सहाव्या तासापासून.”
शब्दशः “नवव्या तासापर्यंत.”
किंवा “शेवटचा श्‍वास घेतला.”
किंवा “स्मारक कबरेत.”